
मोह, संधी ओळखायचीच…
माझा मित्र सुबोध आणि मी, शेजारी रहायचो. शाळेत दोघं बरोबरच जायचो. दोघं शाळेत जातांना, वाटेतच आनंदकाकांचं घर होतं. आम्हा दोघांना सलग महिनाभर, प्रत्येकी एक चॉकलेट आनंदकाका द्यायचे. दोघंही चॉकलेट खायचो. शाळेत जायचो. मध्यंतरी ते गावाला गेले. शाळेत जातांना व येतांना, आम्ही दोघंही त्यांच्या घराकडं पाहायचो. ते गावाहून आले. एकेदिवशी त्यांनी, आम्हांला जवळ बोलावलं. त्यांच्या एका हातावर चॉकलेट आणि दूस-या हातावर लिहिलेला कागद. घाईनेच सुबोधने चॉकलेट उचललं. मी, नाराज झालो. त्यांनी माझ्या हातावर ते एकच वाक्य लिहिलेला कागद ठेवला. मी ते वाक्य वाचलं-‘स्वतःवरचा विश्वास आपल्याला खूप सहाय्य करतो.’- मला ते वाक्य मनापासून आवडलं. तो कागद मी दप्तरात ठेवला. दुस-या दिवशी सुध्दा सुबोधने, आनंदकाकांच्या हातावरचं चॉकलेट उचललं. खाल्लं. लिहिलेला कागद मी घेतला. वाक्य होतं-‘मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत, आनंदी रहायचं.’-हे वाक्य सुध्दा मनापासून आवडलं. तो कागदही दप्तरात ठेवला. आता हे नेहमीचं होऊ लागलं म्हणजे सुबोध चॉकलेट खाणार आणि मी, एकच वाक्य असलेला कागद उचलणार, वाचणार, दप्तरात ठेवणार. सुबोधला ताप आला म्हणून तो शाळेत येणार नव्हता. काकांच्या एका हातावर चॉकलेट, दूस-या हातावर एकच वाक्य लिहिलेला कागद. आज मात्र मी गोंधळलो. पण मनापासून वाटलं-कागद उचलला. शाळेत जायला थोडा अवधी असल्याने आनंदकाकांनी मला, दप्तरात ठेवलेल्या कागदावरिल प्रत्येक वाक्याचं महत्व सांगितलं. काकांचा चेहरा प्रसंन्न दिसु लागला. मी शाळेत निघालो तेव्हा ते म्हणाले की माझ्या हातून अनेकांचं चांगलं झालं आहे ह्या एका वाक्याच्या कागदाने. तूसुध्दा भविष्यात चांगला माणूस होशील. चॉकलेट हा मोह आहे. ह्या मोहावर तु आज मात केलीस. त्या वाक्यांप्रमाणे वागलास तर तु अंतर्बाह्य चांगल्या अर्थाने बदलशील, तुझं भविष्य उज्वल होईल. काकांचं ते बोलणं मला, अगदी मनापासून आवडलं. मी, दररोज काकांनी सांगितल्यानुसार, कागदावरच्या वाक्यानुसार वागु लागलो. मला खूपच चांगलं वाटु लागलं. हे माझं चांगलं, समंजसपणाचं वागणं घरच्यांच्याही लक्षात आलं. चॉकलेट हा त्या क्षणाचा मोह होता, हे सुबोधला समजलंच नाही. खरं तर मी, सुबोधला समजावलंही पण त्याने ऐकलंच नाही. सुबोधचे वडिल नोकरी करत होते, त्यांची बदली झाली. सुबोध माझ्यापासून दूरावला. रविवारी मी, आनंदकाकांच्या घरी अभ्यासाला जायचो. माझा अभ्यास झाला की आनंदकाका माझ्याशी गप्पा मारायचे. आनंदकाकांचं घर मला आवडायचं कारण त्या घरातली स्वच्छता, नीटनेटकेपणा. त्यांची पत्नी, मुलगा खूपच शांत, समंजस, विचारी होते. ते तिघेही एकमेकांसोबत छान बोलायचे, एकमेकांना समजून घेऊन वागायचे. त्यांच्या घरात नाही हा शब्द कुणाच्याच तोंडी नव्हता. अनाथालयाला ते नेहमी आर्थिक सहकार्य तर कधी गहु, ज्वारी, भाजीपाला नेऊन द्यायचे. कधी कधी मीसुध्दा त्यांच्यासोबत अनाथालयात जायचो. त्या तिघांनीही मला खुप जीव लावला. आज, ४० वर्षांनंतर मनात प्रश्न येतात-‘आनंदकाका नसते तर मी, आज कुठं असतो? कोण असतो?’- एकच वाक्य आपलं अवघं जगणं सम्रुध्द करु शकतं ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. आज आनंदकाका नाहीत देहरुपानं ह्या भूतलावर पण माझ्या जगण्यात…खरं तर माझ्यातच आनंदकाका आहेत. आपलं भलं व्हावं म्हणून कुणीतरी त्याग करत असतं, अशांसाठी आपण जगायचं, होईल तेवढं इतरांचं भलं करायचंच.
लेखक-सुनील वनाजी राऊत, सावतानगर, भिंगार-अहमदनगर. मो.९८२२७५८३८३
-कॉलेज कट्टा
Leave a Reply