महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी
संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी
Sant Dnyaneshwar Information Biography Marathi Language
महाराष्ट्राच्या धरतीला वेळोवेळी संत महात्म्यांच्या वैचारिक संपदेचा वारसा लाभलेला आहे. अनेक अध्यात्मिक विभुतींनी याच मातीत जन्म घेऊन; जगाला अध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिलेले आढळतात . आज आपण अशाच एका महात्म्याच्या जीवनकथेचे मंथन करणार आहोत; ज्याने ज्ञानेश्वरी नामक प्रसिद्ध गिताभाष्य लिहून किचकट अश्या संस्कृत भगवद्गीतेला जनसामान्यांपर्यंत पोहचवले.
महाराष्ट्राच्या अध्यात्मिक इतिहासाची पाने कधी चाळुन बघितली तर आपल्याला एक बाब प्रकार्षाने जाणवेल की संत ज्ञानेश्वर व वारकरी संप्रदाय हे एक घनिष्ठ समिकिरण आहे. किंबहुना या संप्रदायाचा पायाच ज्ञानेश्वरांनी घातला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या आपेगाव या गावी इ.स १२७५ साली या महात्म्याने पहिला श्वास घेतला. पित्याचे नाव विठ्ठलपंत व आई रुक्मिणीबाई; विठ्ठलपंतांच्या मनात लग्नानंतर काही वर्षांनी वैराग्य जागृत झाल व त्यांनी संन्यासाश्रमात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला .काही वर्षं तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना संसारी जीवन जगण्याचा आदेश केला व गुरूच्या आदेशानुसार ते पुन्हा गृह्थाश्रमी जीवन जगू लागले पण संसारात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जप तपात किंचितही टाळाटाळ झाली नाही. प्रभुकृपेने त्यांना चार सुपुत्रांची प्राप्ती झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई.
पण त्या काळातील काही कर्मठ लोकांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क ह्या कुटुंबाकडून हिरावुन घेतला. एका संन्यासाने पुन्हा गृह्थाश्रमात प्रवेश करावा; हा सिद्धांत त्या काळातील समाजाला मान्य नव्हता. समाजाने झिडकारलेल्या ह्या कुटुंबाला अनेक दुविधांमधून जगण्याचा मार्ग शोधावा लागत असे. अवघ्या गावाने भिक्षाटनासाठी ज्ञानेश्वर व इतर भावंडांचा मार्ग बंद केलेला होता; चुकून ह्यांना कुणी भिक्षा दिलीच तर त्यालाही लोक वाळीत टाकून समाजबाह्य करत असे. धर्मशास्त्राचा बाजार मांडणाऱ्या ब्राम्हणांनी अनेक खुळचट रुढी या समाजात खोलवर रुजवल्या होत्या; परिणामी समाजव्यवस्थेत अनेक विकृतींचे पोषण झाले होते. जनसामान्यांमधुन अंधश्रद्धा व खुळचट रुढीपरंपरा कशाप्रकारे उपसुन टाकता येतील याचाच विचार ज्ञानेश्वर नेहमी करत असे. पण याच समाजाने त्यांना अपवित्र म्हणून करार दिला तो विषय वेगळाच …!
संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी
सामाजिक जाचाला कंटाळून ज्ञानेश्वरांच्या माता व पित्याने नदीपात्रात उडी मारून देहत्याग केला. आपण मेल्यानंतर कदाचित आपल्या मुलांना हा समाज दयेने वागवेल हा विचार करून या दांपत्याने आपल्या प्राणांचा त्याग केला .पण तरीही कठोरहृदयी लोकांना मायेचा पाझर फुटला नाही आणि ती भावंडे सताड उघड्यावर पडली. खेळण्या बागडण्याच्या वयात निष्ठुर समाज व्ययस्थेशी झुंज देत ज्ञानेश्वर आपल्या छोट्या भावंडाना सांभाळू लागले. मातापित्याची सावली डोक्यावरून केव्हाच हरवली होती. त्यांच्या मरणाला हे निष्ठुर लोकच जबाबदार आहेत हे माहीत असून सुद्धा ज्ञानेश्वरांच्या मनात समजाविषयी किंचितही द्रोष नव्हता. जीवनात कुणालाही भरभरून सुख मिळत नाही; आडवाटातुन, खाचाखळग्यांतून प्रत्येकाला नवी दिशा शोधावी लागते हे ज्ञानेयांना चांगलेच ठाऊक होते. समाज भरकटला म्हणुन आपणही रोषाने वागावे हे ज्ञानेयंना मान्य नव्हते. ज्ञानेश्वर आपल्या ध्येया पासून किंचितही डळमळले नाही व गाव सोडण्याचा विचार करून भावंडांसहित पैठणची वाट धरली.
ज्ञानेश्वरांचा संस्कृत भाषेवर विशेष पगडा होता. संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ, खंडांचा त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता. संस्कृत भाषेतील हे ज्ञान लोकांपर्यत पोहचवण्यास्तव त्यांनी विशेष कार्य केले. पैठणच्या धरतीवर त्यांनी अनेक प्रवचानांच्या माध्यमातुन या अमृततुल्य ज्ञानाच्या अफाट विश्वाचे दर्शन लोकांना घडवले आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या वेळी ज्ञानेश्वरांचे वय फक्त १४ वर्षांचे होते. यातुनच आपल्याला त्यांच्या अफाट विवेकशील बुद्धीची कल्पना करता येईल. त्याकाळी वेदाचे उच्चारण करण्याचा हक्क फक्त ब्राह्मण वर्गालाच होता, त्यांच्या व्यतिरिक्त एखाद्याने वेद पठण केल्यास त्याला पापी घोषित केले जायचे. ही बाब ज्ञानेश्वरांना एखाद्या काट्याप्रमाने बोचत होती. म्हणून एका रेड्याच्या तोंडून वेद वदवून त्यांनी कर्मठ ब्राम्हणांचा व्यर्थ अहंकार हरण केला. ह्या जगातील प्रत्येक जीवास पवित्र वेद मंत्रांचा उच्चार करण्याचा हक्क आहे. जणु हाच एक संदेश ज्ञाणेयांना ह्या जगास द्यायचा होता…!
वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी नामक प्रसिद्ध गीताभाष्य ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. या ग्रंथातील ९००० ओव्यांच्या माध्यमातुन त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तीयोग यांचे सविस्तर विश्लेषण दिलेले आहे. आजही हा ग्रंथ मराठी साहित्यात उच्च स्थानावर आहे. उत्तरप्रदेशातील गीताप्रेस मुद्रणालयाने या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अवघ्या भारतासमोर आणला आहे.
आळंदी ही ज्ञानेश्वरांना खुप प्रिय होती. आपल्या जीवनातील उत्तरार्धात त्या ठिकाणी त्यांनी खुप तपश्चर्या केली. त्या काळी चांगदेव नामक सिद्ध योगी आळंदीच्या शिवारात वास्तव्यास होते. योगशक्तीच्या आधारे ते चौदाशे वर्षांपासून जिवंत असल्याचा दावा करायचे व या गोष्टीचा त्यांना फार अहंकार होता; पण जेव्हा संत ज्ञानेश्वरांचा व त्यांचा आमनासामना झाला तेव्हा त्यांचा अहंकार क्षणार्धात जमीनदोस्त झाला. ज्ञानेयांनी आपल्या विवेकपूर्ण संवादाने या मायाशिल जगाची क्षणभंगुरता चांगदेवांसमोर आणली. हाच संवाद चांगदेव पासष्टी नामक ग्रंथाच्या माध्यमातुन जगासमोर आला.
आळंदीच्या लोकांमध्ये ज्ञानेश्वरांबद्दल खूप आदर होता; पण ज्ञानेश्वरांची वाढत चाललेली प्रसिध्दी काही लोकांच्या डोळ्यांना देखवत नव्हती. वेगवेगळे कट रचून ज्ञानेयांना व त्यांच्या भावंडांना नेहमी त्रास देणारी एक फौज त्या गावात राहत होती. त्या फौजेचा प्रमुख होता विसोबा. ज्ञानेश्वरांविषयी विसोबाच्या मनात तीव्र घृणा होती पण चांगदेवांसारख्या सिद्ध योग्याचा अहंकार हरणाऱ्या ज्ञानेयांसमोर विसोबाची काय बिशाद…..! एका छोट्याश्या लीलेने त्याचा रोशही ज्ञानेश्वरांनी प्रेमात परिवर्तित केला. तो दिवाळीचा दिवस होता. अख्खी आळंदी दिव्याच्या रोषणाईने न्हाऊन गेली होती; अश्या समयी निवृत्तीनाथांनी बहीण मुक्ताई जवळ मांडे खाऊ घालण्याची इच्छा दाखवली. घरात मांडे भाजता येईल असा तवा नसल्याने मुक्ताई तवा आणण्यास गावच्या लोहराकडे गेली पण तो लोहार विसोबांचा साथी होता; त्याने तवा देण्यास नकार दिला व मुक्ताई त्याच निराश चेहऱ्याने घरी परतली. ज्ञानेश्वरांनी मुक्ताईस निराशतेचे कारण विचारले; मुक्ताईने घडलेला प्रसंग ज्ञानेयांना सांगितला. ज्येष्ठ बंधु निवृत्तीनाथांची मांडे खाण्याची खुप इच्छा होती. पण तव्याच्या अभावाने बेत थांबू नये म्हणून ज्ञानेश्वरांनी योगशक्तिने आपला जठराग्नी प्रज्वलित केला व त्यांच्या तप्त अश्या पाठीवर मुक्ताईने मांडे भाजले. हा सर्व प्रसंग विसोबा भिंतीआडून गुपचूप बघत होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासाचं बसेना; अखेर आपल्या गर्विष्टपणाची झालर झुगारून ते ज्ञानेश्वरांना शरण गेले.
ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ हे दोघे बंधु तीर्थयात्रा करण्यास नेहमी उत्साही असत. प्रभूचिंतन करणे, परिव्राजक अवस्थेत फिरणे, भिक्षाटन करून एखाद्या वृक्षाखाली वास्तव्य करणे; कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातुन समाजप्रबोधन करणे ई. गोष्टी त्यांना परम संतोष देत असे. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव या तीन भावंडांनी अटळ स्थान निर्माण केलेले आहे; या तीन ज्ञानसूर्यांनी अध्यात्मिकतेला नव्या रूपाने या जगासमोर मांडले आहे.
कर्मकांडाला तिलांजली द्या, प्रभू चिंतन करा व त्या ईश्वराचे नाम अखंड जपा. ह्याने तुमचं कल्याण होईल. ह्या सोप्या शब्दात ज्ञानेश्वरांनी आपला संदेश दिला.
संत सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधु त्यांनी अवघे जीवन कठोर तप करून एक नवा आदर्श उभा केला. पुण्याजवळील सासवड येथे त्यांनी समाधी घेतली. त्यापाठोपाठ निवृत्तीनाथ देखील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे समाधीमग्न झाले.
संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ साली आपल्या कार्याची इतिश्री केली; अवघ्या २१ व्या वर्षी समाधी घेण्याचा निर्णय ज्ञाणेयांनी घेतला. फक्त एकवीस वर्षांचे ह्या महात्म्याचे आयुष्य; पण त्यांचे कार्य आज ८०० वर्षानंतरही अवघ्या महारष्ट्रावर प्रभाव टाकत आहे. ह्या व्यक्तीची महती शब्दात गुंफायला अक्षरशः शब्दही कमी पडतात. अखेर ज्ञानसागर आळंदीच्या धरतीवर समाधिस्त झाले व आपल्या अवतारकार्यास विराम दिला……!
संत ज्ञानेश्वरांवर मी बापडा काय लिहणार…! पण माझ्या मनातील अस्ताव्यस्त भावनांना शब्दांचा आधार सापडला व माझ्या लेखणीतुन हा छोटासा लेख अपना समोर आला .
लेखक- गौरव वर्पे
संगमनेर.
मो. 8830144011
Reference
ज्ञानेश्वर चरित्र
लेखक – लक्ष्मण पांगारकर
गीता प्रेस मुद्रणालय ,उत्तरप्रदेश
https://en.m.wikipedia.org/wiki/Dnyaneshwar
https://www.gyanipandit.com/sant-dnyaneshwar-information-in-hindi/amp/
मित्रांनो, संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज माहिती निबंध भाषण मराठी Sant Dnyaneshwar Information Biography Marathi Language Sant Dnyaneshwar Essay Speech Marathi Language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
bahoot hi achha post likha hai apne sir ji