
“सुरुवात..
सूर्य उगवताच होते दिवसाची सुरुवात. काहीजण सूर्य उगवण्यापूर्वीच उठुन दिवसाची सुरुवात करतात. असं म्हणतात जो सूर्य उगवण्यापूर्वीच उठतो तो बरंच काही कमावतो. काहीजण मॉर्निंग वॉकला जातात, काहीजण व्यायाम, प्राणायाम करतात. प्रत्येकाजण दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारे करतो. काहीजण उठल्यानंतर लगेच मोबाईल घेऊन सोशल मीडियात प्रवेश करतात. काहीजण ध्यान करतात. काहीजण तंबाखू अथवा सिगार ओढतात. दिवसाची सुरुवात कशी करायची ही प्रत्येकाची वैयक्तिक सवय असते.
मी, उठल्यावर दोन्ही हात जोडून परमेश्वराचे-निसर्गाचे आभार मानतो. माझा, आजचा हा दिवस नक्कीच चांगला जाणार आहे, ज्ञानवर्धनाचा असणार आहे असं मनात म्हणतो. धरणीमातेचं दर्शन घेतो. अंथरुण उचलतो, आरशात पाहुन छान स्मित करतो, स्वतःला सकारात्मक सुचना देत देहधर्म उरकतो. आजच्या कामाची यादी करतो आणि युट्युबवरिल सकारात्मक, प्रेरणादायी एखादा व्हिडीओ पाहतो.
असं म्हणतात ज्याची सुरुवात चांगली तो योग्य मार्गावर वाटचाल करत पूर्णत्वाकडे जातो. काही दिवसांपूर्वी, एक संदेश वाचला-
‘दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने केली की आपण त्यादृष्टीनेच पावलं उचलतो.’ जी व्यक्ती वाईट क्रुती अथवा वाईट विचार करुन दिवसाची सुरुवात करते, त्या व्यक्तीकडुन चांगल्याची अपेक्षा कुणीही करणार नाही. *म्हणतातना सुरवात चांगली तर शेवटही चांगला, त्याचं फळही चांगलंच. चांगलं करण्यासाठी सुरुवात करायला जो उशीर करतो तो खूप काही गमावतो. असंही म्हणतात वेल बिगीन इज हाफ डन. चांगल्याची सुरुवात करायला मुहुर्ताची गरज नाही असं म्हणत काही व्यक्ती विनाविलंब सुरुवात करतात. इयत्ता दहावी, बारावीला असणारे काही विद्यार्थी जुन महिन्यात लगेचच अभ्यासाला सुरुवात करतात अशांचा अभ्यास चांगला होतोच, बोर्ड परिक्षेत ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात आणि जे जुन महिन्यात म्हणतात अजुन खूप वेळ आहे त्यांचं काय होतं हे सांगण्याची गरजच नाही.
चांगल्या उद्देशाने एकत्र येणारे लगेचच सुरुवात करतात कारण हे चांगलं अनेकांच्या भल्याचं असतं. काही काळानंतर अशांना अनेकजण स्वतःहोऊन भेटतात, सामिल होतात कारण अधिकाधिक चांगलं द्यावं हे त्यांना मनापासून वाटतं.
सुरुवात तर कर पुढं काय करायचं हे काळाच्या ओघात लक्षात येतं आणि आपण तसं करतोही. चालण्याची सुरुवात पहिलं पाऊल उचललं की लगेच होते. म्हणून पाऊल उचलुया ध्येयाच्या दिशेने. ध्येय हाच श्वास होईल जेव्हा आपण सुरुवात करु
सुनील वनाजी राऊत
मो.९८२२७५८३८३.
कॉलेज कट्टा
Leave a Reply