
गाव गप्पा
तेव्हा गावातले उसतोड कामगार सोडले तर कुणी गाव सोडत नव्हतं.उसतोडीचे चारपाच महिने गावातले काही कामगार कारखान्याच्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे.पण नंतर परत यायचेही.गावात सगळे लाकं गुण्यागोविंदाने राहत होते.वेळाला मदतीला पुढे यायचे.
बलुतेदारी चालू होती.पैसा ही कुणाची गरज बनला नव्हता. हळूहळू चैन करण्याकडे माणसांचा कल जाऊ लागला.गाडी घेणे हे श्रीमंत असण्याचं लक्षण वाटायला लागलं होतं.चढाओढ सुरु झाली होती.मोबाईल नुकताच येऊ घातला होता.मी तेव्हा नववीमध्ये असेल.नोकीयाचा बाराशे हँन्डसेट वडिलांनी आणला होता.फोनवर बोलण्याची गम्मत पहिल्यांदा आम्ही अनुभवत होतो.त्यातल्या रिंगटोन ऐकणे हे मनोरंजन होतं आमचं.आळीचा गेम तेव्हाच खेळलो पहिल्यांदा.हळूहळू प्रगती होत होती.
प्रगतीचा वेग दर दिवसाला वाढत होता.आता मोबाईल मध्ये गाणे ऐकू यायला लागली.नंतर फोटो,नंतर व्हिडीओ बघता येऊ लागली…दहावी संपेपर्यंत तर स्क्रिनटच दिसू लागला होता.अर्थात हे बदल पैसेवाल्यांमध्ये होत होते.तेव्हा मजूर फोनवर बोलायला शिकले.प्रत्येकाच्या हातात फोन आणि गाडी दिसू लागलं होतं.जगण्याचा अनिवार्य घटक म्हणजे हाच हा समज रुळू लागला होता.
गावं आता फँशनेबल झालं होतं.जिन्स घालणं पोरांना आवडू लागलं.लग्नात शिवलेल्या कपड्यांपेक्षा रेडिमेड कपडे घालणं लोकांना प्रतिष्ठेचं वाटायला लागलं होतं.ह्या प्रतिष्ठेमुळे टेलरींगच दुकान ओस पडायला लागलं.जुने कपडे शिवून देण्याची वेळ कामगारांवर आली.हे सगळीकडेच घडत होतं.दुष्काळग्रस्त जिल्ह्यात शेतकरी तग धरु शकत नाही. गरजा वाढल्या की पैसा पुरत नाही. म्हणून अनेक कुटूंबांनी शहराकडे जाण्याचा विचार सुरु केला.
सुरुवातीला घरातला एक माणूस शहरात जावून राहू लागला.काम करु लागला.तिथं सगळ्या गरजा पुर्ण होतात असं लक्षात येताच नंतर पुर्ण कुटूंबाचं स्थलांतर सुरु झालं.
शिक्षणासाठी शहरात गेलेली पोरं नंतर शिकून तिकडेच कामाला लागून संसारात रमली.शिकलेल्या माणसाचं गावात काय काम असा एक प्रश्न सारखा विचारला जावू लागला.
शहरं हेच माणसाला जगवू शकतात हे आता बऱ्यापैकी मनात रुजायला सुरुवात झाली.ज्यांना शहरात राहूनही नीट शिकता आलं नाही त्यांनी गावात येऊन सक्रीय राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली.यामुळे शिकून काही फायदा नाही असही नकळतपणे लोकांच्या मनावर बिंबविल्या गेलं.गावातली तरुण पिढी यात अग्रेसर झाली. बँनरवर झळकायला लागली.जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष ते गल्लीबोळातले अध्यक्ष जन्माला येऊ लागले.
तिकडे शहरात मात्र झपाट्याने बदल होत होते.कामगार वर्ग शिफ्ट मध्ये काम करु लागला.यात झालं एकच की गावात मिळून मिसळून राहणारा माणूस शहरात मात्र एकटा पडला.चार पैसे मिळवत होता पण माणसं जवळ नव्हती.गरजा पुर्ण होत होत्या पण जिवाला आराम नव्हता.
धावणारी गर्दी आजुबाजुला होती.पण हा माणूस चालण्याच्या लायकीचाही उरला नव्हता.
गाव जन्म देतं.ओळख देतं.जगवतं.हे सगळं एका क्षणात कसं विसरु शकतो आपण.कदाचित यामुळेच गाव रुसलय आपल्यावर.आज हजारो लोकं शहरात अडकलीयत.त्यांना गावात प्रवेश नाही. ते तळमळतायत गावात जाण्यासाठी. पण पर्याय शिल्लक नाही. हजारो मैलाची पायपीट सुरु झाली.मनात गावाचा जप सुरु झाला.
गाव सोडताना त्रास होतोच पण आज त्याहीपेक्षा जास्त गावात नसल्याचा त्रास होतो.आज कळत असेल की ज्यासाठी गाव सोडलं ते फार महत्वाचं नव्हतं.गावासोबत बदलायला आपण तयारच नव्हतो.कारण आपल्या गरजा वाढल्या होत्या.आपल्याला बरोबरीने जगायचं होतं.स्पर्धा पुर्ण करायची होती…
या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे हा आत्मपरिक्षणाचा भाग आहे….।
संतोष गायकवाड
-कॉलेज कट्टा
Leave a Reply