लक्ष्मीकांत बेर्डे यांना विनोदी अभिनेता म्हणून महाराष्ट्र ओळखतो पण त्याच्यामध्ये अभिनयाची समज क्षमता प्रचंड होती तो ते पात्र कसे जगायचा जाणून घ्या Lakshmikant Berde information Biography in Marathi लक्ष्मीकांत बेर्डे माहिती मराठी.
Lakshmikant Berde information Biography in Marathi
लक्ष्मीकांत बेर्डे माहिती मराठी
“तो आला त्याने पाहिले आणि त्याने जिंकून घेतले सारं”. म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका “लक्ष्या”. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.
त्याने ‘धुमधडाक्यात’चित्रपट सृष्टीत आगमन केले. धडाकेबाज अभिनय केला आणि एकामागोमाग दे दनादन सुपरहिट चित्रपट दिले. महेश-लक्ष्या च्या जोडीने लहानपणी आमच्या शनिवार-रविवार ची सांध्यकाळ आनंदित केल्या.
४ वाजता लक्ष्या चा चित्रपट पाहने हे आमचे जणु समीकरणच झाले होते. म्हणूनच या आपल्या आजही लाडक्या असणाऱ्या लक्ष्यावर लिहिन्याचा प्रयत्न.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बालपण
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी रत्नागिरी, मुंबईत झाला. त्यांचे बालपण दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे गेले. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच सर्वाना आवडणारा होता. त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. तो एक उत्तम विनोदी कलाकार आहे. हे त्यांनी आपल्या अभिनयामधून सर्वाना दाखवून दिले. मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या लक्ष्याने युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं. याच दरम्यान कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकांमध्ये सहभाग घेत होते. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्यांनी बॅक स्टेजवरही काम केलं. या काळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा प्रवास सुरु असतानाच त्यांच्या ‘टूरटूर’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं.
मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रवास
त्यानंतर त्यांना महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. ‘टूरटूर’ आणि ‘धुमधडाका’ या दोन्ही माध्यमातून त्यांनी आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. नाटकाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्र’ हे नाटक स्वीकारले.
मराठी नाटक, चित्रपटांचा हा प्रवास सुरु असतानाच ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामधून त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्यांनी काम केले. मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’, ‘एक होता विदूषक’ असे अनेक चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा होता. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली होती. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणार्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला तो ‘टुरटुर’ या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे द्वार’, ‘कार्टी चालू आहे’ ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले.
‘लक्ष्या’ या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन् लक्ष्या नाही, असे सहसा घडलेच नाही. कारण, कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, पछाडलेला, खबरदार पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही त्यांनी बनवाबनवी सह अनेक चित्रपट केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला कॅश करण्यासाठी ‘चल रे लक्ष्या मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयुष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फुलविले. मराठीत प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असतानाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा ’मैने प्यार किया’ हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण, अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांना हिंदीत क्वचितच मिळाली. मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ’एक होता विदूषक’ या गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. विनोदी अभिनेता अशी जरी त्यांची ओळख असली ते त्यांनी कित्येक गंभीर भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले.
‘हम आपके है कौन’ मधील लक्ष्याने निभावलेली भूमिका काबिलेतारिफ होती. नोकराच्या भूमिकेत असणारा संयम व भावनाशीलता त्यांनी उत्तमरीत्या साकारली होती. ‘झपाटलेला’ मधील त्यांची भूमिका विलक्षण गाजली. ‘तात्या विंचू आणि लक्ष्या’ यावर आजही मोठे विनोद होतात. लक्ष्मीकांत बेर्डे कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशिरा झोपले, तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे. लक्ष्मीकांत यांचा शॉट आहे म्हटल्यावर त्यांच्या हिरोईन्ससुद्धा वेळेत सेटवर हजर असायच्या. ‘एक होता विदूषक’च्या अपयशामुळे लक्ष्मीकांत बेर्डे नंतर खचून गेले होते. त्या चित्रपटाच्या अपयशाच्या दुःखातून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते. हेदेखील फार कमी जणांना ठावूक आहे. विनोदी स्वभाव, वेगळीच बोलण्याची पद्धत, शरीराची विशिष्ट लकब यामुळे त्यांच्या प्रत्येक भूमिकेला एक वेगळाच रंग यायचा. ते प्रत्येक भूमिका अक्षरशः जगायचे. अभिनय हा त्यांच्यात इतका ठासून भरला होता की त्यांच्याविना त्यावेळी मराठी सिनेमा अपूर्ण वाटायचा. ज्या सिनेमात लक्ष्या असेल, तो सिनेमा सुपरहिट होणार ही खात्री असायची. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात लक्ष्याने साकारलेली बाई प्रचंड गाजली.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकारांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या सार्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. सगळ्यांना खळखळून हसविणार्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते सार्यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’ पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे, आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्या या विनोदाच्या बादशाहाची एक्झिट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती. या कलाकाराला जाऊन एवढी वर्षे झाली तरी मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्या या विनोदातल्या अवलिया हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Lakshmikant Berde information Biography in Marathi
Leave a Reply