
माझ्यातच आहे…!
दहावीचा निकाल लागला त्यादिवशी मी परिचिताच्या घरी गेलो. घरातल्या शांत वातावरणावरुनच लक्षात आलं ‘निकाल’ काय लागला असेल. आई, बाप आणि मुलगा तिघेही पडलेल्या चेह-याने माझ्यासमोर बसले. “नापास झालास हे निश्चितच वाईट. खरंतर तुझ्यातच आहे दहावी पास होण्याची जिगर. तू मनापासून ठरवलं तरच हे अपयश, यशात बदलु शकतं. तुला वेळ मिळाला तेव्हा अभ्यास केला नाहीस हेच ह्यावरून सिद्ध होतंय. सांगायची वेळ आता निघून गेलीय. जिंकण्याची जिद्द स्वतःमधेच असते. माझ्यातच आहे दहावी पास होण्याची क्षमता. जोपर्यंत स्वतःमध्ये जाऊन, स्वतःशी संवाद साधणार नाहीस, तुझ्यातली बलस्थानं कोणती, दुर्बलस्थानं कोणती ह्याचा शोध घेणार नाहीस तोपर्यंत तुला तुझ्याविषयी कळणार नाही. अपयश मिळतं तेव्हाच ख-या अर्थाने आपण स्वतःमधे डोकावलं पाहिजे, स्वसंवाद साधलाच पाहिजे. मी पुस्तकं वाचली म्हणुनच मी विचार करु लागलो तेंव्हा मनापासून वाटलं अमुक एका विषयी व्यक्त व्हावं, लिहावं. लिहिलं. अनेकांना वाचून दाखवलं. त्यांची मतं, विचार विचारात घेतले. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की माझ्यातच आहे व्यक्त होण्याची, लिहिण्याची, वाचनाची, निरिक्षण, मनन, चिंतन करण्याची क्षमता-उर्मी. मुला, नापास झालास म्हणून खचु नकोस. अपयश आलं म्हणजे
लगेच आपण अपात्र आहोत असं नसतं. अपयश अनेकांना येतं. अपयशाकडं जे सकारात्मकतेनं पाहतात तेच यश मिळवतात कारण अभ्यासांती लक्षात येतं माझ्यातच आहे अपयशावर मात करण्याची हिंमत, माझ्यातच आहे यशोशिखरावर जाण्याची धमक. माझ्यातच आहे बरंचसं मिळवण्याची जिगर.”
माझं बोलणं ऐकून तिघांचेही चेहरे प्रसन्न दिसु लागले. मुलगा म्हणाला,”नापास झालो म्हणून मी खचलो पण तुमच्या शब्दांमुळंच माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली. नापास शब्दातील ना अक्षर काढुन टाकण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणारच. तुम्ही जे सांगितलं ते खरंच माझं भविष्य उज्वल करणारच.” वडिल म्हणाले,”मुलगा नापास झाला तर जवळचेही भेटायला आले नाहीत. तुम्ही फक्त आला नाहीत तर जे चांगलं, प्रेरणादायी आहे ते सांगितलं-अगदी मनापासून, आमचं चांगलं व्हावं म्हणून. खचलेल्या क्षणीच आधार हवा असतो, तो तुम्ही खूपच चांगल्याप्रकारे दिलात. धन्यवाद.” मी म्हणालो,”माझ्याही गरजेच्या वेळी मला, एकानं शब्दाधार दिला होता तेच मी केलं. शब्दांचा आधार माणसं जोडतो, नातं द्रुढ करतो. महत्त्वाचं म्हणजे गरजेच्या वेळी कुणीतरी पाठिशी असावंच.”
लेखक-सुनील वनाजी राऊत,
मो.९८२२७५८३८३.
कॉलेज कट्टा
Leave a Reply