शांता शेळके या फक्त लहान मुलांच्या आजी नाहीत त्यांनी रचलेले काव्य आजही तरुण प्रियकरांना भावते. मराठी कवयत्री शांता शेळके यांच्याबद्दल जाणून घेऊयात. Shanta Shelke information Biography in Marathi शांता शेळके माहिती मराठी
Shanta Shelke information Biography in Marathi

शांता शेळके माहिती मराठी
मराठी कवी, लेखिका, गीतकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला यांची ओळख आहे. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांता शेळके याचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकर म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून आपल्याला जाणवतं. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती शांता शेळकेंच्या साहित्याचा मूळ आधार आहे.
शांता शेळके यांचे बालपण-
त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. तर बालपण खेड मंचरच्या परिसरातलं. लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. शांताबार्इंचं खेड्यात रमलेलं बालपण, भाषेवरचं प्रेम, प्रभुत्व आणि विविध वाङ्मयप्रकारात अभिव्यक्त होण्याची त्यांची क्षमता यामुळेच त्याचं साहित्य अनेक साजांत रूपवान ठरतं. शांता शेळके यांच्यावर खेड्यातल्या मुक्त वातावरणाचे संस्कार झाले असल्यामुळेच की काय, त्यांच्या गाण्यातील शब्द स्त्री गीतांतील मार्दव ठेवून येतात. ते शब्द रसिकांच्या काळजात चटकन झिरपणारे असतात.
स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारी शांता शेळके यांची अनेक गाणी आहेत. ती गाणी त्या त्या वेळच्या स्त्रीमनाची अवस्था व्यक्त करतात. खट्याळ रंगाबरोबर विषण्णता, नवथरपणाबरोबर धीटपणा असणारी अशी उडत्या लयीतील गाणी शांता शेळकेंनी खूप लिहिलेली आहेत. शांता शेळकेंच्या कवितेत कधी कधी धीट शृंगार असला तरी त्यांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. उलट त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार दिसून येतो. त्यामुळेच त्यांचं साहित्य काळजाला स्पर्शून जातं. ‘असा बेभान हा वारा’, ‘वर्षा पाण्यावरच्या पाकळ्या’, ‘किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह चोखंदळ वाचकांच्या मनाला स्पर्श करतात.
कधी आठवण लपलेली असते
हृदयाच्या बंद कप्प्यात,
कधी आठवण लपलेली असते
वसंतातल्या गुलमोहरात,
कधी ती लपलेली असते
सागराच्या अथांग निळाईत,
तर कधी ती लपलेली असते
बहरलेल्या चैत्रपालवीत
या साऱ्यांभोवती फिरत असतो
श्वास आपला मंद धुंद
आणि यातूनच मग दरवळतो
तो आठवणीचा बकुळगंध
शांता शेळकेंच्या काव्यलेखनात अनेक प्रकारच्या सूक्ष्म तरल संवेदना आपल्याला जाणवतात. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरत नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे व्यक्त करतात. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देतात.
‘नवयुग’मध्ये असताना अत्रे एकदा त्यांना म्हणाले, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी “किलबिल किलबिल पक्षी बोलती”, “विहीणबाई विहीणबाई” अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या.
शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत.
असेन मी नसेन मी
तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या
उद्या हसेल गीत हे
वरील त्यांच्याच ओळींप्रमाणे त्या आपल्यात नाही तरीसुद्धा त्यांच्या गीतांमधुन आणि कवितांमधून त्या आपल्याशी आजही संवाद साधत आहेतच.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मोनोरांजानाचे व्यासपीठ!
Shanta Shelke information Biography in Marathi
Leave a Reply