
कोण होते कासीम सुलेमानी? त्यांच्या हत्येने जगात खळबळ का माजली आहे ? त्यांची हत्या का झाली ? त्याचा परिणाम काय होईल?
सुलेमानी हे इराण आणि मध्यपूर्वेतील एक ताकदवान व्यक्तिमत्व होतं. इराणच्या सर्व लष्करी डावपेचांचा खरा चेहरा हे सोलेमानी होते असं म्हटलं जातं. इराणच्या ‘इस्लामिक रेवोलूशनरी गार्ड कॉर्प्स’(IRGC) सैन्याचा एक भाग असलेल्या ‘कुड्स फोर्स’ तुकडीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. इराकमध्ये धुडगूस घालणाऱ्या इसीस (ISIS) च्या सैन्याला रोखण्यासाठी शिया मुसलमानांच्या सैन्याला सोलेमानी यांनी मदत पुरवली होती.
मुख्य म्हणजे सुलेमानी अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना धोकादायक होते असं म्हणतात, पण परिस्थिती पूर्वी अशी नव्हती. आज जरी सोलेमानी यांची हत्या अमेरिकेने केली असली तरी एकेकाळी सोलेमानी आणि अमेरिका यांनी एकत्र काम केलं होतं.
मग अमेरिकेनेच त्यांचा खून करण्यापर्यंत गोष्टी कशा बिघडल्या ते जाणून घेण्यासाठी सोलेमानी यांची पार्श्वभूमी माहित असणं गरजेचं आहे.
सोलेमानी यांचा जन्म ११ मार्च १९५७ चा. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना कर्मान येथे बांधकाम मजूर म्हणून काम करावं लागलं. १९७९ च्या इराणच्या क्रांतीच्या काळात त्यांनी रेझा शाहच्या विरोधात निदर्शनं केली होती. पुढे ते IRGC मध्ये दाखल झाले. १९८० सालच्या इराक-इराण युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याच काळात सैन्याधिकारी म्हणून ते एकेक पायऱ्या चढत महत्त्वाच्या हुद्द्यांवर पोहोचले.
१९९८ साली सोलेमानी यांच्या हातात ‘कुड्स फोर्स’चं नेतृत्व आलं. ही जबाबदारी त्यांच्यावर खुद्द इराणचे हुकुमशाह आयातोल्ला खोमेनी यांनी सोपवली होती. हा तो काळ होता जेव्हा इराणची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या दबावामुळे पंगु झाली होती. कुड्स फोर्सची सूत्रं हातात आल्यानंतर इराण आणि लेबनॉनचे हिजबुल्ला, तसेच इराण आणि सिरियाचे बशर अल असद आणि इराकच्या शिया मुस्लिमांच्या लष्करी फौजांमध्ये राजकीय संबंध अधिक घट्ट झाले.
शिया मुसलमानचं का तर याचं उत्तर असं की इराणमध्ये शिया मुसलमान बहुसंखेने आहेत. त्यामुळे इराणचा कल शिया मुसलमानबहुल प्रदेशाकडे असणं स्वाभाविक आहे.
सुलेमानी आणि अमेरिका संबंध
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अलकायदा आणि तालिबानचा बंदोबस्त करण्यासाठी सोलेमानी यांची मदत घेतली होती. सोलेमानी यांच्या मदतीमुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं. ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानात आश्रय घ्यावा लागला.
पण अमेरिका-सोलेमानी संबंध फार काळ टिकले नाहीत.
२००७ साली झालेल्या इराकच्या शिया आणि सुन्नी यादवी युद्धात सोलामानी यांनी शियापंथी सैन्याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. याच शस्त्रांमुळे अनेक अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं.
नुकतंच अमेरिकेने IRGC आणि कुड्स फोर्सला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.
सुलेमानी इराणचे ‘हिरो’ कसे झाले ?
सोलेमानी अमेरिका संबंध कसेही असले तरी सोलेमानी हे इराणमध्ये चांगल्या अर्थाने प्रसिद्ध झाले होते. सोलेमानी हे इराणचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ झुल्फिकार’ मिळवणारे पहिले सेनापती ठरले. २०१३ पासून सिरीयन यादवी युद्धातील इराणी हस्तक्षेपाचा चेहरा म्हणून सोलेमानी यांचा उदय झाला. तेव्हापासून सोलामानी यांची प्रसिद्धी वाढतच गेली. इराकमध्ये सरकार स्थापन करण्यात सोलेमानी यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप होता. या गोष्टीमुळे त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली की त्यांनी राजकारणात यावं अशी जनतेकडून मागणी करण्यात आली.
सोलेमानी यांची प्रसिद्धी किती जबरदस्त होती याचा अंदाज २०१८ च्या सर्वेक्षणातून येतो. मेरीलँड विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार इराणचे अध्यक्ष हसन रौहानी आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद झारीफ यांच्यापेक्षा सोलेमानी यांची प्रसिद्धी ८३ टक्क्यांनी जास्त होती.
सुलेमानी यांच्या हत्येमागचं कारण काय ?
सुलेमानी यांनी कतैब हिजबुल्ला या इराकी शिया लष्करी गटाला मदत केली होती. या लष्करी संघटनेने किरकुक येथील लष्करी तळावर हल्ला करून अमेरिकेच्या संरक्षण कंत्राटदाराला मारलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेने हिजबुल्ला सैन्यावर हवाई हल्ला केला होता. याचा परिणाम असा झाला की आंदोलन सुरु झालं. आंदोलकांनी अमेरिकेच्या बगदाद येथील वकिलातीवर हल्ला केला.
अमेरिकेने कतैब हिजबुल्ला लष्करी गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. अशा अनेक घटनांमागचा चेहरा असलेल्या सोलेमानी यांच्यावर कारवाई करण्याचा मनसुबा अमेरिकेच्या मनात अनेक वर्षापासून होता. सोलेमानी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय मात्र बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांच्यापैकी कोणीच घेतला नव्हता. ट्रम्प यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. इराकच्या बगदाद विमानतळावर झालेल्या हवाई हल्ल्यात सोलेमानी संपले.
याचा परिणाम काय होईल?
पहिला परिणाम म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी बिघडतील. मध्यपूर्वेत जी थोडीफार शांतता आली होती ती जाईल. युद्ध होईल का हे मात्र सध्याच्या घडीला सांगता येत नाही. तसं होऊ नये अशीच आपण प्रार्थना करू. कारण इराण-अमेरिका संबंधाचा परिणाम आपल्याकडच्या पेट्रोलच्या किमतीवर होतो. यानिमित्ताने महागाई वाढण्याला आणखी एक कारण मिळेल.
-कॉलेज कट्टा
Leave a Reply