Vat Purnima Festival Information in Marathi language Vat purnima Essay Nibandh in Marathi language
वटपौर्णिमा हा सण का साजरा करतात या सणाचे धार्मिक सांस्कृतिक महत्व काय आहे ? वडाचा झाड हे वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी आहे. वडाचा झाडाजवळ वातावरण का प्रसन्न राहते. जाणून घ्या.
Vat Purnima Festival Information in Marathi language
वटपौर्णिमा का साजरी करतात ? वटपौर्णिमा माहिती मराठी वटपौर्णिमा सणाचे महत्व
भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात. अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो. असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात. या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात, हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात. भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा !
Vat Purnima Puja Vidhi in Marathi language
या सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात. तिथे हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात आणि हातातला दोरा गुंडाळून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. आंबे वाहतात. खेड्यात वडाच्या झाडाला वाहिलेले आंबे खाण्यासाठी बाल सवंगड्यांची मोठी फौज जमलेली असते. पावसाळ्याचे दिवस, सरीवर सर कोसळणारे आल्हाददायक वातावरण आणि कमालीचा गारवा अशा स्वर्गीय वातावरणात ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
वडाचे झाड सदाहरित असून प्रचंड मोठे होत जाते. त्याचा विस्तार वाढत जातो करण त्याच्या पारंब्या जमिनीला टेकतात, तिथेच रुजतात आणि त्याचे मोठे खोड तयार होते. क्रमाक्रमाने झाडाचा विस्तार वाढत जातो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे ही गावाची शान असते. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे म्हणूनच दीर्घायुष्य प्रदान करणारा असा हा वृक्ष आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी वडाच्याच झाडाची पूजा का करावी या प्रश्नाचे भावनिक उत्तर इथे मिळते.
vat purnima scientific Reason in Marathi
वडाचा झाडाचे औषधी महत्व
- वडाच्या पानांचा काढा लघवीवरील विकारांमध्ये उपयुक्त असतो.
- वडाच्या सालीचा काढा स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासावर गुणकारी आहे.
- वडाच्या पारंब्यांपासून पानातल्या चिकापर्यंत प्रत्येक घटक औषधी आहे. पारंब्याचे तेल वापरले तर त्या पारंब्यांसारखे केस वाढतात असं थोर मोठे सांगतात.
- वडाचे झाड दिवसा आणि रात्री ही ऑक्सिजन बाहेर सोडते.इतर झाडे रात्री कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडतात. म्हणजे वडाचे झाड सतत ऑक्सिजन निर्मिती करते म्हणून वडाच्या झाडाभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. जीवन जगण्यासाठी लागणारी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. कदाचित याच कारणाने वटवृक्षाच्या पूजेची प्रथा पडली असावी .
वटपौर्णिमेचे सांस्कृतिक धार्मिक महत्व
संध्याकाळी महिला सत्यवान सावित्रीची पूजा करत पुढील प्रार्थना म्हणतात.
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटपौर्णिमा का साजरी करतात? वटपौर्णिमा म्हणजे काय?
विस्तारत जाणाऱ्या वडाच्या झाडाप्रमाने वंश वाढावा. पती मुले आणि एकूणच कुटुंबाला आयु आणि आरोग्य लाभावे. कुटुंबाची भरभराट व्हावी आणि सगळी सुखे मिळावीत अशी प्रार्थना करते. एकूणच आपल्या पतीशी प्रामाणिक राहून पुढील मार्गक्रमण करण्याची अत्यंत सुंदर गोष्ट ती व्यक्त करते. या सणाच्या निमित्ताने नात्यातला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि यातूनच कुटुंबव्यवस्थेचा पाया उभा राहतो. भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेली ही व्यवस्था एकमेकांना पूरक आहे. आजच्या स्वैराचार पसरलेल्या जमान्यात एकमेकांना विश्वासाने समजावून घेत प्रपंचगाडा हाकण्यासाठी ते सज्ज होतात. आजच्या तरुण तरूणींसाठी ही खरच मार्गदर्शक गोष्ट आहे.
आजकाल घरात एखादे वडाचे चित्र आणून त्याची पूजा केली जाते. वडाच्या फांदीची पूजा केली जाते पण यातून काहीही साध्य होत नाही. असे करून आपण वडाच्या झाडाला इजा पोचवत आहोत हे लक्षात ठेवा. वडाची आणि एकूणच सर्व वृक्षांची वृद्धी व्हावी, हे पर्यावरण पुन्हा बहरावे अशा व्यापक दृष्टिकोनातून वटपौर्णिमा साजरी व्हायला हवी. घरात बसून निसर्ग तुम्हाला काय कळणार ? त्यासाठी निसर्गात निसर्गाचे बनून जावे लागते. निसर्गातल्या प्रत्येक हालचालीवर चिकित्सक मनाने नजर ठेवावी लागते आणि यातूनच आजूबाजूच्या पर्यावरणावर प्रेम जडते. झाडे ही खऱ्या अर्थाने आपले अन्नदाता आहेत. झाडे आपल्याला अन्न, आरोग्य आणि सावली देतात म्हणून भारतात वृक्षपुजेची आणि निसर्ग पुजेची प्रथा पडली असावी.
स्वतःच्या आयुष्यासाठी आणि एकूणच दीर्घ आयुष्याची मागणी करताना एकूणच संपूर्ण पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेऊ. एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून सण आणि उत्सवांकडून बघूया .
ही ‘Vat Purnima Festival Information in Marathi language’ वटपौर्णिमा का साजरी करतात ?वटपौर्णिमा सणाचे महत्व वटपौर्णिमा माहिती मराठी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.
-अजिंक्य दंडवते
देवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
वटपौर्णिमा सन निबंध
Leave a Reply