सामान्य कुटुंबात जन्मलेले निळू फुले यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सोपा नव्हता, जाणून घ्या. Nilu phule information Biography in Marathi निळू फुले मराठी माहिती

माहाराष्ट्राचा लाडका खलनायक. हो मी लाडका बोलतोय तेही खलनायकाला निळूभाऊंच्या अभिनयाची जादुच अशी होती कि ते दिसले तरी बायका दूर जायच्या. त्यांनी साकारलेला सरपंच सर्वांच्या ध्यानात राहीला.’बाई वाड्यावर या’ या संवादापुरतेच आपण निळू भाऊ यांना मर्यादित ठेवले आहे ते तर अभिनयाचे चालते फिरते विद्यापीठ होते. मराठी चित्रपट सृष्टीत असा अष्टपैलू कलाकार क्वचितच झाला असेल पण प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला तो त्यांच्यातला खलनायक किंवा सरपंच. त्यांच्याशिवाय एके काळी मराठी चित्रपटसृष्टीची कल्पना सुद्धा केली जात नव्हती असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच निळू फुले.
Nilu phule information Biography in Marathi
निळू फुले यांचे बालपण
त्यांचे पूर्ण नाव नीलकंठ कृष्णाजी फुले किंवा निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यावेळी भारत देश हा पारतंत्र्यात होता. निळू फुले यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परीस्थित गेले. त्यांचे वडील कृष्णाजी राव हे भाजी विकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पुढचे शिक्षण निळूभाऊंना परवडण्यासारखे नव्हते म्हणून नाईलाजाने त्यांना मॅट्रिक नंतर आपले शिक्षण थांबवावे लागले. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वानवडी पुणे, येथील लष्करी महाविद्यालयात आपले पारंपरिक माळी काम करण्यास सुरुवात केली. निसर्गाची आणि माळी कामाची पहिल्यापासूनच आवड असलेल्या निळूभाऊंचं मन तिथे खूपच रमलं. लष्करी महाविद्यालयात काम करताना त्यांनी स्वतःची नर्सरी उघडण्याच स्वप्न उराशी बाळगलं पण घरचं दारिद्रय आणि खांद्यावर असलेला कुटुंबाचा भार या मुळे त्यांचं स्वप्नं कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. वाचनाची आवड असल्यामुळे ते माळीकामातून सवड मिळाली की पुस्तके वाचायचे. माळीकामातून त्यांना महिन्याला अवघा ८० रुपये पगार मिळत होता पण देशभक्तीची जाणीव असलेले निळूभाऊ त्यातून दहा रुपये न चुकता राष्ट्र सेवा दलाला देत होते.
१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालू होती. याच दरम्यान त्यांच्यातील कलाकार जागा झाला आणि त्यांनी सेवादलासाठी एक वगनाट्य लिहिले त्याचे नाव होते येऱ्या गबाळ्याचे काम न्हवे. हेच वगनाट्य त्यांचं आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. या वगनाट्याने त्यांना खूपच लोकप्रियता मिळवून दिली.
स्वतः मध्ये लपलेल्या कलाकाराची जाणीव झाल्यानंतर त्यांनी माळी काम सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच; शिवाय त्यांच्या अभिनयकौशल्याची चुणूक इतरांना जाणवली. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकामुळे त्यांना एक गाव बारा भानगडी या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली व त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णा’ ही विनोदी खलनायकाची भूमिका अत्यंत गाजली. त्यांच्या नाट्य-कारकिर्दीत विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या नाटकातली त्यांची खलनायकी ढंगाची भूमिका विलक्षण प्रभावी ठरली. या नाटकाचे, त्यातील आशयाचे आणि निळू फुले यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी स्वागत केले. पुढारी पाहिजे, बिन बियांचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या. ही सर्वच लोकनाट्ये त्यात्या काळात गाजली.
त्यानंतर ’पुढारी पाहिजे’ ’बिन बियांचे झाड’ या लोकनाटयांमधनं त्यांच्या अभिनयाला नवे कंगोरे लाभले.
सिंहासन, पिंजरा, एक गांव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यांची बहुतेक चित्रपटात खलनायकाची भूमिका आहे. विशेष म्हणजे सखाराम बाईंडरचे त्यांचे चित्रण. त्यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांची ‘नथू मामा’ ची भूमिका असलेल्या ‘कुली’ या हिंदी चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चनसोबत काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायक म्हणुन आपल्या डोळयासमोर पहिले आणि शेवटचे नाव येते ते निळु फुले यांचेच. त्यांचा दणदणीत असा आवाज आणि संवाद साधण्याची कला अजून तरी कोणाला जमली नाही. असे म्हटले जाते की चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकांमध्ये त्यांनी हुबेहूब केलेले अभिनय इतके अतिरेकी होते की वास्तविक जीवनातल्या स्त्रियासुद्धा असा विचार करून त्यांचा तिरस्कार करत. त्यांच्या या कामामुळेच त्यांना मोठी प्रशंसा मिळाली.
सलग ४० वर्षे ते चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर सक्रिय होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १४० हून अधिक मराठी चित्रपटांमधून व १२ हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या भूमिकांपैकी सामना, सिंहासन, शापित, पुढचं पाऊल यांतील भूमिका विशेष लक्षणीय मानल्या जातात. सामना चित्रपटातील ‘हिंदुराव धोंडेपाटील’ ही व्यक्तिरेखा साकारून निळूभाऊंनी खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची जरबयुक्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री, मग्रूर भूमिकेसाठी पूरक ठरले. त्यांच्या कारकिर्दीची अभिनयाइतकीच महत्त्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध व सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशी आपली नाळ अखंडित ठेवली होती. महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सलग ३ वर्षे (१९७३,१९७४,१९७५) पुरस्कार मिळाले. १९९१ मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. सूर्यास्त या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. नाटक आणि सिनेमा या दोन्हीही क्षेत्रांत निळूभाऊंनी स्वत:च्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक व सूक्ष्म होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने वापर केला.
निळू फुले यांचे एसोफेजियल कॅन्सरने १३ जुलै २००९ रोजी निधन झाले. त्यावेळेस ते ७८ वर्षांचे होते. महाराष्ट्राने एक उत्कृष्ट असा खलनायक गमावला.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो, Nilu phule information Biography in Marathi ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply