
Srinivasa Ramanujan Information History Biography in Marathi
गणित आणि सांख्यिकी म्हंटले की, संपूर्ण जगात काही निवडक लोकांचे नाव आदराने घेतले जाते. आपण भारतीय जरी अनभिज्ञ असलो तरी हे एक जगन्मान्य सत्य आहे की, श्रीनिवास रामानुजन हे एक सर्वश्रेष्ठ गणिती होते. तत्कालीन गणितज्ञ लिटलवुड ह्यांच्या मते श्रीनिवास रामानुजन यांची सर आयझॅक न्युटन यांच्याशी तुलना आपण करू शकतो. आणि याच प्रतिभेमुळे रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवणारे ते सर्वात तरुण (वय ३१) असलेल्या फेलोंपैकी एक ठरले. रॉयल सोसायटीची फेलोशिप म्हणजे ऑस्करचा लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड मिळण्यासारखे आहे. रात्रंदिवस सूत्र आणि गणिती समीकरणात गढून जाणारा असा महान गणिती भारतात होऊन गेला याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा. रामानुजन म्हणजे स्वतःच्या संघर्षातून कष्टाने गणिती अवकाशात अढळपद प्राप्त करणारा ध्रुवतारा होत.
प्रत्येक भारतीयाला त्यांच्या जीवनपटाबद्दल माहिती हवी म्हणून केलेला एक छोटासा प्रयत्न.
बालपण:
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू राज्यातील तंजावर जवळील एरोड या गावी झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब कुभकोनम या पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या रम्य ठिकाणी स्थलांतरित झाले. तेथील मंदिरांच्या भिंतींवर तसेच फरशीवर बरेच दिवस रामानुजन यांनी गिरवलेल्या गणिताच्या नवनवीन सूत्रांचा वास होता. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा बालक बरेच वर्ष बोलत नव्हता. मुलगा मुका निघेल की काय? या भीतीने अनेक दिवस वडील के. श्रीनिवास व आई कोमलतामल ह्यांना ग्रासले होते. वडील एका साडीच्या दुकानात लिपिक म्हणून काम करत व आई घर सांभाळत असे. आईच्या धार्मिक वृत्तीमुळे रामानुजन यांच्यावर देखील पूजा अर्चा करण्याचे संस्कार होते. आई मंदिरात भजन गायची व हळूहळू मुलाला देखील त्यांनी ईश्वर उपासनेचा मूलमंत्र दिला. रामानुजन यांच्यानंतर के. श्रीनिवास यांना तीनदा पुत्रप्राप्ती झाली. पण तिघेही जगू शकले नाही. रामानुजन यांनाही १८८९ साली देवीची लागण झाली होती पण त्यातून ते सुखरूप बचावले. त्याच वर्षात देवीच्या साथीने तंजावर येथे जवळजवळ ४००० जणांचा मृत्यू झाला. देवी आजाराच्या भीतीमुळे रामानुजन आईसह मद्रास (सद्ध्या चेन्नई) कांचीपुरम येथे आजी आजोबांकडे राहण्यास गेले. तिथेच १ ऑक्टोबर १८९२ रोजी त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. परंतु काहीच दिवसात आजोबांची म्हणजे आईच्या वडिलांची कोर्ट अधिकारी म्हणून असलेली नोकरी गेली व आईसह रामानुजन पुन्हा कुंभकोनम येथे परत आले. तेथेच त्यांना कंगयान प्राथमिक शाळेत घातले गेले. जिथे अभ्यासात त्यांनी चांगलीच चमक दाखवली. वयाच्या दहाव्या वर्षी १८९७ मध्ये त्यांनी इंग्रजी, तमिळ, भूमिती व अंकगणितात संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट गुण अर्जित करून ते परीक्षा उत्तीर्ण झाले व याचमुळे त्यांना एक शिष्यवृत्ती व टाऊन हायर सेकंडरी शाळेत प्रवेश मिळाला. आणि इथेच गणिताच्या औपचारिक शिक्षणाशी त्यांचा पहिल्यांदाच जवळून परिचय झाला. वयाच्या तेराव्या वर्षी एम. एल. लोने यांचे Advance trigonometry हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले व त्यातील प्रमेयांचा अक्षरशः त्यांनी फडशा पाडला व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची काही प्रमेये देखील तयार केली. त्यांची गणिती प्रतिभा एवढी जबरदस्त होती की, परीक्षेच्या अर्ध्या वेळातच ते संपूर्ण पेपर लिहून मोकळे होत.
सहाध्यायी म्हणत की, खूप मुश्किलीने ते रामानुजन यांना समजू शकत. आणि त्यांच्या प्रचंड प्रतीभेमुळे वर्गात सर्व त्यांच्याकडे आदरयुक्त नजरेने पाहत.
टाऊन हायर सेकंडरी मधील शिक्षण १९०४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर प्राचार्य कृष्णस्वामी अय्यर यांनी रामानुजन यांना के. रंगनाथ पुरस्काराने गौरविले.
कृष्णस्वानी सदैव हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून रामानुजन यांचा गौरव करत. त्यांच्यामते रामानुजन ह्यांना पैकीच्या पैकी गुणांपेक्षाही जास्त मार्क द्यायला हवेत.
पुढे कुंभकोनम येथील शासकीय कला महाविद्यालयात शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली. परंतु गणितासाठीचा त्यांचा ओढा एवढा प्रचंड होता की, सर्व विषयांचा अभ्यास करण्याचा ते कंटाळा करू लागले व ज्यामुळे गणित सोडून इतर सर्व विषयांत ते नापास झाले व त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद झाली. १९०५ मध्ये रामानुजन घर सोडून विशाखापट्टणम गाठले होते.
व्यक्तित्व:
वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत एक शब्द देखील न बोलू शकणारा हा बालक हळूहळू प्रगती करू लागला. लहानपणापासून अंतर्मुख व लाजाळू असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या वर्गातील मुलांपेक्षा ते कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान होते व याच कारणामुळे त्यांचे समवयस्क त्यांना कधीच समजू शकले नाही. ते अतिशय जिज्ञासू होते. एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण जाणून घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. सुरुवातीला नवल वाटायचे पण नंतर त्यांच्या प्रतिभेची त्यांना ताकद कळली. स्वतःच्या ज्ञानावर व क्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यासाठी ते भांडायला देखील मागे पुढे पाहत नसत. परंतु एक साधी नोकरी मिळवण्यासाठी रात्र दिवस हिंडणारा हा धडपड्या माणूस आयुष्यभर असाच वणवण भटकत राहिला. शिक्षणानंतर जेव्हा लग्न झाले तेव्हा पैसा कमावणे व परिवार चालवणे अपरिहार्य होते, म्हणूनच मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये त्यांनी लीपिकाची नोकरी पत्करली. त्या दरम्यान त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या.
आयुष्याला कलाटणी देणारा क्षण:
श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यात प्रामुख्याने दोन असे क्षण आले ज्यांनी त्यांचे पूर्ण जीवन बदलून टाकले.
पहिला क्षण म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी रामानुजन यांनी Synopsis of Elementary Results In Pure Mathematics हे G. S. Carr यांचे गणीतविषयी त्या काळापर्यंत अवगत असलेली सर्व मूलभूत माहिती संग्रहित असलेले वाचनालयातील पुस्तक मित्राकडून मिळवून वाचले व त्यांची गणीताशी खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि गट्टी जमली. या पुस्तकामुळे रामानुजन यांच्यातील गणिती प्रतिभा जागृत झाली असे म्हंटले जाते. G. S. Carr हे पेशाने शिक्षक होते व त्यांच्या या पुस्तकात त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गणितातील मूलभूत समीकरणांचा, प्रमेयांचा, संकल्पनांचा समावेश केला होता व तब्बल ५००० प्रमेयांचा संग्रह केलेला होता. हे पुस्तक खरे तर त्यांच्या तयार केलेल्या नोट्सचेच पुस्तकी रूपांतरण होते परंतु अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला गणितात रस निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी ही रचना केली होती. आणि रामानुजन यांना त्याच गोष्टींचा अमाप फायदा झाला. रामानुजन यांनी या पुस्तकाचा खूप गांभीर्याने अभ्यास केला.
दुसरा कलाटणी देणारा क्षण म्हणजे प्रसिद्ध गणिती G. H. Hardy यांचे इंग्लंडला येण्यासाठीचे आमंत्रण!
जर चांगले निरीक्षण केलेत तर आपल्या ध्यानात येईल की, रामानुजन यांच्या अफाट व अकल्पित ज्ञानाची भारतात कुणालाच त्याकाळी किंमत कळली नाही. जर ती कळली असतो तर आज परिस्थिती काही वेगळी असती. त्यांनी बऱ्याच विद्वानांना त्यांच्या लिहिलेल्या सूत्रांची ओळख करून दिली परंतु सर्वांना रामानुजन यांची पद्धत विक्षिप्त, अकल्पित व अपरिचित वाटली. अर्थात त्यामुळेच त्यांच्या प्रतिभेचा कुणीही गौरव केला नाही. नंतर रामानुजन यांनी इंग्लंड मधील प्रसिद्ध गणिती G. H. Hardy यांच्याकडे मार्गदर्शन व मदत मागण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला. किमान गणिताची खरी जाण असणारा तरी माझं म्हणणं समजून घेईल या उद्देशाने रामानुजन यांनी पत्रात त्यांनी तयार केलेल्या समीकरणांचा सारांश व काही निवडक प्रमेयं पाठवली.
सुरुवातीला एका भारतीय लीपिकाने पाठवलेले पत्र म्हणून Hardy यांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केले पण नंतर जेव्हा सहकारी लीटलवुड यांच्या सल्ल्यामुळे त्यांनी त्या पत्राचा अभ्यास करण्याचे ठरवले व ते अक्षरशः स्तिमित झाले. त्यांच्यामते त्या पत्रात त्या काळच्या सर्वच गणिती प्रतिभावंतांना हरवतील अशी समीकरणं, प्रमेयं लिहिलेली होते. नंतर हार्डी यांनी उद्गार काढले की, त्या पत्राकडे केवळ एक नजर टाकली तरी मी समजून गेलो की, हे कार्य सामान्य नाही.
आणि त्यानंतर Hardy यांनी स्वखर्चाने रामानुजन यांना इंग्लंड येथे येण्यासाठी आमंत्रण पाठवले. आणि ते पत्र मिळताच रामानुजन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
इंग्लंड येथील वास्तव्य:
१७ मार्च १९१४ रोजी रामानुजन यांनी इंग्लंडसाठी प्रवास सुरू केला आणि १४ एप्रिल रोजी ते लंडन येथे पोहचले आणि त्यांनतर दोनच आठवड्यात Cambridge येथे त्यांनी प्रसिद्ध गणिती G. H. Hardy आणि Littlewood यांच्या सोबत काम सुरू केले. Hardy आणि Littlewood यांना रामानुजन यांनी चांगलेच प्रभावित केले. त्या दोघांच्या मते रामानुजन म्हणजे दुसरे जेकोबी (प्रसिद्ध गणिती) होते. सुरुवातीला रामानुजन यांनी गणिताचे औपचारिक शिक्षण घ्यावे असे सर्वांचे मत होते आणि त्यामुळेच हार्डी यांच्यासोबत काम करत असताना रामानुजन यांनी ट्रिनिटी कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले. तिथेही त्यांनी शिक्षकांना त्यांच्या प्रतिभेने खूप प्रभावित केले. सर्वांना ते काळाच्या पलीकडील व्यक्तिमत्व भासत. पाच वर्ष रामानुजन इंग्लंड येथे राहिले आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे भारतात परतले. भारतात परतून देखील त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. १९२० म्हणजेच आयुष्याचे अंतिम दिवस जगत असताना देखील त्यांनी गणितासाठीच काम केले! Hardy यांना लिहिलेल्या पत्रामुळे हा खुलासा झाला.
देवी नामागिरी:
देवावर ठाम विश्वास असणारे गणिती म्हणून रामानुजन ओळखले जातात. नामागिरी येथील देवी लक्ष्मीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांच्यामते ते जेव्हा झोपेत किंवा ध्यानात असत तेव्हा त्यांना समीकरणं दिसत. आणि जागृत झाल्यावर ते सर्व लिहून काढत. रामानुजन यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास खालील उद्गार सर्व काही सांगून जातात. ते म्हणत, “एखाद्या समीकरणातून जर भगवंताचा एखादा विचार व्यक्त होत नसेल तर त्या समीकरणाचा माझ्या मते काहीही अर्थ नाही!”
ब्राम्हण कर्म ते उत्तमरित्या पाळत परंतु आईच्या कर्मठ विचारांमुळे त्यांना त्रास देखील झाला. जेव्हा इंग्लंडला येण्यासाठी त्यांना आमंत्रण आलं तेव्हा आईने या निर्णयाला विरोध केला. आई कोमलतामल म्हणत की, ” आपल्याला समुद्रावरून प्रवास करणे वर्ज्य आहे.” परंतु यावेळी पुन्हा देवी रामानुजन यांच्या मदतीस धावली. असं म्हणतात; नामागिरी आईच्या स्वप्नात आली व तिने इंग्लंडला जाण्यासाठी परवानगी दिली, तेव्हा कुठे रामानुजन यांचा मार्ग मोकळा झाला. धार्मिक वृत्तीचा हा महान गणिती आयुष्यभर शाकाहारी राहिला. हिंदू धर्म आणि देवी महालक्ष्मी सदैव त्यांच्यासाठी अग्रस्थानी होती.
गणिताच्या क्षेत्रातील योगदान:
केवळ बत्तीस वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात रामानुजन यांनी एकट्याने ३९०० सूत्रं आणि समीकरणं शोधून काढली. इन्फिनाईट सीरिजसाठीचे रामानुजन यांचे योगदान खूप महत्वपूर्ण मानले जाते. Hardy यांच्यामते रामानुजन यांचे काम पहिल्या नजरेत सामान्य दिसले तरी जसजसे त्यावर विचार सुरू होतो तेव्हा त्यातील सखोलता लक्षात येत जाई. अगदी आजही रामानुजन यांच्या कामामुळे नवनवीन कोडी उलगडत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या कामाला धरून पुढे गणितात नवीन शाखांची सुरुवात झाली आहे.
त्यांच्या कंपोजिट नंबर्स वरील संशोधनामुळे त्याच्याबद्दल त्याकाळी प्रचंड आदर वाढला होता.
वैवाहिक आयुष्य:
१४ जुलै १९०९ या दिवशी रामानुजन यांचा जानाकीशी विवाह झाला. जानकी व रामानुजन यांच्या आई ह्या मैत्रिणी होत्या आणि ही मैत्रीच नाते संबंधात परावर्तित झाली परंतु आयुष्यभर साथ देण्याचा विचार करून सुरू झालेलं हे नातं जास्त बहरू शकलं नाही. रामानुजन यांचा ध्यास आणि इंग्लंड प्रवास यामुळे खूपच कमी वेळ त्यांनी जानकी सोबत घालवला. पत्राद्वारे ती दोघे एकमेकांच्या संपर्कात होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात नाईलाजास्तव त्यांना जानकीस इंग्लंडला बोलवता आले नाही. पुन्हा परतून भारतात आल्यानंतर आजारपणात जानकी यांनी शुश्रुषा केली.
दुर्दैवी अंत:
एखाद्या महान माणसाच्या जाण्याने समाजाचं जास्त नुकसान होतं असं म्हणतात ते रामानुजन यांच्या बाबतीत अत्यंत तंतोतंत लागू होते. वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षी हा प्रगल्भ गणिती हे जग सोडून गेला. १९१७ साली त्यांना क्षयरोगाची लागण झाली आणि भारतात परतल्यावर काहीच वर्षात त्यांची तब्येत आणखी खराब झाली आणि कुंभकोनम येथे त्यांनी २६ एप्रिल १९२० रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने हार्डी यांना खूप मोठा धक्का बसला आणि ते साहजिक होते. कारण त्यांना गणित या क्षेत्राचे किती नुकसान झाले याची पुरती जाण होती.
अजुन काही वर्ष जर रामानुजन असते तर त्यांनी खूप भरीव कामगिरी केली असती आणि कितीतरी दशक गणित अर्थात माणूस पुढे पोहोचला असता.
-नवनीता (शैलेश भोकरे)
आळंदी देवाची
मित्रांनो, जगप्रसिद्ध गणित शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन महत्वपूर्ण माहिती कार्य Srinivasa Ramanujan Information History Biography in Marathi Srinivasa Ramanujan Essay Speech in Marathi language श्रीनिवास रामानुजन निबंध भाषण मराठी मध्ये ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
“कॉलेज कट्टा” म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल वाचनीय पुस्तके
Leave a Reply