
गाव- गप्पा जालना जिल्ह्यात पुनेगाव आहे. माझं आजूळ. माझं बरचस बालपण तिकडे गेलेलं.आईला भाऊ नाही. एक लहान बहिण आजोबा माझ्या जन्माच्या आधीच वारलेले.तसं बघायला गेलं तर पन्नास साठ घराचं हे गाव.या गावाभोवती जी जमीन आहे त्यात मुग,मटकी,भुईमूग,तीळ ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात…
आज इथे माझं कुणीच नाही.आजी गेली.मावशी संसाराला लागली.नंतर या गावाशी कधी नीट भेट झाली नाही. पण ते आठवत मात्र राहतं.खूप साधी माणसं माणसं इथं होती.गावात आज दिसतात तशी दुकानं नव्हती.घरगूती किराणा दुकाना होत्या एकदोन…
कोंबड्याच्या आवाजानं दिवस उगायचा.शेणाचा सडा,तुळशीजवळ लावलेली अगरबत्ती, चुलीवर आदनाला घातलेला चहा,बटरपाव घेऊन येणाऱ्या चाचाची वाट बघत कितीतरी वेळ बसून रहायचो.तिथच एका दगडावर अंघोळ घालायची आजी.अंगणात मोठ्ठ पिंपळाचं झाड होतं.दुपारी त्या पानांची सळसळ ऐकायला जाम भारी वाटायचं.सगळी लोकं कामाला गेली की गावं भकास व्हायचं.आम्ही शेंबडीपोरं तेवढी उरायचो.मग मनाला येईल ते खेळ खेळायचे.अगदी खराच्या पाठिमागे मुगाची शेती होती.मनसोक्त शेंगा खात बसायचो.कंटाळा आला की मग परत अंगणातल्या पिंपळाखाली आभाळाला बघत पडून रहायचं.कधी कधी झोप लागून जायची ते थेट आजी आली की तिच उठवायची .शेतातून आल्या आल्या चहा घेणं हे तिचं पहिलं कामं…अंगणाला कुंपण नव्हतं…त्यामुळे आजुबाजुची सगळी घरं दिसत होती.सगळ्यांच्या चुल्ही बाहेर होत्या.चहा घेत गप्पा मारायची आजीला खूप सवय.इकडचं तिकडं ऐकू जावं म्हणून मोठ्यानं बोलायची ती…
गावाचा व्यवहार खूप साधा सिंपल होता.आपण आज ज्या बलुतेदारी बद्दल ऐकतो ती मी प्रत्यक्ष बघीतलीय त्या गावात.पैशाबद्दल फारसं कुणी बोलायचच नाही.तिथं एक साधी पद्धत होती.धान्य देऊन गरजेच्या वस्तू घेतलं जात होतं.सकाळी चहासाठी साखर आणायची असेल तर एक ग्लास मुग,गहू किंवा जे धान्य असेल ते घेऊन जायचं त्यातच सारशखर,पत्ती आणि एक डबलरोटी,तोस किंवा खारी आणली जायची.माझ्यासाठी ही गम्मत होती.आधी आधी नवल वाटायचं या सगळ्या गोष्टीचं.नंतर हळूहळू कळत गेलं की इथले सगळेच व्यवहार असेच चालतात.हप्त्यातून एक डाँक्टर तिथं यायचा.कुणाला काही त्रास असेल तर अंगणातल्या पिंपळाच्या झाडाखालीच दवाखाना सुरु व्हायचा.तिथल्या माणसांशी तो खूपच मायेनं बोलायच…हक्कानं रागवायचा…म्हातारे, म्हातारं अशीच हाक त्याच्या तोंडात असायची.मलाही एकदा त्यानं सुई टोचल्याचं आठवतय…त्याची फिस म्हणजे लोकं जे धान्य देतील तेवढच तो घ्यायचा…
गावापासून पाचशे मीटरवरुन एक डांबरी रस्ता जातो.कुठं जायचं असल तर तिथं वाट बघत बसावं लागतं.तिथच बाजूला एक टपरीवजा दुकान होतं.तिथं बोरकूट,चिंचा,सोनपापडी,तांदळाची पापडी,पेप्सी,शक्तीमानचे स्टिकर तेव्हा खूप फेमस होते.भारताला हनुमानानंतर तोच सुपरहिरो मिळाला होता.त्या दुकानात पोरांची हमेशा गर्दी असायची…
तिथं कधीच कुणाची भांडणं पाहिल्याचं मला आठवत नाही.कुणी कुणाचे पैसे बुडवले असही कधी घडलं नाही.चोरी झालीच तर ती धान्याची व्हायची.कामाचा मोबदला धान्यात व्हायचा म्हणून प्रत्येक घरात धान्य मुबलक प्रमाणात असायचं.टिव्ही एकाच घरात होता.रविवारी चार वाजता मराठी चित्रपट बघायला गाव जमा व्हायचा…टिव्ही पहायला आलेल्या सगळ्यांना चहा दिला जायचा…
तिथं प्रत्येक सन मिळुन करायचे.नवरात्रात तिथली पोर साड्या नेसून गाणी म्हणायची,नाचायची…मी ही एकदा नेसलो होतो साडी.पण नंतर सगळे हसत होते म्हणून मी रुसून बसलो होतो…
हेच गाव मला जवळच वाटतं म्हणून की काय दर सुट्टीत मला इथे यायला आवडायचं.किश्ना,गोपी,कान्हा आणि मी गोवर्धन. चारही नाव कृष्णाची.आम्हाला कृष्णाचे चार आवतार म्हणायचे.आम्ही कायम सोबत असायचो म्हणून दर सुट्टीत आमची मैत्री जास्त घट्ट होत गेली…
पुढे सगळच बदललं.तिथं दुष्काळ पडला.एक एक घर रिकामं झालं.कुणीच शिल्लक उरलं नव्हतं.आजीला आणि मावशीला इकडे आमच्याकडे घेऊन आलो.नंतर आजोळ असं उरलच नाही. त्या जागेच्या आठवणी तेवढ्या शिल्लक होत्या.अनेकदा तिथे जावसं वाटायचं.पण आपण लहान असतो तेव्हा आपलं म्हणणं फारसं कुणी मनावर घेत नसतं…नाही जाता आलं कधीच…
बारा वर्षानंतर जाण्याचा योग आला.मी खुप उत्साहात होतो.आपण परत त्या जागेत जाणार हि भावनाच अंगावर रोमांच आणत होती.आपण सगळ्यांना भेटणार,सगळेच खूप बदलले असणार…मोठे झाले असणार…मी कल्पना करत राहिलो…लहानपणी मी आलो की कृष्णा पळत,विशिष्ट पद्धतीने ओरडत यायचा माझ्याकडे तेव्हा त्याची शेंडी उडायची…वाटलं त्यानं बघीतल तर तो येईल…
गाव खूप बदललं होतं.टपरी होती तिथेच.बंद पडलेली.रस्त्याने गावा घुसलो.सगळे अनोळखी नजरेनं आमच्याकडे बघत होते.गावात निवडणूका सुरु होत्या.मला माझ्या घराकडं जायचं होतं.कृष्णाला भेटायचं होतं,गोपी,कान्हा …मला ओळखतील का ते…माहीत नाही. जाऊन भेटू तर खरं…
तिथे पाचोळ्याशिवाय काहीच नव्हतं.जवळ जवळ सगळ्याच घरांची पडझड झालेली.माझं मन उदासलं.इथं येईपर्यंत जो जो विचार मी केला होता तो सगळा फसला होता.माणसं नसली तरी तिथल्या नळवर आम्ही घातलेला धिंगाणा होता,पिंपळाचं झाड होतं,चुल्ही होत्या…मागच्या गल्लीतलं किराणामालाचं दुकान होतं.आता पैशाशिवाय काम होत नाही. दारु विकायलापण सुरु केलय त्यानं…त्याच्याच घरी मुक्काम केला…गावा कसं बदललं याची गोष्टी बराच वेळ सांगत होता तो…
मी पोरांबद्दल विचारलं.कृष्णा टायफॉईड ने गेल्याचं त्यानं सांगितलं.मला विश्वास बसेना…त्याला कळलं असतं मी आलोय तर नाक मनगटानं पुसत समोर येऊन उभा राहिला असता…म्हणला असता चल मुगाच्या शेंगा आणू…पण आता कसलं काय…?
आता तिथं राहवत नव्हतं.ज्या गावाच्या ओढीने इथवर आलो.ते नव्हतच तिथं.भग्न अवशेष होते फक्त…मिरवणुका असल्याने प्रचाराच काम जोरात सुरू होतं…गाड्या फिरत होत्या,फ्लेक्स लागले होते…झेंडे लटकलेले होते…सगळीच लोकं शहरात कामं करु लागली,शेती नकोशी वाटू लागली दुष्काळामुळे… पिकं बंद झाले,शेतं ओस पडले…आता व्यवहार पैशाने होतो…धान्य देऊन सामान घेणारी माणसं पैसे घेऊन मतं द्यायला कधी लागली हे त्यांनाही माहित नाही…!
संतोष गायकवाड
Leave a Reply