
चतुरंग सवाई एकांकिका अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी
महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणाऱ्या एकांकिका स्पर्धांची संख्याही प्रतिवर्षी वाढताना जाणवते आहे. त्यातूनच नवे नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेता, अभिनेत्री पुढे येत आहेत. पण या प्रत्येकातला त्या त्या वर्षीचा ‘सर्वोत्तम‘ कोण? हे ठरतं ते चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘सवाई एकांकिका स्पर्धे‘त!
म्हणूनच जानेवारी महिना उजाडला की, तमाम नाट्यप्रेमींच लक्ष ‘सवाई‘कडे लागतं. कारण या सवाई एकांकिका स्पर्धेला, फक्त प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांमधील स्पर्धा, स्व. गणेश सोळंकींची आठवण, एकांकिकांमध्ये ‘Best of the State’ आणि ‘Best of the Year’ कोण?…. याबद्दलची उत्सुकता, तरूणाईचा जल्लोष, प्रचंड उत्साहातले नाट्यजागरण, प्रजासत्ताक दिनी (पहाटे ६.०० वाजता) सर्वात प्रथम होणारे ‘संपूर्ण वंदे मातरम्‘ असे अनेक पदर असतात.
यंदा देखील मुंबई, ठाणे, मुलुंड, कल्याण, अंबरनाथ, वसई, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी, अंमळनेर आणि इचलकरंजी येथील २३ प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांनी प्राथमिक फेरीत सहभाग घेतला होता. त्यातून श्री. प्रमोद पवार, श्री. अशोक समेळ आणि सौ. विद्या करंजीकर या तीन मान्यवर परीक्षकांनी निवडलेल्या पुढील सात एकांकिका सवाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर केल्या जाणार आहेत.
१. अ बास्टर्ड पॅट्रीॲाट (दिशा थिएटर्स ॲण्ड एंटरटेनमेन्टस्)
२. पैठणी (स.स. आणि ल.स. पाटकर वर्दे महाविद्यालय)
३. It Happens (गायन समाज देवल, कोल्हापूर)
४. ब्रह्मास्त्र (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई)
५. बुद्रुकवाडीचा मारुती बाटला (रूईया महाविद्यालय, मुंबई)
६. द कट (वलय नाट्यसंस्था, पुणे)
७. निरूपण (रंगपंढरी, पुणे)
यावर्षीपासून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सात एकांकिकांव्यतिरीक्त उर्वरित १६ एकांकिकांमधून ‘विशेष लक्षवेधी, लक्षणीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने घोषित केला असून या वर्षी प्राथमिक फेरीच्या परीक्षकांच्या शिफारसीनुसार पुढील सहा लक्षवेधी पुरस्कार सवाई अंतिम फेरीच्या वेळी कलाकारांना प्रदान करण्यात येतील.
• लक्षवेधी अभिनेत्री (प्रथम) :
ऐश्वर्या मिसाळ – भाग धन्नो भाग (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय)
• लक्षवेधी अभिनेत्री (द्वितीय) :
अक्षता सामंत – चुरगळ (अत्रेया, अंबरनाथ)
• लक्षवेधी अभिनेता (प्रथम) :
अनिकेत शहाणे – सावित्रीच्या बाबांचा घीवरपक्षी ( ओमसाई कलामंच, वसई)
• लक्षवेधी अभिनेता (द्वितीय) :
नितीन सावळे – बिफोर द लाईन्स (कलाविष्णू बहुउद्देशीय संस्था, अंमळनेर)
• लक्षवेधी लेखक :
अभिजीत जाधव Transfer of Power (सत्कर्व, मुंबई)
• लक्षवेधी दिग्दर्शक :
योगेश सप्रे, हिमांशु बोरकर – कुणीतरी पहिलं हवं (बी.एम.सी.सी कॅालेज, पुणे)
सवाईची अंतिम फेरी, प्रतिवर्षीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार दि. २५ जानेवारी, २०२० रोजी रात्रौ ८.३० वा., रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे सादर होणार आहे.
एकांकिका स्पर्धा वार्ता
–रितेश साळुंके
कॉलेज कट्टा.
खूप छान आहे सर्व स्पर्धक संघाना प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🎭💐💐💐💐