सकार-१२

चांगलं….
तीन आसनी रिक्षात बळंबळं ६ व्यक्ती बसवल्या. रिक्षा रस्त्यावरून धावतेय पण प्रत्येकाला धाकधुक…उगाच बसलो ह्या रिक्षात असं सांगणारा प्रत्येकाचा चेहरा. रिक्षा ड्रायव्हरचा मोबाईल वाजला, त्याने स्क्रीनवरचा नंबर न पाहताच फोन घेतला. बोलतोय….रिक्षा चालवतोय….अखेर धडकला एका टु व्हिलरवाल्याला. भरभर माणसं जमली. आम्ही रिक्षातले सगळे उतरलो. त्या टु व्हिलरवाल्याला जमलेल्यांपैकी दोघांनी उचललं. एकानं गाडी उभी केली. रिक्षावाला म्हणाला,”बसा. त्याला काहीही झालेलं नाही.” मी, न राहवुन रिक्षावाल्याच्या थोबाडीत मारली. रिक्षातले प्रवासी आणि जमलेले अवाक्. एक प्रवासी म्हणाला,”आणखी दोन थोबाडीत मारा. नालायकाला समजत नाही एक तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घ्यायचे शिवाय मोबाईलवर बोलत रिक्षा चालवायची. निव्वळ बावळटपणा आहे. स्वतःची काळजी जो घेत नाही तो इतरांची काळजी कधीच करणार नाही.” उर्वरित प्रवाशांनी दुजोरा दिला. टुव्हिलरवाल्याला मी शाब्दिक आधार दिला. कुठं लागलं ह्याची चौकशी केली. तो म्हणाला,”चुक अगदी शंभर टक्के रिक्षावाल्याचीच आहे.” पण रिक्षावाला चुक कबुल करेना. मी, पुन्हा रिक्षावाल्याला झापडंवलं. “मी कोण आहे ते उद्या तुला सांगतो. आत्ता टुव्हिलरवाल्याचं नुकसान भरुन दे.” रिक्षावाला टरकला. “माझी चुक झाली. असं परत होणार नाही.” बाकी प्रवासी आणि जमलेले निघुन गेले. “ह्याचं नुकसान भरुन दे नाहीतर पोलिसांना बोलावतो.” मी मोबाईल हातात घेऊन नंबर्स डायल करणार तेव्हा रिक्षावाला माझे पाय धरु लागला. “साहेब, आजपासून मी, कधीच रिक्षा चालवतांना मोबाईलवर बोलणार नाही. माफ करा मला.” टु व्हिलरवाल्याने त्याला माफ केलं. मी म्हणालो,”तू परत असा कुणाला धडकलास तर मग तू आहे आणि मी. एक कायमचं लक्षात ठेव चांगलं वागशिल तरंच तुझं चांगलं होईल. रिक्षात येणा-या प्रवाशांबरोबर व्यवस्थित बोलावं. आज सुदैवानं कुणालाही काहीही झालं नाही पण झालं असतं तर? तुझ्या घरचे तुझी आतूरतेनं वाट पाहात असतात हे चांगलं चित्र कायम डोळ्यासमोर आणत जा. मोबाईलपेक्षा जीव महत्वाचा आहे हे कायमचं लक्षात ठेव.” चांगल्याची आणखी काही उदाहरणं टु व्हिलरवाल्यानंही त्याला सांगितली. रिक्षावाल्यानं मला माझ्या स्टॉपवर उतरवलं.
वर्षभरानंतर योगायोगाने मला पुन्हा त्याच रिक्षातुन प्रवास करावा लागला. रिक्षावाला म्हणाला,”साहेब, त्या दिवसानंतर माझ्यात कमालीचा बदल झालाय. चांगल्याचं फळ नेहमी चांगलंच असतं ह्याचा अनुभव घेतोय मी. तुमचे मनापासून आभार.”
लेखक-
सुनील वनाजी राऊत,
कॉलेज कट्टा
Leave a Reply