दुःख तुकोबांचे; मी कोरोना पोजिटिव्ह कसा झालो? कोरोना_डायरी corona article marathi

काही मित्रांनी मला न लिहिण्याचा सल्ला दिला. कोरोना झाल्यावर आराम करायचा. मी त्यांचं प्रेम समजू शकतो. पण मी एक वेळ अन्न पाण्याशिवाय जगू शकतो. लिहिल्याशिवाय जगू शकत नाही. माझ्या अगदी जवळच्या लोकांना हे माहीत आहे. ज्या दिवशी माझा या मर्त्यभूमीवरचा शेवटचा दिवस असेल आणि माझ्या संबंध आयुष्याचा आराखडा काढला तर मी दिवसाला किमान 1000 ते 1500 शब्द लिहिलेले असतील. म्हणून तुमच्या प्रेमळ सल्ल्याचा मी मान ठेवतोच, पण मला लिहिण्यापासून रोखू नका.
काही मित्रांनी मला कोरोना झाल्यापासूनचा अनुभव लिहायला सांगितला, जेणेकरून इतरांना बळ मिळेल. हा सल्ला मात्र मी शिरोधार्य मानणार आहे. थोडक्यात सांगतो आणि आजच्या मूळ विषयाला हात घालतो.
मी शक्यतो काळजी घेत होतो. माननीय मुख्यत्र्यांनी अनलॉक घोषित केल्यामुळे अनेक कंपन्या सुरू झाल्या. लोक लॉकडाऊनला जसे घाबरले होते तसे अनलॉकला पण घाबरले. कारण कामाला जाणं बंधनकारक होतं. मुंबईची लोकल बंद असल्यामुळे बसने प्रवास करण स्वाभाविक होतं. मालाडहुन विरार वसईला किंवा तिथून या बाजूला बसने यायचं म्हणजे 150/- येऊन जाऊन पडतात. माणूस 15 ते 20 हजार कमवत असेल तर त्याचे महिन्याचे बरेच पैसे जातात. त्यात कोरोना होण्याची भीती. पण इतके महिने घरी बसून खायचं काय? हा प्रश्न तर असतोच. जे तुपाशी खातात त्यांना हे पटणारं नाही. असो.
मला काही जणांनी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याविषयी त्यांनी सांगितलं. त्यांची वेदना खरी असली तरी ते शक्य नव्हतं कारण माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मंत्र्यांनाच पोहोचता येते नाही असं आपण वाचलं असेल तर सामान्य माणूस कसा पोहोचेल. हे सगळं मी का सांगतोय कारण अनेक लोकांना दुरून डोंगर साजिर दिसतं. सर्वसामान्य माणूस कोणत्या दुविधेतून जात असतो याचं त्यांना भान नसत. आपल्या बंगल्याच्या किंवा फ्लॅटच्या खिडकीतून त्यांना जेवढं जग दिसतं तेवढंच जग पाहण्याची अनेकांना सवय असते. पण तुम्ही कितीही उंच भरारी घेतली तरी तुमचं मातीशी घट्ट नात असेल तरच सामान्य लोकांचे प्रश्न तुम्हाला दिसतील…
जेव्हा मी उध्दवजींवर लेख लिहिला होता तेव्हा सरकारच्या समर्थकानी अशी टीका केली की उध्दवजींवर टीका करण्यासाठी बापाला मुद्दामून कोरोना पॉजिटिव्ह केलं म्हणजे ते बरे आहेत उगाच भांडवल केलं. काहींनी म्हटलं की बाप हॉस्पिटलमध्ये असताना हा टीका करतोय, काही म्हणाले की लॉकडाऊन असताना बाहेर का निघालास? मुळात त्या लेखाचा आणि बाबा पोजिटिव्ह असण्याचा मुळीच संबंध नाही. आता त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे लिहिल आहे की सामान्य माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय. आज जर राष्ट्रीय स्वयंसेवक आणि अशा असंख्य सामाजिक संघटना नसत्या तर सामान्य माणूस उपाशी मेला असता. हे खिडकीतून जग बघणार्यांना नाही कळणार. सामान्य माणसाला कळेल जो भोगतोय, आणि त्याला कळेल जो रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करतोय.
तर बाबा वसईला कंपनीत कामाला गेले आणि तिथेच राहिल्यामुळे आजारी पडले आणि घरी आले तसे खूप अस्वस्थ होते. मी, बायको आणि मुलगा भाड्याने दुसरीकडे राहतो म्हणून सेफ होतो. फॅमिली डॉक्टरांनी बाबांची ब्लड आणि कोरोना टेस्ट करायला सांगितला. ती केल्यावर ब्लड रिपोर्ट आधी आला, तेव्हा कळलं की बाबांची किडनी बऱ्यापैकी डॅमेज झालीय. त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. मी माझे गुरुसमान मित्र किशोर नार्वेकर यांना फोन केला, त्यांनी केईएममध्ये जायचा सल्ला दिला. ते देवासारखे धावून आले. अम्ब्युलेन्स मिळत नव्हती म्हणून मित्र प्रशांत पेंढारेला फोन केला तोही देवासारखा धावून आला. त्याच्या कारमधून आम्ही रात्री 12 च्या दरम्यान केईएमला गेलो. तिथे सगळया टेस्ट वगैरे आणि प्रोसिजर करेपर्यंत दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी 11.30 च्या दरम्यान बाबाना ऍडमिट केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाचा रिपोर्ट आला आणि ते पोजिटिव्ह निघाले. तेव्हाच मी समजलो की आमची सगळी फॅमिली पोजिटिव्ह असणार. एक सुजाण नागरिक म्हणूनमी मी बीएमसीला कॉल केला आणि qurantine करायला सांगितलं. आम्ही चाळीत राहतो म्हणून, संडास कॉमन म्हणून. आम्ही लगेच एका फ्लॅटमध्ये qurantine झालो. तिथे आमची टेस्ट केली तेव्हा रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आणि अशाप्रकारे आम्ही कोरोनाग्रस्त.
जी गाढव मंडळी बोलत होती की लॉकडाऊनमध्ये कशाला बाहेर मरायला गेलास. तर मी मरायला नव्हतो गेलो, बाबांना ऍडमिट करायला गेलो होतो आणि मुख्यमंत्री साहेबांनी अनलॉक जाहीर केला असल्यामुळे, लॉकडाऊनही नव्हता. कोरोना तुम्हाला कसाही होऊ शकतो. असो.
पण मी स्वतः रुग्ण असल्यामुळे सल्ला देईन की तुम्ही मुळीच घाबरू नका आणि आपल्या दुःखाचा बाऊ करू नका. लोकांना दुःखाचा बाऊ करायची सवय असते… पण कोरोना झाल्यावर घाबरायचं कारण नाही. साधा ताप खोकला येतो त्याच दृष्टिकिनातून त्या चिनी व्हायरसकडे पाहायचं. त्याला आपल्यावर हावी होऊ द्यायचं नाही. कोरोना अजून तरी माझ्यावर हावी झालेला नाही आणि तुमच्या आशीर्वादाने त्याला लवकरच हाकलून लावून परत येईन.
दुःखावरून एक गोष्ट आठवली. माझी जन्मठेपमध्ये सावरकरांनी कैद्यांच्या उन्मत्त हसण्याबद्दल लिहिलंय… माणूस दुःखी असेल तेव्हा तो हसतो. त्याला उन्मत्त हसणं म्हणतात. सावरकर काही उदाहरणे देतात. फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या वेळी अमानुष हत्या, कत्तली होत होत्या. तेव्हा तिथे नाट्यगृहे भरलेली असायची… आज जगायचं आणि उद्या मरायचं अशी अवस्था होती. मारायच्या आधीची पार्टी, ते विद्रुप हास्य… ते भयाण दुःख… महायुद्धात जर्मन पाणबुड्यांवरच्या अधिकाऱ्यांना व सैनिकांना भयंकर सेवा करायला लागत होती. हातात शीर घेऊन समुद्रात उडी घ्यावी लागे. आपणही किती काळ जिवंत राहू याची शाश्वती नव्हती. जेव्हा या सैनिकांना विसावा करायला मिळे, तेव्हा त्यांना भोग घेण्यासाठी विहारे उभारलेली होती. ते तिथे यायचे व सर्व भोग घ्यायचे… “Enjoy till thou goes mad. Enjoy. For tomorrow we die” हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं… आपल्याच मरणाचा सोहळा ते करत होते. आता आपण भारतात येऊ…
भारतीय संस्कृतीचा आढावा घेतो तेव्हा मला तुकोबांचे दुःख जवळचे वाटते. तुकोबांच्या चरित्रात दुःख आहे… पण समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे हे स्वतःचे दुःख नसून चिंता करितो विश्वाची असे आहे… विश्व म्हणजे आपले जग नव्हे तर आपल्यामध्येच असलेली जाणिवेची खोली अस निरूपण यशवंत पाठक यांनी केलं आहे… सर्व सामान्य माणसाची जाणिवेची खोली बंद असते. सतपुरुष साधनेच्या वा पराकोटीच्या सकारात्मकतेच्या मार्गाने ते दरवाजे उघडतात. म्हणून सत्पुरुषांच्या दुःखात स्वार्थ नसतो. आपण सामान्य माणसं, आजच्या युगात तुकोबा, ज्ञानोबा होणे आपल्यासाठी कठीण आहे. काही 5 ते 6 % जरी आपण तिथे पोहोचू शकलो तरी आपल्या जीवनाच सार्थक झालं समजा… दुःख असावे तर तुकोबांसारखे… सतत समाज कल्याणाची आस आणि विठ्ठलाची ओढ… ही शक्ती तुकोबांना नक्कीच त्यांच्या पूर्वसूरींकडून म्हणजेच ज्ञानोबा माऊलींकडून मिळाली असणार.
आता कोरोना असो किंवा अजून काही दुःखाचा बाऊ करू नये… सुखाला कवटाळले तर दुःख आलं तरी आपल्यावर हावी होत नाही… मला माझ्या एका गुरूंचा फोन आला होता, त्यांनी माझी ख्याली खुशाली विचारली आणि ते वृद्ध असल्यामुळे त्यांनाही भीती वाटत असल्याचं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. पण कोरोनावर धाडसाने आणि आनंदाने आणि सकारात्मक वृत्तीनेच मात करता येते… कारण त्या बिचाऱ्या चिनी व्हायरसवर अजून औषध निघालेले नाही. आपल्याकडे आपल्या पूर्वजांच्या उपदेशांचा साठा आहे. आपण भाग्यवान आहोत, तुकोबांसारखा महापुरुष इथे जन्मला… मग घाबरायचं कशाला… माऊली काय म्हणतात,
रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
-कॉलेज कट्टा writerjayeshmestry@gmail.com
corona article marathi
Leave a Reply