गाव| गाव गप्पा| कॉलेज कट्टा

मध्यंतरी काय झालं कुणास ठाऊक गाव नकोस वाटायला लागलं लोकांना. त्यांना वाटलं कि गावात राहून काही होणार नाही आपण शहराकडं गेलं पाहिजे. हे खरं होतं कि गावात करावं असं काहीच नव्हतं.नव्याला वाव नव्हता.जगण्यात नाविन्य नव्हतं.शिकायचं म्हटलं की गाव सोडावच लागतं.शिकायला बाहेर पडलं तरी घर आणि घरातली माणसं तिथच असतात.
हि गोष्ट ओस पडत चाललेल्या गावाची.
एखादा माणूस काहीच कामाचा नसला की त्याला लोकं टाळू लागतात,त्याच्याकडं दुर्लक्ष करु लागतात.तसच या गावांचं झालं.गरजा वाढल्या तशा लोकांना गाव सोडणं प्रगतीचं लक्षण वाटायला लागलं…
आणि मग गावांना ओसाड करुन प्रगती सुरु झाली.
गावातली म्हातारी बोडखी माणसं बंद दारांच्या घराच्या ओसरीला तासंतास पडून राहू लागली.पोरांचा कायम गलका असणारी गल्ली कधीच बोलत नाही…
जी गावातून गेली त्यांना गावं परकी वाटू लागली.चार पैशापुढं अंगातल्या गप्पांच मोलच उरलं नाही. स्वयंपाक घरातून शेजारच्या घरात होणारं संभाषण हे दुर्मिळ होतं तेव्हा…
गाव सांभाळणारी अडाणी माणसं रस्त्याकडं बघत बसलेली असतात.येणारा जाणारा प्रत्येक चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कुठं माहीत असतं गाव सोडलेल्या माणसाला चेहरा नसतो ते…
शहरातली माणसं गावात चक्कर मारतात सुट्टीला.दाळीदुळी फुकटात देतात गावातली माणसं…
घरासमोरची मंगलाक्का गाव सोडून गेली.
गावातलं शेत विकून तिच्या नवऱ्यानं आलेल्या पैशातून फ्लॅट घेतला होता.अन् उरलेल्या पैशात धंदा सुरू केला…
ती होती तेव्हा तिचं आंगण म्हणजे आमची आंगत पंगत करण्याची जागा.आई शेतात जायची तेव्हा एक भाकर अन् भाजी डब्यात ठेवायची मंगलाक्काकडं.तिचा नवरा लई मारायचा दारू पिऊन.इतका मारायचा की जिव जाईल असं वाटायचं.पण गल्लीतली माणसं सोडायची भांडण…
मंगलाक्का भांडण झालं की आमच्या ओसरीवर येऊन पडायच्या.आई अन् ती संसाराबद्दल,सासरवासाबद्दल बोलायच्या…
ती गेल्यानंतर चौथ्या दिवशी मंगलाक्का वारल्याचं कळलं.सगळ्यांना धक्काच बसला.असं अचानक कसं झालं.मी तिच्या मांडीवर कितीतरी वेळा गप्पा ऐकत झोपलो होतो.तिचा डोक्यावरून फिरणारा हात आठवला.ती अशी अचानक कशी गेली समजत नव्हतं.वडीलांबरोबर मी त्यांच्या नवीन घरी गेलो.शहरात.एका सोसायटीत चार ताळी इमारतीत मंगलाक्का राहत होती.घरात गेलो.सगळे शांत होते.तिथं कळलं की त्या दिवशी नवऱ्यानं दारू पिऊन खूप मारलं,त्यातच ती गेली…हे कुणाला सांगितलं नव्हतं…हार्ट अटँक सांगितला…
मला मार खाणारी मंगलाक्का दिसत होती.तिचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता…
घर नवीन होतं…नंतर लक्षात आलं की घराचा दरवाजा एकदा बंद केला कि बाहेरचा आवाज आत येत नाही आणि आतला आवाज बाहेर जात नाही…
म्हणजे त्यादिवशी मंगलाक्का जिवाच्या आकांतानं ओरडली असणार…गावाकडं असं काही झालं की गल्ली यायची सोडवायला…इथं कुणीच आलं नसेल का…?
ओरडण्याचा आवाज कुणीच ऐकला नसेल का…?
ऐकला असता तर वाचली असती मंगलाक्का…?
हो वाचली असती…मंगलाक्का वाचली असती…इतका मार नसेल सहन झाला तिला…
त्यादिवशी एक कळलं समाजापासून कायमचा संबंध संपलेली माणसं हाऊसिंग सोसायटीत राहतात…।
ही प्रत्येक गावाची गोष्ट आहे.
आज सगळे गावाच्या दिशेने येतायत…
गावातल्या रस्त्यांना,पडलेल्या घरांना,गल्ल्यांना तुमच्या गैरहजेरीत गावात काय काय झालय हे सांगायचय…
निट लक्ष देऊन ऐका ते काहीतरी सांगू पाहतायत…।
संतोष गायकवाड
-कॉलेज कट्टा
Leave a Reply