गाव गप्पा
सायकल…

एप्रिल सुरु झाला होता.तेव्हा मी सहावीत असेल.नुकतीच सायकल चालवायला शिकलो होतो.त्यामुळे वार्षिक परिक्षेच्या अभ्यासापेक्षा सायकलची चाक जास्त वेगात पडत होती.ते वयच तसं एखाद्या गोष्टीचा नाद लागला की तो बरेच दिवस लागून राहतो.आमच्या गावात इरफानचं सायकल मार्ट होतं.तिथं भाड्यानं सायकल मिळायची.दिड रुपयात अर्धातास,तिन रुपये घंटा आणि पंधरा रुपये दिले तर आपण सायकल दिवसभर वापरु शकायचो…
सहावी म्हणजे मी काही फार मोठा नव्हतो.जेमतेम अकरा वर्षाचा.त्यामुळे फँन्टसीचं जाम आकर्षण.म्हणजे आपल्यालाही हवेत उडता यावं किवा अलादिन चा चिराग आपल्याला मिळावा अशा सुप्त इच्छा मनात ठेवून मी जगत होतो.सायकल यायला लागल्यामुळे एक फँन्टसी पुर्ण झाली होती…आपण वेगात सायकल चालवत डोंगरांमधून,नद्यांमधून सायकल घेऊन फिरतोय असं स्वप्न खुपदा पडायचं.
सायकल ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री…
तिच्या विचारात तासच्या तास उलटून जायचे.तिला सोबत घेऊन भटकत रहावं असं सारखं वाटायचं.तिला बघण्यासाठी मी सायकल मार्टकडे जसा रिकामा वेळ मिळेल तसा चक्कर मारत असे.तिला दुर उभं राहून कितीतरी वेळ मी बघीतलय…
मागं ढंपर नसलेली,पुढे दांडी नसलेली, ब्रेक आपले पाय घासून लावायचा …नुसती दोन चाकं,उघडी पडलेली चैन आणि व्हि आकाराचा सेप…बस्स…।
लहानपणी प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी झिप्री पोरगी येते .गल्लीतलीच असते ती… पुढे ती आपली घट्ट मैत्रीण बनते…तशी हि होती…झिप्री सायकलं…।
दोन रुपये घंट्यानं मिळायची.खेळायला सोपी म्हणून सगळ्या पोरांना तिच हवी असायची.माझ्याकडे तितके पैसे नसायचे.दोन रुपये म्हणजे खूप पैसे…
गावात वडीलांच टेलरिंगच दुकान. लगीनसरायी सुरू झाली की खूप काम असायचं त्यांना. आमच्याकडे दोन कारागीर काम करत.शिवलेल्या शर्टाला काजे बटन करण्याचं काम मला जमत होतं म्हणून आई,मी,मोठा भाऊ हे काम करत बसायचो.चार वाजले की बस स्टँडवर आमचं दुकान होतं तिथं जावून दुकानासमोर पाण्याचा सडा मारावा लागायचा.म्हणजे दुकानात थंड हवा यायची.
हापशीवरुन पाणी आणावं लागायचं.झाडलोट करुन चार बकेटी पाणी मारायचो.माझं काम वडिलांना नेहमीच आवडायचं.म्हणून मग ते गुपचूप दोन रुपये हातावर ठेवायचं.मला इतकं भारी वाटायचं.त्या पैशात काय करावं आणि काय काय घ्यावं या बद्दल विचार सुरू व्हायची…
आता रोज पैसे मिळणार या आशेने मी रोज पाणी मारत होतो.पैसे जमवत होतो.मला ती सायकल घेऊन सगळीकडे फिरायचं होतं.नदीला वर्षभर पाणी असायचं.मला त्या पाण्यातून सायकल चालवायची होती.
पैसे जमवत होतो.आता काम संपलं की आधी मार्टावर जायचं आणि सायकल घेऊन संपूर्ण दिवस फिरायच हे एकच ध्येय उराशी बाळगून काम चालू ठेवलं…
गावापासून आठ ते दहा किलोमीटर वर एक वाडी आहे.तिथे दरवर्षी सप्ताह असतो.त्याच्या समाप्ती ला गावातले बरेच लोक पायी जातात.आम्ही कितीतरी वेळा पायी गेलोय.जाताना जी धम्माल करायचो की बस्स…शेतातला उस उपटणे,कैरीच्या झाडावर चढणे ,हसत खिदळत आम्ही तो आठ किमीचा रस्ता पार करायचो.या वर्षी पण ठरलं पण सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपण सायकली घेऊन जायचं.मी सोडला तर बाकी पोरांच्या घरी सायकली होत्या. जायचं तर होतं.
मी मार्टावरची सायकल नेण्याचं ठरवलं.पण पैसे अपुरे पडत होते.वडिलांना मागितले तर …?
मी दुकानात जावून बसलो.सकाळची वेळ.वडील मशिनवर काम करत होते.मी नुसता बसून राहिलो.वडिलांना लगेच कळतं.त्यांनी विचारलं काय झालं.
म्हटलं मला तीन रुपये पाहिजे, सायकल घ्यायची.मला वाडीला जायचय,सगळे पोरं जाणार आहेत…त्यांनी तीन रुपये हातावर ठेवत ,”नीट जा,गाड्या येतात त्या रस्त्यानं खूप…” एवढच म्हटलं.मी इतका खूश झालो की धावत सायकल मार्टाकडे पोहचलो.पण तिथे ती सायकल नव्हती कुणीतरी घेऊन गेलं होतं.इरफाननं बसायला सांगितलं.मी बराच वेळ वाट बघत बसलो.बाकी खूप सायकली होत्या पण मला तिच हवी होती,झिप्री सायकल…।
आम्ही सगळे धिंगाना घालत वाडीत पोहचलो.खूप गर्दी होती.पंचक्रोशीतील सगळेच लोक प्रसादासाठी जमतात तिथे.जत्रा भरते .आम्ही सायकली व्यवस्थित लावल्या.मंदिरात दर्शनासाठी गेलो.भरपूर उनाडक्या केला.आम्ही प्रसाद खायला जायचो.किर्तानात फारसं मन रमत नव्हते. उन्हामुळे मंडपात कुणी बसत नव्हतं,गर्मी खूप होती.गारेगार,फरसाण, घोडीशेव,भजे असे सगळे पदार्थ आळीपाळीने आम्ही खाल्ले…
प्रसादासाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या,प्रसाद वाटेपर्यंत लोकं थांबेनात मग गोंधळ झाला.खूप काय काय होत असतं दरवर्षी ते काही आम्हाला नवीन नव्हतं…
रुमालात प्रसाद बांधून आम्ही निघालो.पोरांनी आपापल्या सायकली घेतल्या.माझी सायकलं कुठेच दिसेना.बाकीच्या सायकलींना कुलूप होतं.माझ्या सायकलीला तसलं काहीच नव्हतं…मी घाबरलो…आसपासच्यि उसात,आब्याच्या मोसंबीच्या बागा धुंडाळल्या,जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला विचारलं पण सायकली बदद्ल कुणालाच काही माहिती नव्हतं…अंधार पडत आला…मी मित्रांच्या सायकलवर मागे बसून आपली सायकल कुठे दिसते का हे बघत होतो…खूप रहायला येत होतं…घरी काय सांगायचं,इरफान आपल्याला रागावला तर,वडील आपल्याला मारणार तर नाही ना…असे हजार प्रश्न डोक्यात पडत होते…
घरी जाण्या ऐवजी आधी दुकानात गेलो.बसून राहीलो.काहीच बोललो नाही.खूप घाबरलो होतो.डोळ्यात पाणी आलं,घसा कोरडाकोरडा पडला,रडत रडत सांगितलं “सायकल चोरली कुणीतरी…” वडिल शांत झाले.माझ्या कडे बघतसुद्धा नव्हते.मग ते उडले आणि मला पाठिमागे बोलवलं.डेबलच्या खालून एक पिशवी काढली.त्यात जिन्स पँन्ट होती.मला त्यांनी घालायला सांगितली.मला कळत नव्हतं काय चाल्लय ते…ते सांगतील तसं करत होतो…तालूक्यावरुन आणलेली खारी देऊन घरी पाठवलं.मी गेलो.नंतर ते आले.आम्ही जेवलो.माझी भिती कमी झाली तरी प्रश्न होताच वडिल सायकल विषयी बोलत का नाही… ते नाहीच बोलले…।
मी पुढचे चार पाच दिवस इरफान कडे फिरकलो नाही.
पण असच भित भित मी एक दिवस गेलो तर तोही काही बोलला नाही… त्यानं आत ठेवलेली सायकल दाखवली…झिप्री आत होती…पुढचं चाक वाकलेलं…मला डोळ्याला पाणी आलं…तिला कोणीतरी पाटात फेकलं होतं…इरफान भाईला ती सापडली.वडिलांना हे माहित होतं बहुतेक…म्हणून ते बोलले नाहीत…।
संतोष गायकवाड….
कॉलेज कट्टा
Leave a Reply