
नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) आणि दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन, अन्य) या कलाक्षेत्रांत व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर ह्या संस्थेने जाहीर केलेली ही एक वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे.
‘रंग’ ही संकल्पना भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून प्रयोगकलांच्या संदर्भात वापरली गेली आहे, तसेच दृश्यकलांतही ‘रंग’ हा घटक किती महत्त्वाचा आहे, हे आपण जाणतोच. ‘सेतू’ म्हणजे दोन तीर जोडणारा. पूर्वअनुभव किंवा कलाशिक्षण, सृजनात्मक काम आणि प्रत्यक्ष व्यवसाय यांचा दुवा सांधणारी ही अभ्यासवृत्ती आहे, म्हणून हिचे नाव ‘रंगसेतू’.
पूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवून, त्यांचे परीक्षण करून प्रत्येक कलाक्षेत्रातील ५ व्यक्तींची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाईल. चार तज्ज्ञ समन्वयक दि. ७ व ८ मार्च २०२० रोजी दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखती घेऊन प्रत्येक कलाक्षेत्रातील एक, अशा एकूण चार कलाकारांची अंतिम निवड ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीसाठी करतील. अभ्यासवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम दि. ४ एप्रिल २०२० रोजी होईल.
अभ्यासवृत्तीचे स्वरूप :-
निवड झालेल्या कलाकारास दरमहा रु. दहा हजार (पूर्ण वर्षात रु. एक लाख वीस हजार) अशी अभ्यासवृत्ती दिली जाईल. दर तीन महिन्यांनी कलाकाराने आपण केलेल्या सृजनात्मक कामाचा वृत्तांत / आढावा पाठवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या समितीने ह्या वृत्तांतास मान्यता दिल्यानंतर अभ्यासवृत्तीचा पुढील हप्ता देण्यात येईल. अशा प्रकारे एकूण चार हप्त्यांमध्ये ही अभ्यासवृत्ती दिली जाईल. अभ्यासवृत्तीच्या अखेरीस सर्व कलाकारांनी या अभ्यासवृत्तीच्या कालावधीत केलेल्या सृजनात्मक कामावर आधारित विशेष प्रस्तुती (नाट्याविष्कार, प्रदर्शन, संगीत/नृत्य मैफल, व्हिडीओ/ ऑडीओ प्रॉडक्शन, इ. प्रकारे) महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये करणे बंधनकारक असेल.
अर्जदाराची पात्रता :-
वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे
महाराष्ट्रात जन्म, शिक्षण / गेली किमान ७ वर्षे वास्तव्य
स्वत:च्या कलाक्षेत्रातील औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षण/ पदवी आणि किमान ७ वर्षांचा अनुभव
सध्या कलाक्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक
कलाकार कोणत्याही स्वरूपाची पूर्ण वेळ नोकरी / अन्य व्यवसाय करणारा नसावा
या अभ्यासवृत्तीसाठी दि. २० फेब्रुवारी २०२० च्या आधी छापील स्वरूपात खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्जासह आपले छायाचित्र, तसेच आपल्या कलाक्षेत्रात आधीच्या केलेल्या कामाचे नमुने (लेखन/ फोटो/ व्हिडीओ/ ऑडीओ/ यूट्युब लिंक्स) जोडणे आवश्यक आहे. छापील अर्जासह ऑनलाईन अर्ज गूगल फॉर्म्स / ईमेल द्वारे पाठवणे आवश्यक आहे.
अटी :-
अर्ज पूर्ण भरलेला असावा.
अर्जदारास कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती/पाठ्यवृत्ती सध्या चालू नसावी.
‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती मिळाल्यास त्या एका वर्षाच्या काळात धारकास अन्य कोणतीही शिष्यवृत्ती/पाठ्यवृत्ती स्वीकारता येणार नाही.
‘रंगसेतू’ अभ्यासवृत्ती मिळाल्यास त्या एका वर्षाच्या काळात धारकास ही अभ्यासवृत्ती कोणत्याही कारणास्तव सोडता येणार नाही. मात्र धारकाचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याची अभ्यासवृत्ती बंद/रद्द करण्याचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे राहील.
महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : दि. २० फेब्रुवारी २०२०
दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखत व निवड : दि. ७ व ८ मार्च २०२०
अभ्यासवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम : दि. ४ एप्रिल २०२०
अर्जकर्त्याने खालील तपशील पूर्ण भरावे –
अ) वैयक्तिक माहिती :-
नाव
जन्मदिनांक
वय
लिंग
अविवाहित / विवाहित
सध्याचा पत्ता
कायमचा पत्ता
ईमेल
दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक
शैक्षणिक पात्रता
कलाक्षेत्रातील पात्रता व अनुभव
पुरस्कार व प्राप्त यश
आ) आधी केलेल्या कला-प्रवासाविषयी, त्यांतील अनुभवांविषयी टिपण (सुमारे ५०० शब्द)
इ) ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीच्या कालावधीत आपण करू इच्छिणाऱ्या सृजनात्मक कामावर एक टिपण (सुमारे ५०० शब्द)
ई) अर्जासह जोडलेल्या नमुन्यांवर (लेखन/ फोटो/ व्हिडीओ/ ऑडीओ/ यूट्युब लिंक्स) टिपण (सुमारे ५०० शब्द) .
अर्ज पाठवण्याचा पत्ता :-
रंगसेतू अभ्यासवृत्ती, महाराष्ट्र कल्चरल सेंटर – द्वारा सुदर्शन रंगमंच, ४२१, शनिवार पेठ, पुणे ४११०३०
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता :-
नाट्य: rangasetu.theatre@gmail.com
दृश्यकला: rangasetu.visual@gmail.com
संगीत: rangasetu.music@gmail.com
नृत्य: rangasetu.dance@gmail.com
ऑनलाईन अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहे – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdX578WhY0VVj7iAjnRLz-xGCHitpAx9g0-g_Z3H2qQqgpLaw/viewform?usp=pp_url
मनोरंजन वार्ता
रितेश साळुंके
प्रतिनिधी-कॉलेज कट्टा
Leave a Reply