आजच्या पिढीला देशभक्तिवर चित्रपट म्हटले की अक्षय कुमार याचेच नाव आठवते. पण मागच्या पिढीला देशभक्तिवर चित्रपट विचारले तर एकच नाव येते ‘मनोज कुमार’. भारत का रहने वाला हु भारत का गीत सुनाता हूँ हे ‘पूरब और पच्छिम’ सिनेमातील गीत अजूनही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.

Manoj kumar information Biography in marathi मनोज कुमार माहिती मराठी
देशभक्तिपर चित्रपटांमुळं मनोज कुमार यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘भारत कुमार’ आणि ‘क्रांती कुमार’ ही नावं दिली. भारताच्या पंतप्रधानांच्या सांगन्यावरुन चित्रपटाची निर्मिती करणारे मनोज कुमार आज त्यांच्याच विषयी माहिती घेऊया.
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा उत्तर-पश्चिम सीमा प्रांतातील एबोटाबाद येथे झाला. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर त्यांनी आपल्या परिवारासह दिल्ली येथे स्थलांतर केले. तिथेच त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मूळ नाव हरिकिशन गिरीगोस्वामी. तारुण्यात असताना शबनम या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या भूमिकेचा त्यांच्या मनावर इतका प्रभाव पडला की, त्या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्या मनोज ह्या नावावरून त्यांनी स्वतःचे नामकरण ‘मनोज कुमार’ असे केले. अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी दिल्ली सोडली आणि मुंबईत प्रवेश केला.
Manoj kumar information Biography in marathi
मनोज कुमार माहिती मराठी
१९५७ मध्ये आलेल्या फॅशन या चित्रपटात २० वर्षीय मनोज कुमारांनी ८० वर्षीय वृद्ध भिकाऱ्याची भूमिका पार पाडून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६० मध्ये आलेल्या कांच की गुडिया या चित्रपटामध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले. त्यानंतर पिया मिलन की आस, रेशमी रुमाल, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांचे आदर्श दिलीपकुमार यांच्यासोबत त्यांनी आदमी या चित्रपटात भूमिका साकारली. १९६४ सालच्या राज खोसला दिग्दर्शित वो कौन थी या संगीतमय रहस्यरंजक चित्रपटातील भूमिकेने आणि या चित्रपटाच्या व्यावसायिक यशाने मनोज कुमार यांची हिंदी चित्रपटसृष्टीत नवी ओळख निर्माण झाली. साठचे दशक मनोजकुमार यांच्यासाठी यशस्वी ठरले. या काळात आलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना त्यांच्यातला एक अष्टपैलू अभिनेता पाहावयास मिळाला. हनीमून, अपना बनाके देखो, नकली नवाब, पत्थर के सनम, साजन आणिसावन की घटा या श्रृंगारिक; शादी, गृहस्थी, अपने हुवे पराए, नीलकमल आणि आदमी या सामाजिक; तर गुमनाम, अनिता आणि वो कौन थी या भयपटांनी प्रेक्षकांच्या मनावर या दशकात राज्य केले.
१९६५ मध्ये आलेल्या केवल कश्यप निर्मित आणि एस. राम शर्मा दिग्दर्शित शहीद या चित्रपटात क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जीवनपटाचा आढावा घेणाऱ्या चित्रपटात त्यांनी ‘भगतसिंग’ यांची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यास मनोजकुमार नवी दिल्ली येथे गेले असता, पंतप्रधानांनी त्यांना ‘जय जवान जय किसान’ या लोकप्रिय बोधवाक्यावर आधारित चित्रपट तयार करण्यास सांगितले आणि मनोजकुमार यांनी उपकार या चित्रपटाची कथा लिहिली व चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. गुलशन बावरा लिखित कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले “मेरे देश की धरती” हे गाणे समाजाच्या तळागाळापर्यंत लोकप्रिय झाले आणि तेव्हापासून प्रत्येक राष्ट्रीय सणात हे गाणे वाजवले जाऊ लागले. या चित्रपटात मनोजकुमार यांनी अभिनेते प्राण यांना ‘मंगलचाचा’ या व्यक्तिरेखेची भूमिका दिली आणि त्यांना खलनायकाच्या प्रतिमेबाहेर काढले. या चित्रपटाने मनोजकुमार यांना ‘भारतकुमार’ अर्थात ‘देशभक्तीपर चित्रपटाचा नायक’ अशी प्रतिमा दिली आणि मग तीच त्यांची ओळख झाली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या निर्मिती आणि दिग्दर्शनात देशभक्ती हा विषय केंद्रस्थानी ठेवला आणि पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपटांचे सातत्य ठेवले. त्यांतील पूरब और पश्चिम , शोर , रोटी कपडा और मकान , क्रांती या त्यांच्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या चित्रपटांचा एक हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला; मात्र त्यानंतरच्या क्लर्क , जयहिंद या त्यांच्या चित्रपटांना यश मिळाले नाही.
१९८१मध्ये आलेल्या मनोज कुमार यांच्या ‘क्रांती‘ या चित्रपटानं बॉक्सऑफीसवरील सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते.
मनोज कुमार यांच्याकडे कलासृष्टीत मोठ्या अदबीनं पाहिलं जातं. अशा या कलाकारासोबतचा अमिताभ बच्चन यांचा किस्सा अनेकदा चर्चांच्या वर्तुळात पुनरिज्जिवीत केला जातो. असं म्हटलं जातं की, चित्रपटांमध्ये वारंवार अपयश आल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी या कलाविश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा खुद्द मनोज कुमार यांनी त्यांना थांबवलं आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात त्यांना संधी दिली. अमिताभ बच्चन या कलाविश्वात फार पुढचा पल्ला गाठणार हे त्यांनी फार आधीच हेरलं होतं. मुख्य म्हणजे त्यांची ही पारखी नजर खरी ठरली आणि पाहता पाहता या कलाविश्वात अमिताभ बच्चन यांनी आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला.
मनोजकुमार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांतील गाणी हा विशेष कौतुकाचा भाग ठरला. ‘मेरे देश की धरती’ या गाण्याप्रमाणेच कसमे वादे प्यार वफा सब (उपकार), पूरवा सुहानी आयी रे, कोई जब तुम्हारा ह्रृदय तोड दे, दुल्हन चली, भारत का रहनेवाला हूँ (पूरब और पश्चिम), पानी रे पानी तेरा रंग कैसा, एक प्यार का नगमा है (शोर), महंगाई मार गयी (रोटी,कपडा और मकान) या गाण्यांचा त्यात समावेश होतो. रोटी, कपडा और मकान या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. तर देशभक्त नायक ही त्यांची प्रतिमा अशोक भूषण दिग्दर्शित शिर्डी के साईबाबा या भक्तीपटासाठी उपयुक्त ठरली. सत्तरच्या दशकात नायक म्हणून अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून मनोज कुमार यांनी भूमिका साकारल्या. त्यांतील पहेचान, बेईमान, संन्यासी, दस नंबरी या चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी यश संपादन केले. राज कपूर दिग्दर्शित मेरा नाम जोकर या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. साठ आणि सत्तरच्या दशकांतील अनेक आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. विजय भट्ट, राज खोसला, राजा नवाथे, राम महेश्वरी, सोहनलाल कंवर, रवी टंडन ही नावे त्यात आहेत. मनोजकुमार यांनी रूपेरी पडद्यावर साकारलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. मेरा रंग दे बसंती चोला (शहीद), तेरी याद दिलसे भुलाने चला हूँ, अल्ला जाने क्या होगा आगे (हरियाली और रास्ता), नसीब मे जिसके जो लिखा था, रहा गर्दीशो मे (दो बदन), मेहबूब मेरे मेहबूब मेरे, पत्थर के सनम (पत्थर के सनम), जाने चमन शोला बदन (गुमनाम), चाँद सी मेहबूबा, मैं तो एक ख्वाब हूँ (हिमालय की गोद में), आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ (पहेचान), जय बोलो बेईमान की (बेईमान), एक तारा बोले (यादगार) इत्यादी गाण्यांचा त्यात समावेश आहे. चित्रपट क्षेत्रात यशाची शिखरे गाठत असताना मनोज कुमार यांना १९८१ च्या क्रांती या चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनही केले. हा चित्रपट यशस्वी ठरला. तद्नंतर मात्र त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.
१९९५ च्या देशवासी, मैदान ए जंग या चित्रपटांनंतर त्यांनी चित्रपटांतून अभिनय करण्याचे थांबविले, तर १९९९ च्या जय हिंद या चित्रपटानंतर त्यांनी निर्मिती व दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली. चित्रपटसृष्टीच्या बदलत्या कार्यशैलीशी जुळवून घेणे खूप कठीण आहे असे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतला.
मनोजकुमार यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी १९९२ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा नागरी पुरस्कार देऊन गौरविले. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ४० वर्षांच्या कारकीर्दीसाठी १९९९ मध्ये ‘फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्काराने २०१६ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले.
अक्षय जाधव
कॉलेज कट्टा
मित्रांनो,Manoj kumar information Biography in Marathi मनोज कुमार माहिती मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply