गाव गप्पा
“हरवलेल्या चोराची गोष्ट”

“काही जोड्या देव स्वर्गातूनच बनवून पाठवतो” अशी एक भोळी श्रद्धा आपल्याकडे आहे.प्रियकर-प्रेयसी,नवरा बायको,राम -सीता,राधा-कृष्ण तसं चोर – पोलिस…
हे काय मध्येच चोर पोलिस ही काय देवानं बनवलेली जोडी थोडीच आहे.ती तर इथे तयार होते.होत असेल…
पोलिस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चोर असंही म्हणतं कुणी कुणी…
चोर पोलिस हा शब्द लहानपणापासून मनावर कोरला गेलाय.तो कसा हे सांगता येणं कठीण आहे,पण या शब्दाशी खूप जवळचा संबध होता.”चोरी कधी करु नये” असं आमचे मास्तर रोज तालासुरात ओरडायचे.पण चोर होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता.पुलिस म्हटलं की नको वाटयचं.आता तुम्ही म्हणाल ते वय चोर होण्याचं होतं का वैगरे पण ती एक वेगळी गोष्ट आहे…
संध्याकाळी दिवे लागले की गल्लीतल्या एखाद्या मोकळ्या जागेत आम्ही जमायचो.अंधार पडलेला असायचा.खिशात आणलेले बोरं,शेंगा संपवत गप्पा रंगायच्या आणि पोरं दोन गटात विभागली जायची.एक चोराचा आणि एक पोलिसाचा…ह्या खेळाची विशिष्ट अशी जागा नव्हती.गावत कुठेही,कुठल्याही गल्लीत जायचं,फक्त स्वतः च्या घरात जायची नाही. आता हा घरात न जाण्याचा
नियम का बनवला त्याची वेगळी गोष्ट आहे हे ती कळेलच तुम्हाला…
हा खेळ खेळण्यासाठी चित्रपटातल्या एखाद्या सिनचं आधी नाटक करायचो.सिन चोरीचेच असले पाहिजे असं काही नाही. गुंड लुटतात,मारतात किंवा खून करुन पळतात असे प्रसंग ठरवून कोण काय क य करणार हे ठरवलं जायचं.पोलिस म्हणजे हिरो आणि सोबतीला हवालदार…चोर म्हणजे डाकू…चित्रपटातल्या डाकूंचा कितीही राग येत असला तरी खेळात मात्र आपणच डाकू असलं पाहिजे. हा नैसर्गिक नियम आहे इथं प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला ,सतत आपल्यामागे कुणीतरी असावं ही प्रत्येकाची भावना असते…
तो ठरलेला प्रसंग झाला की चोर पळणार आणि त्यांना पकडण्यासाठी पुलिस पळणार.रात्रीची वेळ असल्यामुळे गावातील बहुतांश रस्त्यावर अंधार असतो.त्यामुळे लपायला जास्त चांगलं वातावरण असतं.खेळताना,पळताना मनात सिनेमातलं एक म्युझिक सतत चालू असतं.जे पोलिस चोराचा पाठलाग करताना नेहमी वाजतं.
पोलिस पाठमागे आणि आपण पुढे…दिसेल त्या गल्लीत शिरायचं…पळता पळता कुणाला धक्का लागला तर झनझनीत शिवी ऐकायला यायची…आपण पळत रहायचं…पोलिस त्याचं प्लँनिग करणार…दोन हवालदार त्या गल्लीत…दोन हवालदार ह्या गल्लीत… पकडण्यासाठी सापळा रचला जायचा…नकली फोन वापरले जायचे…दिवाळीतल्या बंदुका पँन्टमध्ये घालून पोलिस पाठलाग करायचे…हे बराच वेळ चलायचं…पोलीस बनलेल्या पोराला कुणी भेटलं तर तो तिथेच गप्पा मारत बसायचा…गल्ल्या छोट्या छोट्या होत्या म्हणून कितीही पळालं तरी एका गल्ली किमान पाच सहा चकरा आरामात व्हायच्या…कधी कधी तर चोर पोलिसांसमोरुन चालत जायचा पण पुलिसाला कळायचं नाही…
चोर झालेली पोरं एकत्र जमून लपून रहायची.लपायचा एक अड्डा आधीच तयार असायचा…गावात भावकी पसरलेली असते सगळीकडे.चोर झालेला पोरगा पळत जावून ओळखीच्या घरात घुसून टिव्ही पाहत बसायचा…नंतर एकदा का मुड लागला की टिव्हीसमोरुन हलायचा नाही… इकडं पोरं शोधू शोधू बेजार व्हायचे…म्हणून आम्ही हा नियमच केला होता की कुणी कुणाच्या घरात घुसायचं नाही…
रात्र चढत जायची…खेळ संपायचाच नाही…नियम असा होता की एका टिम मधले सगळेजण पकडले गेले पाहिजे. पण कुणीतरी राहूनच जायचं.मग तो खेळ उद्यावर जायचा.
आमचा एक एक खेळ दोन तीन दिवस चलायचा.सगळे आपलं काम इमानेइतबारे करत होते…चोरं प्रामाणिक होते,पोलीस जास्त प्रामाणिक होते…खेळ प्रामाणिक होता…
या खेळानं धावायला शिकवलं.तेव्हा चोर झालो तरी ते खोटं खोटं आहे हे माहिती होतं.पोलिसांनी पकडलं की कबुली व्हायची,शिक्षा कबूल केली जायची,आणि जेलमध्ये टाकलं की आम्ही झोपून जायचो…
हा खेळ आज खेळलो तर….?
चोर झालो तरी ते मान्य असेल का…?
धावता येईल का…? मुळात धावायचच कशाला…?
चोरलेल्या मालातला अर्धा हिस्सा पोलिसांना द्यायचा नाही का…म्हणजे त्यांनी पकडणं नको…कबुली नको…आणि जेलमध्ये टाकणं नको…
आज हा खेळ नाहीच खेळत बहुतेक.मोबाईल मध्ये मिळतात असे गेम…त्यामुळे गल्लीतले रस्ते तुडवण्याची मजा तुम्हाला नाही कळणार…।
संतोष गायकवाड
-कॉलेज कट्टा
Leave a Reply