गुरूला शरण जावे… कोरोना डायरी 4

विवेकानंदांनी गुरू पारखून निवडला… बऱ्याचदा गुरू शिष्य निवडतो. पण इथे तर गुरू इच्छुक असतानाही विवेकानंद सहजासहजी शिष्य व्हायला तयार नव्हते. त्यांनी आधी रामकृष्णपरमहंसांना पारखलं आणि मगच त्यांचा स्वीकार केला. ही संधी प्रत्येकालाच मिळत नाही. पण गुरूचा स्वीकार केल्यानंतर ते कालांतराने गुरूला शरण गेलेले आहेत…
एक गोष्ट आठवतेय… एक गुरू होते, संन्याशी… त्यांचा शिष्य व्हायचं असेल तर ब्राह्मचार्याची शपथ घ्यावी लागे. कडक ब्रह्मचर्य ते पाळत. आपल्या शिष्याना उपदेश करताना म्हणत की स्त्रीपासून दूर राहिलं पाहिजे. स्त्रीचा स्पर्श सुद्धा टाळायचा. अध्यात्मिक उत्थानाचा तो काळ होता. आता हे ऐकायला विचित्र वाटलं तरी पूर्वी अनेक लोक अध्यात्माकडे वळत होते. त्यांचे शिष्य त्यांनी शिकवलेल्या मार्गावरून चालत होते. जगातली प्रत्येक की ही आपली आई किंवा बहीण हा संदेश ते पाळत होते.
एकदा दोन तीन शिष्याना घेऊन गुरुदेव एका गावी प्रवचनासाठी जात होते… शिष्यानी गुरुंच सगळं सामान उचललं होतं. चालता चालताही गुरुदेव उपदेश करत होते. “स्त्री चा सहवास ब्राह्मचाऱ्यासाठी त्रासदायक. कधीही मोह होऊ शकतो. म्हणून स्त्रीला दुरूनच नमस्कार करावा. अध्यात्मिक प्रगतीमध्ये स्त्रीचा अडथळा नसावा”… शिष्य हे उपदेश ग्रहण करत होते… पुढे एक नदी होती आणि नदीच्या किनाऱ्यावर एक 20 वर्षांची अतिशय सुंदर मुलगी बसली होती. शिष्यांच तिच्याकडे लक्ष गेलं… ती इतकी सुंदर होती की तिला पाहून कुणालाही इच्छा होईल, मोह होईल… शिष्यानी नजर दुसरीकडे वळवली. तशी ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, “मला पलीकडे जायचंय… ही नदी पार करत येत नाही. तुम्ही मला नदी पार करायला मदत कराल?” गुरू शांत उभे होते. शिष्यानी विचार केला की नदी पार करायची म्हणजे हिला उचलावे लागणार, तिच्या कोमलांगाचा स्पर्श होणार. मोह होणार, गुरुदेव रागावतील. त्या शिष्यांनी तिला सरळ नकार दिला. तशी ती गुरुदेवांकडे गेली आणि विनवणी करू लागली. गुरुदेवांनी क्षणाचाही विलंब केला नाही आणि सरळ तिला कमरेत विळखा घालून उचललं आणि नदीतून चालू लागले. तिला उचलल्या बरोबर शिष्य आश्चर्यचकित झाले.
गुरुदेव नेहमीप्रमाणे अध्यात्माचे उपदेश देत त्या सुंदर ललनेला उचलून चालत होते. मागून त्यांचे शिष्य चालत होते आणि विचार करत होते की गुरुदेव आम्हाला स्त्रीपासून दूर रहा म्हणतात आणि स्वतः थेट उचलूनच घेतात. नदी पार झाली. त्या लावण्यातीला गुरुदेवांनी खाली उतरवलं. तिने गुरुदेवांचे आभार मानले आणि नमस्कार करून ती निघून गेली…
गुरुदेव आणि शिष्य गावी पोहोचले… गुरुदेवांच प्रवचनही नेहमीप्रमाणे रसाळ झालं. रात्री एका कुटीमध्ये आराम करत असताना शिष्य थोडे नाराज दिसले म्हणून गुरुदेवांनी त्यांना विचारलं की “काय रे पोरांनो काय झालंय?” शिष्यांची हिंमत होईना सांगायची. पण एकाने हिंमत करून विचारलं, “गुरुदेव तुम्ही आम्हाला स्त्रीपासून दूर राहायला सांगता आणि स्वतः मात्र त्या कोमल ललनेला उचलून घेतलं”. गुरुदेव हसले आणि म्हणाले “मी तर तिला उचलून घेतलं आणि नदी पार करून सोडूनही दिलं. पण तुम्ही मात्र अजूनही तिला उचलून आहात…” या उत्तराने शिष्य खजील झाले… त्यांना गुरुदेवांच्या बोलण्याचा सार कळला.
म्हणून गुरूंना शरण गेल पाहिजे. गुरू जे सांगतात त्याचा गर्भितार्थ कळला पाहिजे. आपण आपल्या मनाने अर्थ काढता कामा नये… जसं रामकडे 2 आंबे होते, त्यातला एक आंबा त्याने श्यामला दिला तर रामकडे किती आंबे उरले? अशाप्रकारे गणित लहानपणी आपल्याला शिकवले जायचे. या गणितात राम, श्याम आणि आंबे महत्वाचे नसून 2 वजा 1 बरोबर 1 हे गणित महत्वाचं आहे. लहान मुलांना कळण्यासाठी आणि इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी त्यात राम, श्याम आणि आंबे आले. गुरूंसाठी शिष्य हे बालकच असतात. सांगायचं तात्पर्य गुरूंना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. त्याशिवाय गुरूंचा उपदेश कळणार नाही.
आज डॉ. परीक्षित शेवडेंनी कोविडला गुरू म्हणून उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. काही लोकांना ती गंमतीदार वाटली. पण मला ती खूप सिरीयस पोस्ट वाटतेय. कोविडने आपल्याला खरच खूप काही शिकवलंय… दोन शब्दात कोविडने कोणती शिकवण दिली असेल तर ती म्हणजे निसर्गाकडे चला… आपण जेवढे नैसर्गिक होऊ तितकेच सुरक्षित राहू… आज कोरोना सेंटरमध्ये गुरुपौर्णिमा वाचन आणि चिंतन करण्यात गेली… आज मी या स्थितीपर्यंत पोहोचलोय, ते मला घडवणाऱ्या सर्व गुरूंमुळेच… ते नसते तर मी घडलोच नसतो… दत्तगुरूंनी प्रत्येक गोष्टीला गुरू मानलं… परिस्थिती सुद्धा गुरुच आहे… मी सुद्धा खूप काही शिकत असतो रोज. आयुष्यभर विद्यार्थीच राहायचं आहे… खूप काही शिकायचं आहे, खूप काही मिळायचं आहे, स्वतःच्या उन्नतीसोबत देशसेवाही करायची आहे… तुम्हा सर्वांचे आणि माझ्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत… “किर्तीरूपे उरावे” ही शिकवण मी कधीच विसरणार नाही… माझ्या सर्व गुरुदेवांना माझा साष्टांग दंडवत…
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
–कॉलेज कट्टा
writerjayeshmestry@gmail.com
Leave a Reply