
मोकळा वेळ| सकार| कॉलेज कट्टा
मध्यंतरी एका मित्राच्या घरी गेलो होतो. माझ्याकडे मोकळा वेळ होता म्हणून मी त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला ” तुला भेटायचं असं बऱ्याच दिवसांपासून ठरवलंय पण मी इतका बिझी आहे की मोकळा वेळ मिळतच नाही “. मी त्याला म्हणालो की इतकाही बिझी राहू नकोस की जवळच्या माणसांसाठी वेळ देता येत नाही. खरं सांग आपण खरंच एवढं बिझी आहे का? मी तर ठामपणे सांगितलं की आठवड्याला काही वेळ मोकळा वेळ म्हणून ( किमान पंधरा दिवसातून एकदा तरी ) वेगळा ठेवलाच पाहिजे. मोकळा वेळ उपयोगात आणायचा मित्र नातेवाईक ह्यांचा भेटीसाठी, कुटुंबासाठी, स्वतःची जी आवड असेल- छंद असेल ( वाचन, पेंटिंग, गायन, मनन, चिंतन, भविष्यकालीन उपाययोजना ) जोपासण्यासाठी. अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की दवाखान्यात नंबर लावल्या नंतर सुमारे १ ते दीड तासानंतर आपला नंबर येतो. ( खरंतर हा मोकळाच वेळ असतो ) अशी माणसं बोर झालो बसून असं मनातल्या मनात म्हणतात स्वतःवरच चिडतात. पण हाच मोकळा वेळ वाचन करून, निरीक्षण करून उपयोगात आणु शकतो. एसटीच्या प्रवासातील वेळ हासुद्धा आपल्या दृष्टीने मोकळा वेळच असतो. ( काही जण तिकीट काढलं की लगेच ताणुन देतात) म्हणजे ह्या मोकळ्या वेळेचा उपयोग झोपण्यासाठी केला जातो. असो. मोकळा वेळ मिळतच नाही असं कधीच नसतं. उद्याच्या कामाचं आपण योग्य नियोजन केलं तर मोकळा वेळ नक्कीच मिळू शकतो. अनुभव घेवुन पाहायला काय हरकत आहे? काहीजणांकडे एवढा मोकळा वेळ असतो (उदाहरणार्थ सेवानिवृत्त व्यक्ती ) की ह्या एवढ्या मोठ्या मोकळ्या वेळेचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आपण कितीही बिझी असलो तरी मोकळा वेळ काढणं आपल्याच हातात आहे आणि असतंसुद्धा. काहीजण तर असं दाखवतात की मी खूपच बिझी असतो ( उदाहरणार्थ स्वयंघोषित पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते). बिझी नसावं असं मी म्हणणार नाही मोकळा वेळ काढूच शकणार नसाल तर स्वतः विषयी मनन, चितन, आत्मपरिक्षण करताच येणार नाही. छंद, आवड जोपासता येणार नाही. थोडक्यात असं म्हणता येईल की मोकळा वेळ हा प्रगतीसाठी,अनुभव देण्या- घेण्यासाठी, नातेसबंध टिकवण्यासाठी, छंद-आवड जोपासण्यासाठी, नवं काही शिकण्यासाठी, समाज, राष्ट्र कार्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः नोकरी करून, कथा – कादंबऱ्या, शॉर्ट फिल्मस, नाटकं, एकांकिका ह्यांचं लेखन, वाचन, छंद, आवड जोपासून रेडिओड्रामा लिहून, प्रेरणादायी यशमार्ग हा विद्यार्थी व पालकांकरिता कार्यक्रम हे सारं करूनही मोकळा वेळ काढतोच. आपण मोकळा वेळ काढूच शकला नाही तर….? तन आणि मनावर परिणाम होईल, शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहणार नाही. सेवानिवृत्त व्यक्तींनी समाजहितार्थ – राष्ट्रहितार्थ काम करत, स्वतःच्या वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे करत मोकळा वेळ सार्थकी लावला पाहिजे, काहीजण ह्याप्रमाणे मोकळ्या वेळेचा नक्कीच उपयोग करतात.
लेखक सुनील वनाजी राऊत
कॉलेज कट्टा
Leave a Reply