
भौतिक शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जीवन प्रवास हा भारतीयांसमोर एक आदर्श असा आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
जन्म
विश्वविख्यात भौतिक शास्त्रज्ञ पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला.
शिक्षण
सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथे झाले. सत्येंद्रनाथ शालेय शिक्षणात पहिल्या क्रमांकाने पास व्हायचे. सत्येंद्रनाथ यांनी ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’ मधुन १९१५ साली आपली पदवी पहिल्या क्रमांकाने प्राप्त केली. यावेळी ते संपुर्ण विद्यापीठातुन प्रथम आले होते. यासाठी त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले.
विशेष गुण
सत्येंद्रनाथ बोस यांना अनेक भाषा अवगत होत्या आणि ‘व्हायोलिन’ सारखे ‘एसराज’ नावाचे वाद्य ते अतिशय सरस उत्तमपणे वाजवु शकत.
कार्य
- १९१५ साली सत्येंद्रनाथानी अल्बर्ट आईनस्टाईन यांचा मुळ जर्मन भाषेतील असलेला ‘सापेक्षता सिध्दांत’ सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरीत केला.
- १९१६-१९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदावर काम केले.
- १९२१ साली ते ढाका येथील विद्यापीठात ‘भौतिकशास्त्रचे प्राध्यापक’ म्हणुन रुजु झाले.
- आयनोस्पेअर मधल्या ईलेक्ट्रोमँग्नेटिक प्रोपरटीस, थेअरी ऑफ एक्स रेय क्रिस्टलोग्राफी आणि याच बरोबर क्वांटम स्टँटिस्टीक मधील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
कलाटणी
सन १९२३ साली सत्येंद्रनाथ प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधीत स्वतःचे शोध इंग्लंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या मासिक फिलॉसॉफिकलकडे पाठविले पण तो शोध छापण्यास मासिकाने नकार दिला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश न होता त्यांनी त्यांचा प्रबंध आईनस्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आईनस्टाईन यांना त्या प्रबंधाचे महत्व समजले. त्यांनी बोस यांचा प्रबंध जर्मन भाषेत अनुवादीत करुन तेथे तो छापुन येण्यास मोलाची मदत केली. प्रबंध जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला. त्यामुळे ‘सत्येंद्रनाथ बोस’ प्रसिद्धीस आले.
सत्येंद्रनाथ बोस यांची जीवनशैली
सत्येंद्रनाथ बोस यांच्या बालपणी बंगल्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरु झाल्या होत्या. तसेच स्वदेशीची लाट पसरली होती. त्यांच्या जीवनशैलीवर ‘राजा राम मोहन रॉय बंकीम चंद्र, स्वामी विवेकानंद’ यांच्या देशभक्तीच्या विचारंचा-शिकवणीचा विलक्षण सकारात्मक प्रभाव होता. त्याचाच प्रभाव म्हणुन सत्यवाद आणि ज्ञानप्राप्तीची तीव्र लालसा हे गुण त्यांनी अंगीकारले. तंत्रविज्ञानात मोलाची कामगिरी करुन देशाच्या जनतेला त्याचा लाभ मिळवुन द्यावा असे त्यांचे विचार होते.
१९४७ मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यामुळे त्यांच्या मनाला त्याच्या प्रचंड वेदना झाल्या. गणित आणि भौतिकविज्ञानाच्या विश्वात अशी निरर्थक विभक्तता नव्हती आणि त्यांचे मन त्यामध्येच रमत होते. त्यांना त्याचे समाधान होते. तसेच काव्यावरही त्यांचे विशेष प्रेम होते. संस्कृत, बंगाली, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषेतील ज्या उत्कृष्ट कवितांमध्ये मानवीयतेचा भाव असे त्या त्यांना आवडत असत.
भूतलावर जेवढे मानव होऊन गेले त्यामध्ये ‘गौतम बुध्दांविषयी’ बोस यांना सर्वात जास्त आदर होता. आधुनिक भौतिक विषयांतील सर्वश्रेष्ठ शिक्षक तर ते होतेच परंतु मानवतेच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिमत्व अतुलनीय होते. सत्येंद्रनाथ बोस यांना आईनस्टाईन यांच्यापासून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली.
बोस यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यात विज्ञान लोकप्रिय करण्याचे कार्य विशेष आवडीने केले. बंगाल सायन्स असोसिएशनची त्यांनी स्थापना केली. ज्ञान व विज्ञान नावाचे मासिक त्यांनी सुरु केले.
निवृत्ती नंतरची जीवनशैली
निवृत्तीनंतरच्या बोस यांच्या जीवनशैलीचे वर्णन त्यांच्या मित्रांच्या शब्दात…
बोस यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत शिरल्यावर इतरस्त: विखुरलेली पुस्तके, मासिके, एका कोपऱ्यात ‘इसराज’ हे वाद्य, भिंतीवर टागोर, आईनस्टाईन, महालोबनीस, निरेन रॉय यांचे फोटो दिसत.
भौतिक शास्त्र, गणित हा त्यांच्या आवडीचा विषय होता. तोच शिकविण्यात ते मग्न असत. कोणीही व्यक्ती त्यांना भेटण्यास, काही प्रश्न सोडवुन घेण्यास येत असत. त्यांचे ते हसुन स्वागत करत असत.
त्यांच्या कार्याचा गौरव
१९५८ साली सत्येंद्रनाथाना भारत सरकारने “पद्मविभूषण” पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना “राष्ट्रीय प्रोफेसर” म्हणण्यात येऊ लागले. त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसायटीने त्यांना आपला “फेलो” म्हणून जाहीर केले.
निधन
दि. ४ फेब्रुवारी १९७४ रोजी विश्वविद्यालय शास्त्रज्ञ, पंडीत, थोर व्यक्तीमत्व, भारतमातेचा लाडका पुत्र, पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस यांचे ‘ ह्रदय ‘ रोगामुळे निधन झाले.
-माहिती संकलन
ॲड.एम.डी.भागवत
BS L.L.B
घोडेगाव.
मो.९९६०९०८०६३
Leave a Reply