
माळ्याच्या मळ्यामंदी…वाटेवरुन खाली उतरलं की रस्त्याच्या डाव्या अंगाला वढ्यामधून पुढं गेलं की महादेवाचं मंदिर दिसू लागतं.वढ्याचं पाणी नितळ असायचं तेव्हा.दोन्ही कडेला झाडं .कुठं कुठं चिखलात पाय रुतायचा,चपला तुटायच्या.मग मी काय करायचो चपलीची गुंडी तुराठीच्या काडीनं दाबायचो मग पुन्हा चप्पल पायात घालायची आणि पुढं चालत रहायचो…मळ्यातल्या महादेवाला वर्षभर कुणी जात नाही. मळ्याचा मालक असतो तिथं.पण उन्हाळा सुरू झाला की तिथं सप्ता असतो.सात दिवस मग गावातल्या बायका,लेकरं,म्हातारी माणसं मळ्यात जमतात.उन्हाळ्याच्या सुट्ट्याजवळ आल्या कि एक टाईम शाळा अन् शाळा सुटली की सगळे पोरं मळ्याकडं… धावत सुटायचो एकदम…तिथल्या किर्तनासाठी नव्हतोच जात आम्ही. मळ्यात जाताना वढ्याच्यावर चिंचाची सात आठ झाडं रांगेत उभा राहून बोलवायची आम्हाला. काही पोरं तर दप्तर पाठीवर घेऊन सरळ मळ्याकडं निघायचे.सप्त्यामुळं मळ्याचा मालक कुणाला रागवत नसे.अन आम्हाला ह्योच चांन्स असायचा चिंचा खायचा…मळ्याचा मालक बोलत नसला तरी दात खाऊन बघायचा सगळ्यांकडे आणि एखादा तावडीत सापडलाच तर त्याला आडूशाला घेऊन चोपायचा…इग्रजी चिंचाचं भारी अप्रुप वाटायचं.झाडावर लटकलेल्या लाल हिरव्या चिंचा पाह्यल्या की जिभ आधीच तुरट व्हायची.आसपास आणखी मळे होतेच.त्यातल्या आंब्याच्या झाडाच्या कवळ्या कैऱ्या जमा करुन मिठ लावून झाडाखाली खात बसणे हे ही तेव्हाच जमायचं.घरुन कागदात बांधून आणलेलं मिठ खिशातच सांडायचं.त्यामुळं लेमन गोळ्या खारट लागायच्या कधी कधी…मला झाडावर चढता येत नव्हतं.म्हणून झाडावर चढलेल्या पोरांकडे खाली उभा राहून चिंचा मागणे हा उद्योग मी नेहमीच करत असे.त्यामुळे माझ्या वाट्याला नेहमी कच्या , हिरव्या चिंचाच जास्त आल्या…
मंदीर तसं लहानच.आजुबाजुला चिंचाची,रामफळाची,बेलाची,आंब्याची खूपसारी झाडं असल्यामुळे गडद सावली नेहमी पडलेली असायची.दुपारी उन्हाचे चटके लवकर बसू लागतात.त्या झाडांच्या गर्दीत माणसं गार सावलीत बसून किर्तन ऐकायची.खरतर ऐकायची नाहीतच.झोपायची जास्त. दुरवरुन बघीतलं तर झाडांमधली माणसं दिसायचीच नाहीत.तिथे जवळच एक मोठी जुनी विहीर आहे.उन्हाळा असला तरी भरपूर पाणी असायचं.रानात धिंगाना घालून दमलो की त्या विहीरीचं पाणी शेंदून प्यायचं आणि झाडाखाली जावून निवांत झोपायचं…नाहीतर खिशात जमा केलेले वाळलेले बोरं चघळत आभाळकडं बघत पडून रहायचंमग नकळत किर्तनाचे शब्द कानावर पडायला लागले की डोळे बंद व्हायचे आणि नंतर कानात फक्त वाऱ्याचा आवाज,तोही नंतर विरत जायचा…जे प्रत्यक्ष केलेलं असतं ते परत स्वप्नात जशास तसं दिसायचं.फक्त माझ्याबाबतीतच असं होत की माहित नाही पण माझ्या स्वप्नाचा शेवट,”आपल्याला मळ्याच्या मालकानं पकडलय आणि खोपच्यात घेऊन जाम चोपायला सुरुवात केलीय किंवा आपण झाडावर चढलो आहोत आणि अचानक मळ्याचा मालक झाडाखाली येऊन मला शिव्या हासाडतोय आणि बाकीचे पळून गेलेले…असाच काही तरी होत असायचा.
जाग आली आणि विहीरीवर जावून तोंडावर थंडगार पाणी मारलं की एकदम नवं नवं वाटायचं सगळं.चार वाजता तिथं जमलेल्या भक्तांना चहा द्यायचे.तो घेण्यासाठी शहाण्या लेकरासारखं म्हातारी माणसं बसताता तिकडे जावून बसायचो.कधी कधी चहा वाटायला मिळावा म्हणून धडपडायचो आणि तशी संधीही मिळायची.सगळ्यांना चहा देताना आपण काहीतरी खूप मोठं पुण्य करतोय असच वाटयचं.तेव्हा चहा नाही मिळाला तरी चालून जायचं.कळशीभर पाण्यात तांब्याभर दुध टाकून बनवलेला चहा अमृत वाटयचा… चहा संपवून ,कप बकेटीय बुचाळून ठेवायचे. बाकीच्यांना वापरता यावेत म्हणून…लगेच घरी निघायच.
घरी जाताना चिंचा,बोरांनी खिसा भरलेला असायचा.वडिलांना फार कौतुक वाटायचं.ते खूश व्हायचे.त्यांनी असच खूश व्हावं म्हणून मी रोज काही ना काही आणत असे.आईला चिंचा घालतेलं वरण खूप आवडतं.आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं.म्हणून भरपूर चिंचा जमा करुन ठेवल्या होत्या.मी चिंचाचा गोळा करायचो मिठ लावून, तर वडिल पन्ह करायचे…
सात दिवस असेच जायचे.कधी कधी एखादी चपाती खिशात घालून घेऊन जायचो.भुक लागली तर तशीच खायचो.सगळ्यात जास्त मज्जा शेवटच्या दिवशी.समाप्ती.गावातली सगळी बायका,पोरं,म्हातारी माणसं,घरच्या शेळ्या घेऊन तिथंच चारत बसायचं.काल्याचं किर्तन संपेपर्यंत रोजचा दिनक्रम…स्पिकरवर विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला की,धावत तिकडे जावून जागा पकडणे आणि.जागा पकडताना मित्रांसाठी पाय फाकवून उभा राहणे म्हणजे हमखास शिव्या…पानांच्या पत्रावळीत बुंदी पडली की बायका पदरात पत्रावळी बांधून घराकडं निघायच्या.म्हातारी, दात नसलेली माणसं तिथच खात बसायची.स्पिकरवर महादेवाची गाणी लावली जायची.ते गाणं मोठ्यानं म्हणत,ओरडत घराकडे पळत सुटायचो…प्रसादाची बुंदी कागदात बांधून…वाळलेली बोरं ,चिंचा खिशात घेऊन…इतक्या वर्षानंतर आज प्रकर्षानं जाणवतय आणि एकाच प्रश्नानं मनात घर केलय…त्या बोरा-चिंचासारखेच ते क्षण खिशात भरुन आणता आले असते तर…?
आजही सगळं तसच आहे.फक्त आता त्या वढ्यामधून पाणी वाहत नाही आणि बांधावर एकारांगेत उभं राहून आवाज देणारी चिंचाची झाडं नाहीत…आता दुरवरुन बघीतलं तरी ते मंदीर दिसतं.तिथली काही झाडं आहेत पण त्यांची दाट सावली पडत नाही. विहीरीचं पाणी तळाला गेलय.पण गोडवा तसाच आहे…काही चिंचाची झाडं आहे आजही तशीच.इंग्रजी चिंचाची,लाल हिरव्या चिंचांनी बहरलेली…आता सप्ता होतो दरवर्षीपण पोरं तिकडं जात नाहीत…गावात कँरम आलाय,इंटरनेट आलय…
सप्त्यातल्या चहाची चव नंतर मिळालीच नाही कुठे…त्या झाडावरच्या चिंचा झाडावरच पिकून गळून पडतात.मळ्याचा मालक चिंचा जमा करत असतो.तोंडाला पाणी आणणाऱ्या चिंचांनी डोळ्याला पाणी आणलं होतं. एखादं शेळ्या पाळणारं पोरगं दिसलं तर त्याच्या हाताच चिंचेचे दोन आकडे ठेवून आशेनं बघतो…
पोरं चिंचा तोडायचे म्हणून तो त्यांच्या मागे पळत नव्हतापोरगं गमावलं होतं त्याचं…असच झाडावर चिंचा काढताना पडलं म्हणून….!हे खूप उशीरा कळलं , त्यांना दिलेल्या शिव्या आठवल्या … मन शांत होतं,काही बोलता येत नव्हतंमनातल्या मनात मी त्यांना साँरी म्हणत राहीलो….
-संतोष गायकवाड
औरंगाबाद.
कॉलेज कट्टा.
Leave a Reply