डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा

साधारण दहा वर्षांचा तो मुलगा दवाखान्यात आला आईसोबत. मी विचारलं तेव्हा समजलं की तो मुलगा इंजेक्शनला घाबरतोय. माझ्या जवळ बसवलं. त्याचे डोळे माझ्या रुमालाने पुसले. मी, त्याला विचारलं, “डर के आगे क्या है?” त्याने नकारार्थी मान हलवली. “डर के आगे जीत है. तुला बरं व्हायचंयना?” त्याने होकारार्थी मान हलवली. “बरंव्हायचंय तर मग कडू गोळी घ्यावी लागतेचना?” त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली. “इंजेक्शन म्हणजे वाईट, भयंकर असं काहीही नसतं.घाबरायचं नाही. इंजेक्शनमधलं औषध शरीरात गेलं तरच तुला बरं वाटेलना?” त्याने होकारार्थी मान हलवली. त्याचा हात, मी हातात घेतला. म्हणालो,”तुझ्याएवढा असताना मी डॉक्टरांना म्हणायचो डॉक्टरसाहेब द्या इंजेक्शन. इंजेक्शन घेतलं की दुसर्या दिवशी ठणठणीत बरा व्हायचो.” मुलगा कौतुकाने माझ्याकडे बघायला लागला. “मुला कधीही घाबरून जगू नकोस. ज्याची भीती वाटते तीच गोष्ट वारंवार करायची म्हणजे भीती मरते आणि आपण जिंकतो. कायमच लक्षात ठेव घाबरणारी माणसं कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत तर जी माणसं आलेल्या दुखण्याला हसतमुखाने सामोरे जातात तीच जिंकतात कारण त्यांना माहित असतं तर के आगे जीत है.” त्याचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. “रडायचं नाही तर खंबीर मनाने भीतीवर विजय मिळवायचा. भीतीने आपण स्वतःला दुबळं बनवतो हे आपल्याही लक्षात येत नाही. जो डर गया वो मर गया. लढायचं स्वतःच्याच नकारात्मक विचारांविरोधात लढायचं, घाबरण्याचा विरोधात लढायचं.” माझा नंबर आला तेव्हा त्या मुलाला मी म्हणालो, “नंबर माझा आलेला असला तरी तू जा डॉक्टरकडे. मुलगा आत जाऊन, इंजेक्शन घेऊन बाहेर आला पण रडण्याचा, ओरडण्याचा आवाज अजिबात आला नाही. घाबरणं हे भ्याडफणाचं लक्षण. कशाला घाबरायचं? का घाबरायचं? कणखर मनाची माणसंच घाबरण्यावर मात करतात. घाबरुन कधीही जगणं होणार नसतं . प्रत्येक पावलावर संकट आहे हे एकच पाय असलेल्या माणसाला माहित असतं म्हणून तो एका पायाने चालणं सोडून देतोका? नाहीना? त्याला माहित असतं पाय एकच असला तरी मनातले कणखर विचार दुसऱ्या पायांचंही काम करताहेत. खरं तर घाबरणं हा स्वभावधर्म आहे पण मी घाबरणारंच नाही हा विचारही स्वभावधर्म होऊ शकतो जर आपण ठरवलं तरच. डर के आगे जीत है हे समजणारी माणसं खूप काही मिळवतात. घाबरुन दुबळं होण्याऐवजी स्वतःच, स्वतःचा आधार होऊन घाबरण्यावर मात करुया. फक्त एक चांगला-सकारात्मक विचार शेकडो नकारात्मक विचारांवर मात करतोच.
मराठी प्रेरणादायी बोधपूर्ण कथा लेख
-लेखक-सुनील वनाजी राऊत. कॉलेज कट्ट मो.९८२२७५८३८३.
Jabardast preranadàyi lekh