
लढण्याचं बळ
माझा मित्र मला नेहमी म्हणत असतो जगणं म्हणजेच लढणं. समस्या नाहीत, लढणं नाही असा मनुष्य असू शकत नाही. जगायचं म्हटलं की बळ लागतंच. जगायचं बळ मिळतं अन्नपदार्थमुळं. लढायचं बळ कुठून मिळतं? आई,वडिलांकडून, शिक्षकांकडून, पती अथवा पत्नीकडुन, सहवासात येणारांकडुन. आणखी? जगण्याचं बळ निर्जीव वस्तूंकडुनही मिळतं. एक चित्र पाहिलं-भेगाळलेली जमीन, त्या जमिनीत एक रोप- छानसा गुलाब उमललेला. हे फुल म्हणजेच लढण्याचं बळ. कागद आणि पेनही देऊ शकतो लढण्याचं बळ. कसं? त्या कोर्या कागदावर पेनानं लिहा-‘माझा जन्म लढण्यासाठी झाला आहे. मी लढवणारच. कदापिही रडणार नाही, निराश होणार नाही-हे बारा शब्द म्हणजेच लढण्याचं बळ. अनेक जण खचतात, निराश होतात, रडतात अशावेळी जवळच्या व्यक्तीने खांद्यावर ठेवलेला हात, घेतलेली गळाभेट, हातात घेतलेला हात म्हणजेही लढण्याचं बळ. परिस्थितीसुद्धा लढण्याचं बळ देऊ शकते. दशरथ मांझी या एकट्या माणसानं बलाढ्य डोंगर सातत्याने आठ ते नऊ वर्ष प्रयत्नपूर्वक फोडलाच. डोंगर फोडून रस्ता तयार केला खरं तर त्याच डोंगराने त्याच्या पत्नीचा जीव घेतलेला पण परिस्थितीत झाली लढण्याचं बळ. गरीब असो, श्रीमंत असो प्रत्येकाला लढावं लागतं. लढणं हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे आपण स्वतःला सांगायलाच पाहिजे. कुस्तीची अटीतटीची लढत चालू. आज त्याची, जिंकण्याची हॅटट्रिक होणार पण परिस्थिती प्रतिकूल. स्पर्धक पहिलवान पूर्ण ताकदीनिशी, तयारीनिशी लढतोय. आता ह्याचा धीर खचू लागला. मी हरणार हे ह्याच्या लक्षात आलं. नेमकं त्याचवेळी ह्याला शिकवणाऱ्या वस्तादाची आणि त्याची नजरानजर झाली. ह्याच्यात लढण्याचं प्रचंड बळ आलं. पुढच्या पाच मिनिटांत त्याने स्पर्धक पहिलवानाला आस्मान दाखवलं. एखादा सकारात्मक, प्रेरणादायी लेख, कथा,कविता, व्याख्यानसुद्धा लढण्याचं बळ देऊ शकतो. एखादा चित्रपट, लघुचित्रपट अर्थ शॉर्टफिल्म एवढंच नाही तर एखादं वाक्यसुध्दा लढण्याचं बळ देऊ शकतं. एक व्यक्ती तर तुम्हाला हमखास लढण्याचं बळ मिळवुन देणारच. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. लढण्याचं बळ माझ्यातच आहे. आजपर्यंत मी लढलोय, येथुन पुढेही लढणारंच आहे कारण जगणं.म्हणजेच लढणं. लढण्याचं बळ कधी शारिरीक असतं तर कधी मानसिक.
लेखक-सुनील वनाजी राऊत,
-कॉलेज कट्टा
Leave a Reply