बुद्धाच्या भेटीला कृष्ण, कृष्णाच्या भेटीला बुद्ध…कोरोना_डायरी Corona Article Marathi

आज कोविड सेंटरमधून दोन रुग्ण बरे होऊन गेले. आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या लढ्याला पाठींबा दर्शवला. इथे कुणी टाळ्यांची टिंगल टवाळी करत नाही. कारण या टाळ्या प्रत्येक जण स्वतःसाठी वाजवतो. बरा होऊन जाणाऱ्या रुग्णामध्ये तो स्वतःला पाहतो. माझ्यासाठीही लवकरच लोकांनी टाळ्या वाजवाव्यात अशी त्याची इच्छा असते.
कोरोनाशी लढताना तुमच्या कानावर सकारात्मक गोष्टी पडल्या पाहिजे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सैनिकांना संबोधन करणारं भाषण ऐकलं. हिंदुस्थानी सैन्य चिनी सैन्याच्या विरोधात सज्ज झाले आहे आणि आपण इथे चिनी व्हायरसच्या विरोधात लढत आहोत. ते भाषण ऐकलं आणि आपणच सैन्य तुकडीचे एक घटक आहोत असं वाटलं. 70 वर्षांचा म्हातारा ज्याला जिग्नेश मेवाणी म्हणाला होता की मोदी को हड्डीया गलाने के लिये हिमालय जाना चाहीए. आज तो म्हातारा माणूस या वयातही आपली सकारात्मक ऊर्जा दाखवतोय आणि केवळ सैन्यालाच नव्हे तर देशाला बळ देतोय.
मोदींनी आज कृष्ण आणि बुद्धाचा उल्लेख केला. कृष्ण आणि बुद्ध हे भारताचे दोन रुप आहेत. नाण्याच्या दोन बाजू असतात तसे. एक काटा आणि एक छापा… काटा म्हणजे परिपूर्ण शिक्का नव्हे आणि छापा म्हणजे परिपूर्ण शिक्का नव्हे. दोन्ही मिळून एक शिक्का होतो. तसंच कृष्ण आणि बुद्ध मिळून हिंदुस्थान बनतो. बाहेरच्या देशांना भारताने जी भुरळ घातली आहे ती याच कारणासाठी. शेकडो पंथ तरी हे हिंदू… हे कोणतं रसायन आहे? एकच इस्लाम आणि एकच ख्रिस्ती ही संस्कृती इथे नाही. इथे प्रत्येक माणसाच्या हातात स्वतःचा एक धर्मग्रंथ आहे. म्हणूनच तर इथे राम, कृष्ण, बुद्ध, चार्वाक, महावीर गुण्यागोविंदाने नांदू शकतात.
त्यात कृष्ण आणि बुद्धी ही दोन विरुद्ध टोके. सावरकर म्हणाले होते उद्या जर भारतामध्ये जगाला काही सांगण्याची क्षमता आली तर हिंदू कृष्ण आणि बुद्धाचे तत्वज्ञान सांगेल. सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांनाही बुद्धाचे तत्वज्ञान पटते. पण बुद्धाचे तत्वज्ञान युद्धात कामी येत नाही. तिथे कृष्ण लागतो आणि आपल्यामध्ये जे शत्रू दडलेत, आपली वाईट पवृत्ती, त्या शत्रूशी लढायला बुद्ध…
बुद्धाची आणि येशूची मूर्ती मला खूप आवडते. त्या मूर्तीकडे पाहिलं की एक वेगळं समाधान लाभतं. येशूची मूर्ती पाहिली की त्याचा प्रचार करणाऱ्या मिशनरीची मला कीव येते. ह्यांना अजून येशू कळलेलाच नाही. येशू म्हणजे ममतेचं महासागर… या महासागराचं महत्व कळायला आधी भारतीय तत्वज्ञान शिकून घेणं खूप गरजेचं आहे… वसुधैव कुटुंबकम जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
इथे कसे कृष्ण नि बुद्ध एकत्र नांदतात. तसे राम आणि येशू एकत्र नांदू शकतात. पण आमचं तत्वज्ञान मोठं हे सांगण्याच्या नादात खरा येशू मात्र खूप मागे पडला. असो… आता आपण पाकिस्थानला नमवलेलं आहे, भारतीय सैन्याचे रौद्र रूप पाहून चिनी पण भयभीत झाले आहेत. त्यात जगातले मोठमोठे देश आपल्यासोबत आले आहेत. चीनचं वर्चस्व लवकरच संपेल आणि आशिया खंडात भारत एक महत्वाचा देश होईल… नरेंद्र मोदी आज एक महत्वाच वाक्य म्हणाले, आम्ही बासुरीधारी कृष्णाची पूजा करतो आणि सुदर्शनधारी कृष्णाचीही पूजा करतो. कोणत्या वेळेला कोणता देव पुजायचा हे भारताला व्यवस्थित माहिती आहे. आता आपल्याला देशाबाहेरच्या, देशातल्या आणि आपल्याला कमजोर करणाऱ्या कोरोना नावाच्या शत्रू विरोधात लढण्यासाठी सुदर्शनधारी कृष्णाची पूजा करायची आहे… सध्या बुद्धाच्या भेटीला कृष्ण आलेला आहे… युद्ध जिंकलो किंवा संकट टळलं की कृष्णाच्या भेटीला बुद्ध येईल… बुद्धाला शरण गेलं की आपल्याला चराचरात बुद्ध दिसू लागतो. आपल्यावर गलिच्छ टीका करणाऱ्याचेही आपण हित चिंतीतो… महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवल्यामुळे त्यांचे समर्थक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गलिच्छ टिका करत आहेत. पण इथे कोरोना सेंटरमध्ये बसून मला त्यांचा राग नाही येत, मला त्यांची दया येते. त्यांच्याप्रति माझी भावना म्हणजे दुरितांचे तिमीर जावो अशीच आहे… हीच बुद्धाची ताकद आहे…
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
-कॉलेज कट्टा writerjayeshmestry@gmail.com
Leave a Reply