
“बाबा आमटे यांनी एकदा तुमच्या मनाचा ताबा घेतला कि तुम्ही पहिल्यासारखे होऊच शकत नाही” असे पु.ल. देशपांडे म्हणायचे. थोर समाज सुधारक बाबा आमटे महत्वपूर्ण माहिती निबंध भाषण मराठी
कुसुमाग्रज तर बाबा आमटेंच वर्णन ‘अफाट नैतिक शक्तीच धगधगणार बलाढ्य इंजिन’ असं करतात. असं कोणतं वलय या माणसाला लाभलं होत? जे समजून घेतल्यावर पुलंच्या वाक्याच्या प्रचिती येते. दगडांच्या भग्नावशेषांमधे सौंदर्य शोधणार्या मानवजाती मधील या मानवाने मात्र जिवंत माणसांच्या भग्नावशेषांमध्ये सौंदर्य पाहिलं. ‘त्या’ माणसांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी आयुष्भर स्वतः जळत राहून प्रकाश देण्याचं काम बाबांनी केलं. मेल्यानंतर मी जिथे मरेल त्याच ठिकाणी मला पुरा तेथील जमिनीतील किडे माझे शरीर खातील, झाडांच्या मुळ्या माझ्या अस्थिमज्जा शोषून घेतील, मृत्यूनंतरही माझा देह कोणाच्या तरी उपयोगी पडेल अशी इच्छा बाळगणारा हा ‘कर्मयोगी’.
थोर समाज सुधारक बाबा आमटे माहिती निबंध भाषण मराठी
Baba Amte Information Biography Essay Speech in Marathi Language
साल १९१४ ला पहिल्या महायुद्धाला प्रारंभ झालेला होता. पण त्याही पूर्वीपासून येथील समाजव्यवस्थेत एक महायुद्ध सुरु होत ते म्हणजे दलित, कुष्ठरोगी, दरिद्री यांचं. या महायुद्धाच्या समाप्तीचा अध्याय लिहू पाहणार्या एका कर्मयोग्याचा जन्मही ह्याच वर्षी झाला. २६ डिसेंबर १९१४ रोजी देविदास आमटे व लक्ष्मीबाई आमटे यांच्या पोटी बाबा आमटे यांचा जन्म झाला. बाबांच्या जन्माची कहाणी पण रोमांचित करणारी होती. लक्ष्मीबाई पतीबरोबर चंद्रपूरला प्रवासाला निघाल्या होत्या, ऐन प्रवासातच त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्याने मोठाच प्रसंग उद्भवला वाटेतच हिंगनवाटा येथे त्या उतरल्या व येथेच बाबांचा जन्म झाला.
थोर समाज सुधारक बाबा आमटे यांच्या जीवनावर वाचनीय पुस्तके
गोरजा येथे तब्बल ४५० एकर जमीन असणार्या जमीनदाराचं हे पोरग जन्माला येतानाच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलं. वडील देविदास हरिबाजी आमटे हे सरकारी नोकरी मध्ये ऑडिटरच्या प्रतिष्ठित पदावर कामाला, भविष्यात ही सारी संपत्ती, मालमत्ता वारसाहक्काने याच पोराला मिळणार होती. पण ह्या सगळ्या मालमत्तेचा, संपत्तीचा ऐशोआरामाचा त्याग करून बाबांनी मात्र दुसर्यांसाठी जगण्याचा व झटण्याचा मार्ग निवडला. घरच्या कुलदैवत श्रीकृष्णावरून या पोराचं नाव मुरलीधर असे ठेवण्यात आले पण त्याच्या आईचं लाडकं नाव ’बाबा’ हेच आयुष्यभर त्यांना लाभलं. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीता सांगितली त्याच पद्धतीने ह्या मुरलीने मात्र ‘मानवतेची गीता’ ह्या जगाला शिकवली.
बालपणीचा बराचसा काळ बाबांनी भावंडांसोबत नागपूर येथे घालवला. सुट्या ते गोरजा या गावी व्यतीत करायचे. याच गावी बाबा सर्व गोष्टींची निरीक्षणे बारकाईने करायला शिकले. बालवयात ब्रिटिश साम्राज्यापेक्षा येथील वर्णव्यवस्थेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. जन्मच ब्राह्मण कुटुंबात झाल्याने अस्पृश्यांसोबत उठण्याबसण्यास व त्यांची सावली सुद्धा स्वतःवर पडू देण्याची बाबांना परवानगी नव्हती पण बंडखोर बाबांनी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. बाबांच्या लहानपणीच्या या उदाहरणावरून बाबांची गरिबांप्रती असलेली आत्मीयता दिसून येते. ऐन दिवाळीच्या सणामध्ये घरच्यांनी फटाके विकत घेण्यासाठी दिलेले पैसे घेउन आनंदात हे पोरग बाजारात फटाके आणण्यासाठी निघालं. परंतु वाटेतच ह्या पोराची भेट एका भिकार्यासोबत झाली. कसलाही विचार न करता ह्या पोराने आपल्या जवळ होते नव्हते तेवढे सर्व पैसे ह्या भिकार्याच्या कटोर्यात टाकून दिले व धावतच घरी गेलं. वाचनाचे प्रचंड वेड लहानपणापासूनच बाबांना होते. 11 व्या वर्षीच बाबांनी ’गीतांजली’ वाचली. नंतर पुढे रवींद्रनाथ टागोरांच्या ओढीने ते त्यांना भेटण्यासाठी कलकत्त्याला गेले. 14 व्या वर्षी बाबांना स्वतःची पहिली बंदूक मिळाली.
बाबाच्या अनेकदा घनदाट जंगलात शिकारीला जात असत त्यांच्या ह्या खोडीमूळे वडील मात्र नेहमी चिंतेत राहत. खरतर जंगलांत भटकंती करत असताना त्यांची ओळख माडिया गोंड ह्या आदिवासी जमातीशी झाली. भामरागड परिसरातील अनेक आदिवासींची जीवनशैली ह्यामुळे बाबांना अभ्यासता आली. पुढे सगळं आयुष्य बाबांनी आदिवासींच्या कल्याणासाठी वेचल. लहानपणीच्या ह्या गोष्टींचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. बाबांच वय जस वाढत होत तसच त्यांच्या आईचा मानसिक आजारही वाढत होता. त्या सगळ्या कठीण परिस्थितीतसुद्धा बाबांच्या आईचा बाबांवर खूप जीव होता. बाबांच्या वयाच्या 20 व्या वर्षी त्यांच्या आईला मानसिक रुग्णालयात ठेवावं लागलं. हा बाबांसाठी खूप मोठा धक्का होता. पण बाबा नेहमी आपल्या आईमुळेच माझ्या अंगी बंडखोरी वृत्ती आली हे सांगत.
डॉक्टर बनण्याची इच्छा असणार्या बाबांना वडिलांच्या आग्रहाखातर मात्र वकील बनाव लागलं. 1934 मध्ये हिस्लोप महाविद्यालयातुन त्यांनी बी. ए. ची पदवी मिळवली. 1936 मध्ये एल.एल. बी. ची पदवी मिळवली. परंतु वकिली मध्ये त्यांचं मन लागत नसे. ताशी 50 रुपये मिळवून देणारी वकिली बडबड बाबांना कधीच आवडत नसे. 1943 ला वंदे मातरम घोषणा दिल्यामुळे 21 दिवस तुरुंगवासही बाबांना झाला. बाबांच्या मनावर आयुष्यभर गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा खूप पगडा राहिला. त्या मागची घटना म्हणजे बाबा एकदा रेल्वेने नागपूरला प्रवास करत असताना काही ब्रिटिश सैनिक एका नवविवाहितेची छेड काढत असल्याच त्यांनी पाहिलं. बाबांनी त्या सैनिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. समजुतदारिची भाषा न कळणार्या त्या सैनिकांना बाबांनी दोन चार ठोसे लगावले. रेल्वे थांबल्यानंतर कमाडिंग ऑफिसरने चौकशी करण्याचे वचन दिल्यावरच बाबा शांत झाले. ही सर्व घटना महात्मा गांधींना समजली, व त्यांनी बाबांचे नामकरण ’अभय साधक’ असे केले . याच काळात बाबांनी झाडूवाले, कचरा विणकर यांच्या एकूण 16 युनियन्सची स्थापना केली.
संसाराची जबाबदारी यासाठी बाबांनी टाळण्यासाठी ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि संन्याशाचा वेश परिधान करून पदभ्रमंती करण्यास सुरुवात केली. हिमालयातील अनेक आश्रमे, साधू, महंत यांना बाबांनी भेट दिली. याच काळात साधू वेशात असताना नागपूरच्या घुलेशास्त्रींच्या घरी लग्नकार्यात मदतीसाठी बाबा गेलेले होते. तेथे घुलेशास्त्रींच्या धाकट्या कन्येकडे बाबांचे लक्ष गेले व ते तिच्या प्रेमात पडले. ह्या कन्येचे नाव साधना त्यावेळी सगळे तिला इंदू म्हणत असे. येथेच बाबांचे व त्यांचे प्रेम जुळले. आठ दिवसांच्या मुक्कामात बाबांच्या मनाचा ताबा इंदूने घेतला. त्यानंतर अनेक दिवस बाबा व इंदू मध्ये पत्रव्यवहार चालू होता. अखेर बाबांनी इंदू सोबत लग्न करण्याचे ठरवले. परंतु या बेभरवशाच्या पोराला आपली पोर देण्यास साधनाताईंची आई व घरचे तयार नव्हते. इंदूनी बाबांसोबत लग्न करण्याचा ठाम निर्णय जाहीर केल्यानंतर मात्र 18 डिसेंबर 1946 त्यांच लग्न झालं. नंतर आपले आयुष्य बाबांसमवेत साधनाताईंनी घालवले. बाबांनी यापूर्वीच सर्व सुख संपत्तीचा त्याग केला होता. लग्नानंतर एका ब्राह्मणाच्या घरात ते भाड्याने राहत होते. तेव्हा अनेक जातीय कार्यक्रमांना जायचं बाबानी टाळलं. मात्र दलित वस्तीतील कार्यक्रमाला ते आवर्जुन जात असत. त्यानंतर दलित वस्तीत बाबा व ताईंचा वावर हा नित्याचाच झाला. वंचितांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, गावातील चहाच्या दुकानांची व इतर उपहार गृहांची दारे दलितांसाठी खुले करणे हेच बाबांचे ध्येय होते. एक दिवस तर प्रत्येक दलित जातीतील एका सदस्याला घेऊन बाबा हॉटेलमध्ये गेले. नाईलाजाने त्या मालकाने सर्वांना चहा पाजला. येथेच न थांबता बाबा आता रोज वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये जात. याचा परिणाम म्हणजे लोक बाबांच्या जीवावर उठले, जीवे मारण्याच्या धमक्या, घरांवर रात्री-बेरात्री दगडफेक, इत्यादी गोष्टी सुरु झाल्या. घरमालकाला बाबांचे दलितांविषयीचा प्रेम समजताच त्याने त्यांना घर सोडण्यास सांगितले.
बाबा व ताई बरोड्यातील रा. कृ. पाटील यांच्या घरात मुक्कामाला आले. येथेच बाबांच्या सामाजिक जीवनाचा पहिला प्रयोग सुरू झाला-श्रम-आश्रम. हा प्रयोग म्हणजे सगळ्या जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र राहायचे, एकत्र श्रम करायचे व रात्री एकत्र जेवण करायचे. येथे उगवणार्या भाज्या बाजारात विकण्यासाठी बाबा स्वतः जात. अठरा महिन्यानंतर आर्थिक कारणांनी बाबांनी हा आश्रम बंद करण्याचे ठरवले. या प्रयोगातून मला हवं असलेलं सगळं मिळालं. श्रमातून स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेचं स्वप्न मी पाहिलं, असं बाबा म्हणाले. भंगी समाजाला हाताने मैला साफ करायचे काम बाबांनी स्वतः रोज पहाटे 3 वाजता उठून सलग नऊ महिने केले. लक्ष्मण बिर्या, बिंदा बोस यांच्या बाबांच्या त्यावेळच्या आठवणींचा उल्लेख अमरगीत या बाबांच्या चरित्रात निशा मीरचंदानी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला आहे. समाजाच्या पूर्वग्रहांची पाळमुळं शोधण्यासाठी बाबांनी संडास साफ करण्याचे काम स्वतः केले.
पावसाच्या एका रात्री मात्र बाबांच्या आयुष्यामध्ये परिवर्तनाचा क्षण आला. भंगी काम चालू असताना बाबांना कुष्ठरोग्याचे भयंकर दर्शन घडले. ते तुळशीराम याचे. रोगाच्या शेवटच्या स्टेजला हा माणूस. नुसतं सडलेले मांस नाकाच्या जागी केवळ दोन भोकं, हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या तर पत्ताच नव्हता. जिथे डोळे असायला हवे तिथे अळ्या किडे वळवळत होते. ते दृश्य पाहून पावसात भिजणार्या त्याच्या अंगावर त्यांनी गोणपटाचा तुकडा टाकला. पण त्या घटनेने त्यांच्या मनामध्ये विचारांच वादळ घोंगावू लागलं होतं त्या क्षणी बाबांनी आपल आयुष्याला या महारोग्यांच्या सेवेसाठी वाहण्याच ठरवलं. आपली इच्छा ताईंजवळ व्यक्त केली आणि त्यांनीही बाबांना मनापासून पाठिंबा दिला व सुरु झाला एक नवा प्रवास, मानवतेचा एक नवा अध्याय- आनंदवन.
त्याकाळी या रोगावर कोणताही इलाज उपलब्ध नव्हता. या रोगाची तीव्रता व सामाजिक प्रश्न जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत बाबांचा कार्य किती अफाट आहे याची जाणीव होत नाही. थोडक्यात ज्या माणसाला हा रोग झाला आहे त्याला गावाबाहेर काढले जात असे. कुष्ठरोगी जवळ येत आहे हे कळण्यासाठी त्यांना घंटा दिली जात. अनेक जाचक बंधने कुष्ठरोग्यांवर त्याकाळी होती. बाबांनी कुष्ठरोग्यांची केवळ सेवाच केली नाही तर त्यांना आत्मनिर्भर बनवले. दहापैकी उरलेल्या तीन बोटांमध्ये कार्यक्षमता जगवण्याचे काम बाबांनी केले. यानंतर कुष्ठरोग यांविषयी मिळेल ती माहिती बाबांनी आत्मसात केली. सरकारी रुग्णालय, मनोहर दिवान यांच दत्तपुर येथील कुष्ठरोग्यांसाठीचे रुग्णालय येथे बाबांनी स्वेच्छेने काम करण्यास सुरूवात केली. काही काळानंतर वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी एक दवाखाना सुरू केला. या सामाजिक चळवळीत असलेल्या मित्रांच्या सहाय्याने ’महारोगी सेवा समिती’ उभी राहिली या संस्थेची नोंदणी करण्यात आले. त्यानंतर बाबांनी कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन इथून कुष्ठरोग रुग्णांवर उपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले. या सगळ्या धावपळीमध्ये 1948 च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशचा जन्म झाला.
सरकारने बरोडा गावापासून चार किलोमीटर अंतरावर नागपूर चंद्रपूर रस्त्यावर चिमूर फाट्याजवळ 50 एकर जमीन ’महारोगी सेवा समिती’साठी प्रदान केली. अकराशे रुपये देऊन संस्थेला मिळालेली जागा साप-विंचू जंगली श्वापदे यांची वास्तूच होती. याच खडकाळ जमिनीवर उभे राहिले वंचितांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे ‘आनंदवन’. सहा कुष्ठरोगी,ताई, विकास, प्रकाश, एक लंगडी गाय आणि 14 रुपये घेऊन बाबांनी या जमिनीवर पाय ठेवला. आनंदवनातील भयावह वातावरणात महारोग सेवा समितीचा संसार सुरू झाला. राहण्यासाठी झोपड्या तर उभ्या राहिल्या परंतु पाण्याचा प्रश्न अजूनही बिकट होता. आसपासच्या पाण्याच्या साठ्यांवर कुष्ठरोग्यांना पाणी देण्यास लोकांचा विरोध होता. शेवटी बाबा आणि सहा कुष्ठरुग्णांनी खडकाळ माळराणावर विहीर खोदण्यास सुरुवात केली. मे महिन्यात 34 फुट खोदल्यानंतर खडक जरासा ओलसर लागला, पाण्याचा प्रश्न मिटला आणि भविष्यातील स्वप्नांविषयी बाबा निश्चिंत झाले. 21 जून 1951 रोजी आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते आनंदवनचे उद्घाटन झाले. जुन्या धर्मग्रथांहून सेवाव्रताचे नवे रामायण काही कमी प्रेरणादायी नसेल. असा आशीर्वाद विनोबांनी याप्रसंगी दिला. परंतु येथून पुढचा प्रवास सोपा नव्हता. लोकांचा विरोध, टीका उपहास यांना तोंड देत, प्रसंगी अनेकांनी बाबांना तर कुष्ठरोग्याकडून काम करून घेणारा आनंदवनचा हिटलर अशी टीकाही केली. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत बाबांनी आपला प्रवास चालूच ठेवला.
अवघ्या दोन वर्षात आनंदवनातील रुग्णांची संख्या 6 वरून 60 वर पोहोचली. या दोन वर्षात एकूण 6 विहिरी खणल्या गेल्या होत्या. आनंदवनचा स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. रुग्णांची मलमपट्टी, त्यांची तपासणी, त्यांना औषध देण्यापासून तर जखमा स्वच्छ करण्यापर्यंतची ही सर्व कामे बाबा स्वतः करायचे. या कुष्ठरुग्णांना झोपून ठेवून त्यांची सेवा न करता स्वतःच्या क्षमतेविषयी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. झडलेल्या सात बोटांपेक्षा उरलेल्या तीन बोटांचा सामर्थ्य त्यांच्या मनात बाबानी बिंबवलं. जे हात भिकेची कटोरी उचलण्यास असमर्थ होते त्याच हातांनी आनंदवनची शेती फुलवली. आनंदवन केवळ एक कुष्ठरोग्यांच्या सेवेचे केंद्र न बनता त्यांना स्वाभिमानाने माणूस म्हणून जगायला शिकवणार तीर्थक्षेत्रच बनले होते. सातच वर्षात आनंदवनाभोवती तीस मैलांच्या परिघात अकरा कुष्ठरोग केंद्रे उभी राहिली. बाबा केवळ आनंदवनाची निर्मिती करून थांबले नाहीत तर अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले. त्यांच्याच एका कवितेतून त्यांची हि न थांबण्याची वृत्ती दिसून येत
थांबला न सूर्य कधी थांबली न धारा,
आणि धुंद वादळास या कोठला किनारा
यानंतर मात्र एका वादळाप्रमाणे बाबांचे कार्य सुरू झालं. एकामागून एक प्रकल्प बाबांनी हाती घेतले. 1957 साली नागपूर जवळच आनंदवनचा दुसरा प्रकल्प अशोकवन सुरू केला. १९६४ ला आनंद निकेतन कॉलेज उभे राहिले. बाबांची विकास व प्रकाश हि दोन्ही मुले कॉलेजातून बाहेर पडणार्या पहिल्या बॅचमध्ये होती. एक जून 1966 रोजी बाबांनी आनंद अंधशाळा सुरू केली. 1983 साली आनंद कर्णबधीरांची शाळा स्थापन करण्यात आली. 1966 मध्ये आनंद कृषि महाविद्यालयाची स्थापना, तर 1972 मध्ये संधीनिकेतन ची स्थापना. आजही या संधीनिकेतन मधून शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती विणकाम, शिवणकाम दुरुस्तीचे, छपाईकाम, AC दुरुस्ती, मोटार रिवाइंडिंगचे काम या तंत्रशिक्षणाचा लाभ घेतात. हजारो अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचं काम संधी निकेतन आजही करत आहे. ज्या वेळी या लोकांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे असलेले आपण पाहतो त्यावेळी बाबांची दूरदृष्टी व त्यांच्या कार्याची महानता आपल्याला समजते. 1967 साली सोमनाथ प्रकल्पाची स्थापना बाबांनी केली. या श्रमिकांच्या विद्यापीठातून युवकांसाठी काम सुरु झाले. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम या विद्यापीठाने केले. शेतीचे वेगवेगळे प्रयोग त्यांनी सोमनाथ मध्ये केले. उत्तरायण प्रकल्प, हेमलकसा येथील आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प असे अनेक प्रकल्प बाबानी सुरु केले. या सगळ्या प्रकल्पात बाबांची तिसरी पिढी आज कार्यरत आहे.
या व्यतिरिक्त बाबांनी देशात एकात्मता वाढावी यासाठी ‘भारत जोडो’ अभियानाची सुरुवात केली. पाठीच्या कण्याचा आजार बळावला होता. बाबांना केवळ झोपता किंवा सरळ उभा राहता येत होत. शरीराच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या होत्या. तरीही बाबा स्वतः भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. कन्याकुमारी ते काश्मीर, ईटानगर तेओखा – उत्तर दक्षिण व पूर्व पश्रि्चम अशी दोनदा सायकल यात्रा युवकांनी केली. इचलपल्ली व भोपाळपट्टनम, नर्मदा बचाओ आंदोलन अशा अनेक आंदोलनांत बाबांनी सहभाग घेऊन आदिवासींची संस्कृती व पर्यावरण जपण्याचे काम केले. आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करून स्वतः नर्मदा खोर्यात दहा वर्षे बाबा राहिले. बाबांनी नेहमी छोट्या धरणांचा पुरस्कार केला. स्वतःची सांस्कृतिक ओळख न गमावता विकास साधता आला पाहिजे असं बाबाचं मत होते. पुढे बाबांच्या कार्याची दखल पु.ल. देशपांडें, अत्रे व अनेकांनी घेतली व आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हे कार्य जगासमोर आणले. कुमार गंधर्व, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर अशा अनेक कलावंतांनी आनंदवन मित्रमेळाव्याला उपस्थिती लावली.
बाबांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठसेवेच्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना 1983 साली गौरवण्यात आले. याशिवाय
- 1985 मॅगेसेस पुरस्कार
- 1988 संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवी हक्क पुरस्कार
- 1971-पद्मश्री,
- 1986-पद्मविभूषण
- 2004- महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- 1994-गांधी शांतता पुरस्कार
पुरस्कारांची रक्कम मात्र बाबांनी या सेवेसाठी देऊन टाकली.
8 फेब्रुवारी 2008 रोजी या जगातून बाबा गेले परंतु त्यांचे कार्य मात्र चालूच आहे. आनंदवनापासून सुरू झालेल्या या कार्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे अनेक प्रकल्प आज उभे राहिले आहेत. डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे यांच्यासह आता तिसरी पिढी देखील वेगवेगळ्या जबाबदार्या पार पडत आहे. पाठीच्या कण्याच्या असाध्य रोगाने कायमस्वरूपी जखडून टाकूनही बाबांनी न थकता हे कार्य उभं केलं. ज्वाला आणि फुले, करुणेचा कलाम, उज्ज्वल उद्यासाठी या पुस्तकांमधून व आपल्या कवितांमधून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम बाबा आजही करतात. सात दशके सतत हा महात्मा कार्यरत होता. लाखो लोकांच्या जीवनात जगण्याचा प्रकाश बाबानी ह्या सात दशकात निर्माण केला. जीवनाचा प्रत्येक क्षण बाबांनी दुसर्यांसाठी जगला. बाबांच्या नवनिर्मितीचा इतिहास-वर्तमान प्रचंड मोठा आहे. बाबांच्याच कवितेत म्हणायचे तर…
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजं नसतात
त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते
आणि सर्जनशील साहसांना सीमा नसतात
त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते
-निलेश आंबरे (MJMC-I)
संज्ञापन व वृत्तपत्रविद्याविभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
संदर्भ ग्रंथ
1-अमरगीत – निशा मिरचंदानी , मराठी अनुवाद- लीना सोहोनी
2-महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला खंड 61 वा बाबा आमटे – सुचित्रा घोगरे-काटकर
3-बाबा आमटे एक विज्ञान योगी – पु. ल. देशपांडे
4-शेतकरी बाबा आमटे- विकास आमटे, लोकसत्ता 28 मे 2017
5-विकिपीडिया
6-http://anandwan.in
7- संत कविता- कुसुमाग्रज
मित्रांनो, थोर समाज सुधारक बाबा आमटे माहिती निबंध भाषण मराठी Baba Amte Information Biography Essay Speech in Marathi Language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
थोर समाज सुधारक बाबा आमटे यांच्यावर वाचनीय पुस्तके
Leave a Reply