Pythagoras information Biography in Marathi
पायथागोरस ची माहिती
कर्ण वर्ग बरोबर… हा प्रमेय मांडणारा पायथागोरस हा खूप गूढ होता जाणून घेऊयात
पायथागोरस (इ.स.पू.सु. ५७५‒४९५)
pythagoras history in marathi

एक गणिततज्ञ म्हणून पायथागोरस आपल्याला परिचयाचा आहे भूमितीमध्ये असणाऱ्या त्याच्या प्रमेयाचा सर्वांनी अभ्यास केलेला आहेच त्याबद्दल काही नवीन सांगायला नको. पण एक गणिताचा तज्ञ याव्यतिरिक्त एक ग्रीक गूढवादी विचारवंत आणि त्याच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक पंथाचा संस्थापक ही असणारी पायथागोरसची ओळख खुप कमी लोकांना माहीत आहे त्याबद्दलच आज आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
पायथागोरसचा जन्म पूर्व इजीअन समुद्रातील सेमॉस बेटावर झाला. त्याचे शिक्षण फेरेसायडीझ व ॲनॅक्झिमँडर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यानंतर त्याने काही काळ ईजिप्तमधील मेंफिस येथे घालविला. ईजिप्त आणि बॅबिलोनिया या देशांत त्याने पुष्कळ प्रवास केला आणि त्या वेळी त्याला तेथील गणिताच्या प्रगतीची माहिती झाली. ग्रीसमधील पोलिक्राटीझ याच्या जुलमी राजवटीमुळे पायथॅगोरसने इ.स.पू. ५३० च्या सुमारास दक्षिण इटलीतील क्रोतोने येथे प्रयाण केले. तेथे त्याने एक धार्मिक व तत्त्वज्ञानाधिष्ठित पंथ स्थापन केला. लवकरच पायथॅगोरस व त्याचे अनुयायी यांचा राजकीय प्रभाव दक्षिण इटलीतील ग्रीक शहरांत मोठ्या प्रमाणावर वाढला. तथापि शेवटी त्याच्या विरोधी गटाने पंथाच्या एका संमेलनावर जोरदार हल्ला केला व त्यामुळे हा पंथ जवळजवळ नामशेष झाला. या हल्ल्याच्या पूर्वीच इ.स.पू. ५०० मध्ये पायथॅगोरसला क्रोतोनेमधून हद्दपार करण्यात आले.
पायथागोरसचे स्वत:चे लिखाण उपलब्ध नाही. त्याचे आयुष्य, कार्य व तत्त्वज्ञान यांसंबंधीची माहिती मिळण्याची बरीचशी साधने इ.स. तिसर्या व चौथ्या शतकांतील आहेत आणि त्याच्याविषयी उपलब्ध असलेल्या समकालीन (इ.स.पू. चौथ्या व पाचव्या शतकांतील) साधनांमध्ये असलेली माहिती, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांमध्ये फूट पडल्याने, बर्याच वेळा परस्परविरोधी असल्याचे दिसून येते.
पायथागोरसच्या सिद्धान्तांचा अवलंब करणारा एक फार मोठा वर्ग तयार झाला होता. पायथागोरसचे शिष्य अॅकॉस्मेटिकोइ (Akousmatikoi) व मॅथेमॅटिकोइ (Mathematikoi) अशा दोन वर्गांमध्ये विभागले जात. उत्तम परीक्षणानंतरच त्यांचा पायथागोरसच्या तत्त्वज्ञानपंथात प्रवेश होई. शिष्यांच्या योग्यतेनुसार अॅकॉस्मेटिकोइ (श्रोते) व मॅथेमॅटिकोइ (गणिती) या दोन विभागांमध्ये त्यांचे वर्गीकरण केले जाई. अॅकॉस्मेटिकोइ वर्ग विध्यनुष्ठानात्मक तत्त्वांवर भर देणारा, तर मॅथेमॅटिकोइ हा वर्ग शास्त्रीय तत्त्वांचा ऊहापोह करणारा होता. पायथागोरसची शिकवण सिम्बॉल्स म्हणून प्रसिद्ध होती. पायथागोरस पंथाच्या अनुयायांना आपल्या ज्ञानासंबंधी गुप्तता राखण्याची आज्ञा होती. त्यानुसार पायथागोरस यांनी स्वतः कोणताही ग्रंथ लिहिला नाही. तथापि त्यांचा पंथ दूरवर पसरल्यावर ही गुप्तता निष्ठापूर्वक पाळली गेली नाही व त्यांचे तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ लिहिले गेले. यामुळे त्यांच्या पंथीयांच्या लिखाणातून पायथागोरस यांचे स्वतःचे संशोधन व तत्त्वज्ञान वेगळे काढणे कठीण झाले आहे.
समांतरभुज चौकोन यांविषयीची प्रमेये पायथॅगोरसला अगोदरच माहीत होते असे दिसते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोन असते, हे त्याने समांतर रेषांच्या गुणधर्मावरून सिद्ध केले होते. पायथॅगोरस व त्याच्या अनुयायांनी केलेल्या भूमितीविषयक कार्याचा यूक्लिडला आपला सुप्रसिद्ध ग्रंथ तयार करताना पुष्कळच उपयोग झाल्याचे आढळून येते. पायथॅगोरसने भूमितीतील व्याख्या देताना त्याची तत्त्वज्ञानातील संकल्पनांशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला होता. काटकोन त्रिकोणाविषयीचे त्याच्या नावाने प्रसिद्ध असलेले प्रमेय (कोणत्याही कोटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ राहिलेल्या दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेबरोबर असते) त्यानेच शोधून काढले असावे. तथापि बॅबिलोनियाचा राजा हामुराबी (इ.स.पू. एकविसावे-विसावे शतक) याच्या काळातील एका मुद्रेवरही हे प्रमेयविधान आढळले आहे. बिंदूभोवतीची जागा समभुज त्रिकोण, चौरस किंवा सुसम (सर्व बाजू सारख्या असलेल्या) षट्कोणाने पूर्णपणे व्यापता येते, हे पायथॅगोरसने दाखवून दिले. नियमित प्रस्थ (घनाकृती) पाचच आहेत, हे पायथॅगोरस पंथीयांना माहीत होते. सुसम पंचकोनाच्या बाजू वाढवून व त्या एकमेकांना छेदून तयार होणार्या तारकाकृतीला (Pentagram) पायथॅगोरस पंथीयांमध्ये फार महत्त्व होते व एकमेकांना ओळखण्यासाठी या चिन्हाचा ते उपयोग करीत असत. चौरसाची बाजू व कर्ण यांचे प्रमाण अपरिमेय असते, हे पायथॅगोरस पंथीयांनीच दाखवून दिले. अपरिमेयतेची संकल्पना हा या पंथीयांनीच गणितातील सर्वांत मोठा शोध मानला जातो. संख्या सिद्धांतात पायथॅगोरसने मुख्यतः चार प्रकारचे प्रश्न हाताळले आणि ते म्हणजे बहुभुजीय संख्या, गुणोत्तर व प्रमाण, संख्येचे अवयव आणि संख्या श्रेणी हे होत. अर्थात हे प्रश्न त्याने भूमितीचा उपयोग करूनच सोडविले होते.
pythagoras information Biography in marathi
पायथागोरस ची माहिती विचार
पायथॅगोरसने आत्म्याचे अमरत्व मान्य केले होते. आत्म्याचे ज्ञतत्त्व (nous), दृकतत्त्व (phren) आणि भावनिक तत्त्व (thumos) असे तीन भाग असतात. आत्म्याचे ‘ज्ञतत्त्व’ अमर असून इतर दोन भाग विनाशी असतात. पायथॅगोरसला पुनर्जन्म संकल्पना मान्य होती. पायथॅगोरसने पुनर्जन्म संकल्पना मान्य केली होती, याचे अनेक पुरावे मिळतात. प्लेटोचा शिष्य हेराक्लायडीस (इ.स.पू.सु. ३९०‒३२२)च्या मते पायथॅगोरसला पूर्वजन्माचे ज्ञान होते. तो स्वत:च्या पूर्वजन्माविषयी सांगताना असे म्हटले जाते की, पायथॅगोरस प्रथम अॅथलिडस व नंतर होमर युद्धांतील वीर युफॉर्बस म्हणून जगला. त्याला अनेक वनस्पती, प्राण्यांच्या शरीरात जन्म घेतल्यानंतर डेलियन मच्छिमार पायह्रस म्ह्णून जन्म घ्यावा लागला व त्यानंतर तो पायथॅगोरस म्ह्णून जन्माला आला.
pythagoras history in marathi
पायथॅगोरसने त्याच्या पूर्वजन्माच्या स्मरणज्ञानाने अनेकांना त्यांचे पूर्वजन्म सांगीतले होते. पूर्वस्मरणाची शक्ती असणे हे एक मोक्षाचे साधन मानले जात असे. केवळ तत्त्वज्ञांकडेच अशा प्रकारची शक्ती आहे, असे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात मानले आहे. आत्मा हा पशु, पक्षी, वनस्पती अशा कोणत्याही योनिमध्ये जन्म घेऊ शकतो. अनेक विविध जन्मांच्या प्रवासानंतर मनुष्य योनीत प्रवेश केल्यानंतर मुक्ती मिळते, अशी मान्यता होती. आत्मा हा अमर असून त्याला अनेकदा पुनर्जन्माच्या फेऱ्यातून जावे लागते आणि इंद्रिय निग्रह, वैराग्य व विविध प्रकारचे कर्मकांड आणि व्रते यांच्या योगाने शुद्ध स्वरूप प्राप्त झाल्यावरच त्याला मुक्ती मिळते, या तत्त्वावर त्याच्या पंथाची शिकवण आधारलेली होती. पायथॅगोरस पंथाची ही शिकवण म्हणजे त्या काळच्या इतर तत्त्वज्ञानाप्रमाणे केवळ सत्याचा बौद्धिक शोध नसून मुक्तीकडे नेणारी एक जीवनप्रणाली होती. तथापि या बाबतीत तत्त्वज्ञानापेक्षा त्याचे साम्य गूढवादी पंथांशीच जास्त होते. पायथॅगोरस पंथाच्या शिकवणुकीत अनेक निषिद्ध गोष्टींचा व गूढ समजुतींचा प्रसार केला जाई. या पंथाच्या विचारांत सर्व प्रकारच्या जीवनाची एकात्मता अभिप्रेत असून प्राणी व वनस्पती जीवनांत सर्वत्र एकच जीवनाधार वास करीत असतो, असे या पंथीयांचे म्हणणे होते.
झीनॉफनीझ (इ.स.पू.सु. ५६०‒४७८) च्या म्हणण्यानुसार एकदा पायथॅगोरसने एका कुत्र्याला मारताना पाहिले व अत्यंत करुणेने म्हणाला की, कृपया याला मारू नये, हा माझ्या मित्राचा आत्मा आहे. एम्पेडोक्लीझ (इ.स.पू.सु. ४९०‒४३०) हा पायथॅगोरसच्या संप्रदायातील एक तत्त्वज्ञदेखील पूर्वज्ञानस्मरणाच्या दैवी शक्तीने अवगत होता. तो स्वत: एक मुलगा, मुलगी, झुडुप व मासा म्हणून अगोदर जन्म घेतल्याचे सांगत असे. त्याच्या मते पुनर्जन्माचे चक्र हे ३०,००० वर्षांचे असते व त्यानंतर मनुष्य मुक्त होतो. आत्म्याची परिशुद्धी संभवल्यानंतरच त्याला मोक्ष मिळणे शक्य होते. मोक्षाच्या साधनांचा विचार पायथॅगोरसने केला होता. वैराग्य, विवेक, योग्य आहार ही मुक्तीची साधने होत. शाकाहारदेखील आत्म्याच्या शुद्धीसाठी महत्त्वाचा मानला गेला. अत्यंत गूढ नियम त्याने आहाराबद्दल केलेले दिसून येतात. ‘कडधान्ये आहारातून वर्ज्य करणे’ हा त्याच्या गूढ नियमावलीतील एक नियम. प्रॉर्फिरीच्या मते “द्विदल धान्ये ही प्राणशक्तीने युक्त असून त्यामध्ये पूर्वजांचा वास असतो.” त्यामुळे कडधान्यांचे ग्रहण पुनर्जन्माचे कारक असते, असा समज असावा. गणित व संगीताने आत्म्याची शुद्धी होते. विश्वातील सुसंगती या दोन शास्त्रांच्या आधारे ज्ञात होते. अखंड विश्वातील सुसंगती समजून घेणे, हीच मुक्ती होय.
Geometry scientist pythagoras information in marathi
पायथॅगोरस पंथीयांनी आपली श्रद्धेय तत्त्वे व गणिताचा सखोल अभ्यास यांच्या आधारे, त्यांच्या समकालीनांपेक्षा, विश्वरचनेसंबंधी काही महत्त्वाच्या बाबतींत निराळा असलेला दृष्टीकोन मांडला. यांपैकी सर्वांत महत्त्वाचा विचार म्हणजे पृथ्वी हा विश्वाच्या केंद्राभोवती फिरणारा एक गोल आहे, हा होय. या प्रणालीच्या केंद्रभागी अग्नी असून आपण पृथ्वीच्या ज्या अर्धगोलात राहतो, तो भाग त्याच्यापासून (अग्नीपासून) दूर वळलेला असल्यामुळे तो अग्नी आपणाला दिसत नाही (यावरून पृथ्वी ही केंद्रीय अग्नीभोवती एक दिवस व एक रात्रीत एक प्रदक्षिणा करते असा विचार यात अभिप्रेत असल्याचा निष्कर्ष काढता येतो). सूर्य हा अग्नी परावर्तित करतो. विश्वकेंद्राच्या जवळ एक प्रतिपृथ्वी असून ती या केंद्राभोवती अल्पशा कक्षेत प्रदक्षिणा घालते (ही संकल्पना चंद्रग्रहणांच्या तुलनात्मक वारंवारतेच्या स्पष्टीकरणार्थ समाविष्ट केलेली असावी). विश्वकेंद्रापासून क्रमाक्रमाने पृथ्वी, चंद्र, सूर्य व त्यानंतर इतर पाच ग्रह आणि या ग्रहांच्या पलीकडे स्थिर तार्याचा गोल आहे. सर्व विश्व हे गोलाकार असून त्याचे आकारमान सीमित आहे व त्याबाहेर अनंत पोकळी आहे. या सर्व सिद्धांतांपैकी पायथॅगोरसचा स्वतःचा भाग किती होता, हे ज्ञात नाही. कारण पायथॅगोरस स्वतः पृथ्वी हीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, असे मानीत असल्याचे दिसते. विश्वरचनेसंबंधीचा हा दृष्टीकोन सर्व पंथांचा असल्याचा प्रचार करण्यात येत असला, तरी काही लेखक यापैकी बराचसा भाग फिलोलेअस (इ.स.पू.सु. ४००) याचा, तर काहीजण सेरक्यूज येथील एक रहिवासी हिसेटास याचा असल्याचे मानतात. विश्वरचनेचे हे चित्र निकोलेअस कोपर्निकस याच्या सिद्धान्ताच्या दिशेने पहिले पाऊल होते आणि कोपर्निकस याने स्वतः तसा निर्देशही केलेला होता.
अक्षय जाधव
कडूस, राजगुरुनगर
pythagoras information Biography in Marathi पायथागोरस ची माहिती मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
pythagoras information Biography in marathi
पायथागोरस ची माहिती विचार
Geometry scientist pythagoras information in marathi
pythagoras theorem information in marathi
pythagoras pramey in marathi
pythagoras history in marathi
पायथागोरस ची माहिती
Scientist information in marathi language
वैज्ञानिक शास्त्रज्ञ माहिती मराठी
Leave a Reply