
कॉलेजमधील माझ्या व्याख्यानात एका मुलाला मी विचारलं,”तू कोण होणार आहेस?” क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला,”मी दूसरा सचिन तेंडुलकरच होणार.” मी, त्याला सचिनच्या वडिलांचं नाव विचारलं. त्याला सांगता आलं नाही. क्रिकेट खेळत असशीलच. एकही धाव न काढता तू बाद होतोस त्यावेळी नाराज होतोसका हेसुध्दा विचारलं. सचिनविषयी काय काय माहित आहे ते सांगायला सांगितलं. तो निशब्द. *मी म्हणालो,”आपल्याला जे व्हायचं आहे त्याविषयी अभ्यास करणं गरजेचं आहे. यश कधीही एका रात्रीत मिळत नसतं, मिळणारही नाही. खरं तर तु सचिवविषयी वाचन करणं, व्हिडिओज पाहणं, इतरांकडुन माहिती मिळवलीच पाहिजेस. महत्वाचं म्हणजे सचिन तुझ्या मनात भिणंलाच पाहिजे. असं स्वतःमध्ये भिणलं तरच आपण जे व्हायचं आहे, त्यादिशेने वाटचाल करु शकतो. सचिनविषयी माहिती वाचणं, व्हिडिओज पाहणं म्हणजेच सचिनला तुझ्यात भिणवुन घेणं, सचिनचा अभ्यास करणं. यशस्वी झालेल्या व्यक्तींनी अपयश कसं पचवलं, संकटांवर कशी मात केली, त्यांनी आत्मविश्वास कसा वाढवला, द्विधा मनस्थिती झाली तेव्हा त्यांनी नेमकं काय केलं? नकारात्मक विचारांवर कशी मात केली, त्यांच्यावर अनपेक्षित संकट आलं तेव्हा ते कसं वागले, मी कसा वागलो असतो ह्या सर्वांचा अभ्यास, मनन, चिंतन करणं म्हणजेच आपण जे व्हावसं वाटतं त्याकडे वाटचाल करणं होय. दुखत असतांना आपण दवाखान्यात जातो. डॉक्टरांनी दिलेली औषधं आपण घेतो. का? कारण आपल्याला बरं व्हायचं असतं. बरं होण्याची प्रक्रिया, औषध पोटात गेल्यानंतर सुरु होते म्हणजेच बरं होण्याची प्रक्रिया औषध आपल्यात भिणल्यावरंच होतेना? सचिनसारखं होण्याचं तुझं ध्येय हेच तुझं सर्वस्व झालं पाहिजे. स्टम्प्स, बॉल, ग्लोज, फोर, सिक्स, वाईड, नो-बॉल, रन आऊट, एल बी डब्ल्यू, ग्राउंड, बॉलिंग, कॉमेंट्री… हेच तुझं सर्वस्व झालं पाहिजे. मैदानावर तू खेळतोय. फोर, सिक्स मारण्याचा धडाका तू लावलाहेस. प्रेक्षक अत्यानंदानं तुझ्या नावाचा जयघोष करताहेत, तू संघाला जिंकुन दिलंस, सामनावीर म्हणून तुझं नाव पुकारलं गेलंय, तुझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण तू एंजॉय करतो आहेस…हे…हे सगळं म्हणजेच तुझं ध्येय. प्रत्येक बॉल मारतांना तुझ्या डोळ्यांसमोर तुला फक्त आणि फक्त सचिनच दिसतोय. शक्य झालंच तर एकदा सचिनला भेट. कारण यशस्वी व्यक्तीची सकारात्मक उर्जा, आपल्याला, त्यांच्या सहवासात मिळतेच. त्यांचा तो सहवास आपल्यात भिणतोच.” त्याच्यासह कॉलेजातल्या सर्व मुला-मुलींनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
-सुनील वनाजी राऊत. मो.९८२२७५८३८३
-कॉलेज कट्टा
Leave a Reply