गेल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ होत्या. याशिवाय त्या श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या आणि धोरण समितीच्या सदस्याही होत्या. Dr Gail Omvedt information Biography in Marathi गेल ऑम्व्हेट माहिती मराठी

बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्यासह स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी गेल यांनी समाजापुढे केली. अमेरिकेसारख्या संपन्न देशातून भारतासारख्या ‘तिसऱ्या’ जगतातील देशात येऊन येथील जातींचा अभ्यास करताना दलित, शोषित, महिला, श्रमिक यांपैकीच एक होऊन त्यांच्या चळवळींना आयुष्यभर वाहून घेणे ही सोपी गोष्ट नाही.
समाजशास्त्रज्ञ, विचारवंत लेखीका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी बहुआयामी ओळख असलेल्या गेल ऑम्व्हेट या विभूति विषयी आज आपण माहिती घेऊया.
Dr Gail Omvedt information Biography in Marathi
गेल ऑम्व्हेट माहिती मराठी
गेल यांचा जन्म २ ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकेत झाला होता. त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. गेल ऑम्व्हेट यांच्या इतका महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे संशोधन करतानाच त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला यांच्यात फिरत, त्यांची भाषा आत्मसात करत, त्यांच्याशी संवाद साधत तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्यामुळे त्या या सर्वांचा आवाज बनल्या. त्यांच्यासारख्या कार्यप्रवण संशोधकाचे जाणे म्हणूनच पोकळी निर्माण करणारे आहे. तरुणपणी त्यांनी अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोरीच्या विरोधात आंदोलने केली. संशोधनासाठी सत्तरच्या दशकात त्या भारतात आल्या.
डॉ. गेल या अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्त्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ गेल आणि डॉ भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्रीबाई आणि जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला. पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या.
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजावर त्यांनी संशोधन केले. बुद्ध, फुले, डॉ. आंबेडकर, कार्ल मार्क्स यांचे विचार आणि स्त्रीमुक्तिवाद यांचे सक्रिय पाईक होत त्यांनी समन्यायी भारताचा पुरस्कार केला. पूर्णवेळ चळवळीसाठी झोकून दिलेले ज्येष्ठ मार्क्सवादी डॉ. भारत पाटणकर यांना जीवनसाथी म्हणून निवडले. समाजकार्याचा एक आदर्श या जोडप्याने उभा केला. जातव्यवस्थेच्या वास्तवाला, तसेच स्त्रियांच्या प्रश्नांना थेट भिडत याबाबतच्या मुद्द्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारी अनेक पुस्तके डॉ. गेल यांनी लिहिली. ‘दलित्स अँड डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशन’, ‘दलित व्हिजन्स’, ‘व्हायोलन्स अगेन्स्ट विमेन’, कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया ही त्यांची काही ठळक पुस्तके. त्यांनी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP), ऑक्सफॅम नोविब (NOVIB) आणि इतर संस्थांसाठी समनाता, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर सल्लागार समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांनी यूएन एजन्सी आणि एनजीओसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच ओरिसातील NISWASS मध्ये डॉ.आंबेडकर चेअर प्रोफेसर, पुणे विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक, नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज, कोपेनहेगन येथे आशियाई अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी, नवी दिल्ली येथे एक वरिष्ठ फेलो म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
अफाट वाचन, संशोधनातून प्रकटणारे लेखन, अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि चळवळींसाठी सतत फिरण्याची तयारी यांद्वारे त्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या सामाजिक जीवनात चैतन्य आणले. विद्यापीठीय अध्यापन, संशोधन आणि तळागाळातील समाजकार्य यांचा मिलाफ त्यांनी घडविला होता. ‘श्रमिक मुक्ती दला’च्या माध्यमातून धोरणात्मक कार्याची दिशा त्यांनी दिली. डॉ. गेल यांचे क्रांतिकारी कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
डॉ. गेल ऑम्व्हेट
Dr Gail Omvedt information Biography in Marathi
गेल ऑम्व्हेट माहिती मराठी
Leave a Reply