
घटोत्कच नाटकाबद्दल जाणून घेऊयात…
घटोत्कच – (लेखक – आशुतोष दिवाण, दोन अंकी नाटक)
लेखक समीक्षक नाटककार असलेल्या डॉ.आशुतोष दिवाण यांच्या, ‘घटोत्कच’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग २ तारखेला कल्याणला अत्रे रंगमंदिरला पाहिला.
या राज्य नाट्य स्पर्धेसाठी असलेल्या प्रायोगिक स्वरूपातील नाटकाला माझ्या अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त 25-30 प्रेक्षक असतील असे वाटले होते. पण संपूर्ण रंगमंदिर हाऊस फुल पाहून सुखद आश्चर्याचा धक्का बसला. जिथे मी पहिल्या चार रांगेत बसायला मिळेल या अपेक्षेने आरामात आले होते, तिथे मला शेवटून दुसऱ्या रांगेत बसायला सुदैवाने मिळाले.
हे नाटक एका पौराणिक कथेच्या आधाराने मानवी मनाचे आणि त्याच सोबत सामाजिक, राजकीय परिस्थितीचे आणि त्यांच्या प्रभावाचे दर्शन आपल्याला रंजकपणे घडवते. आणि आपल्या या हेतूत ते यशस्वीही होताना दिसते.
‘घटोत्कच’ या महाभारतकालीन भीमपुत्राच्या कथेच्या अनुषंगाने लेखकाने मानवी मनातील स्वार्थ, दुसऱ्याचा वापर करून घेण्याचीच नव्हे, तर प्रसंगी रक्ताच्या नात्यांची, अगदी आपल्या मुलाबाळांचा बळी देण्याचीही माणसाची वृत्ती याचे दर्शन घडवण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालेला आहे.
परंतु यात केवळ मानवी मनाच्या आदिम प्रवृत्तींचेच दर्शन आहे असे नव्हे, तर या नाटकाला एकाच वेळी बरेच आयाम आहेत. स्वार्थ ही आदिम वृत्ती जितकी आहे, तितकीच या स्वार्थाला सामाजिक, राजकीय, कौटुंबिक व्यवस्था देखील कशा हातभार लावत असतात, किंवा त्यावर परिणाम करत असतात याचे दर्शन देखील या नाटकातून होत जाते.
सर्वसाधारणपणे पुत्रप्रेम, पतीपत्नीप्रेम ही निखळ नैसर्गिक प्रेमाची उदाहरणे म्हणून पाहिली जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र हे प्रेमही तितकेसे नैसर्गिक नसून त्यामागेही सामाजिक धारणांचाच प्रभाव कसा असतो हे देखील या नाटकात अधोरेखित झालेले दिसते. उदा. औरसपुत्रावरचे प्रेम आणि अनौरस पुत्रावरचे प्रेम, सामाजिक मान्यतेतून झालेली पत्नी आणि प्रेमसंबंधातून किंवा इतर व्यवहारांतून झालेला लैंगिक संबंध, यांच्यावरील प्रेमाकडे पाहण्याचा
फरक. त्यातही पुन्हा हिडींबेसारखी स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असलेल्या एका समाजवर्गातील स्त्री, जी स्वतः लैंगिक संबंधात पुढाकार घेते आणि भीमाला मागून आणते (आणि भीमही स्वखुशीने नव्हे, तर केवळ कुंतीच्या आज्ञेने तिच्याकडे जातो. (इथंही एक स्त्रीच स्त्रीची गरज अधिक ओळखते का?) तेव्हा साहजिकच अशा स्वतंत्र मर्जीच्या स्त्रिया त्या काळातल्या भीमासारख्या पुरुषांनाही कायमसाठी झेपणे एकंदरीत कठीणच असावे. म्हणून तो कदाचित हिडींबेला किंवा तिच्या मुलाला ह्स्तीनापुरात कधीच आणून ठेवत नाही. (कदाचित तीही आपले स्वातंत्र्य आणि मातृकुल पद्धती त्यजून आली नसावी.) त्या दोघांनाही तो पुढील काळात सहज विसरूनही जातो. आणि आपल्या स्व-आर्य-जातीतील रुपवान द्रौपदीच्या सहवासात आयुष्यभर रमून जातो. आणि पुढे प्रसंगी हिडींबाच्या कुरुपतेची खिल्लीही उडवतो. हिडींबाशी आलेल्या संबंधाचे रत्तीभरही (इथे रतीमात्रही म्हणू शकतो.) महत्त्व त्याच्या लेखी उरलेले नसते.
पुढे तरुण झालेला घटोत्कचही आपल्या या कथित उच्च आर्य जातीतील वडिलांच्या पुरुषप्रधानतेच्या वर्चस्वाखाली येऊन पितृऋण इत्यादी आर्य संकल्पना डोक्यात घेऊन महायुद्धाच्या वेळी माता हिडिंबेचा विरोध असतानाही आपणहून हस्तीनापुरला पांडवांना मदत करायला येतो. तिथल्या नागर संस्कृतीला, कथित रुपवान स्त्रियांना भुलतो आणि शेवटी युद्धात मारला जातो. प्रत्येकच काळात सत्तेत असलेल्या कथित उच्च जातींचा आणि त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव, परिणाम आणि आकर्षण हे इतर दुय्यम जाती-वर्गावर कसे राहतात हेही यातून दिसून येते.
त्याचवेळी, कितीही गमजा मारल्या तरी मृत्यु डोळ्यासमोर दिसू लागल्यावर भेदरणारी माणसं, युद्धाचे दुष्परिणाम, जनतेच्या नावावर स्वतःचा स्वार्थ पाहणारी राजकीय व्यवस्था, आजचे देशातील राजकीय संदर्भ इत्यादी अनेक पैलू या नाटकाला आहेत. तरीही हे नाटक कुठेही बोजड होत नाही हे विशेष. उलट काही ठिकाणी ते हलक्या फुलक्या नर्म विनोदाची पखरणही अधुनमधून करत राहते.
महाभारतातील भीम, हिडींबा आणि घटोत्कच यांची कथा सर्वांना ठाऊक असतेच. नसेल तर आधी ती कथा जाणून घेऊन मगच नाटक पाहायला जायला हवे. तर नाटक अधिक समजून घेता येईल.
हाऊसफुल असलेल्या, अभिजित झुंजारराव दिग्दर्शित या प्रयोगाला कल्याणकर प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देताना दिसत होते. नाटकाच्या संवादातून आणि कलाकारांच्या अभिनयातून कथेतला गर्भित आशय प्रेक्षकांपर्यंत थेट पोचत होता. आणि प्रत्येक प्रवेशाला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, आवश्यक तेथे हशा मिळत होता.
एकूणच हा प्रयोग अतिशय देखणा होतोय. रंगमंचावरील प्रकाशयोजना केवळ अद्भुत आणि परिणामकारक, खिळवून ठेवणारी झालेली आहे. पात्रांची संख्या अधिक असूनही त्यांचा वावर सफाईदार, नेमका आहे. साध्याच पोशाखांतून पौराणिक काळ सहज उभा केलेला आहे. आणि सर्व पात्रांचा अभिनय, संवाद देखील सहज, ओघवते आणि परिणामकारक झालेले आहेत.
शक्य असेल तेथे सर्वांनी जरूर बघावे असे हे देखणे नाटक.
या नाटकाची आता कोलकाता येथे होणाऱ्या पाचव्या नॅशनल थिएटर -२०२० स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
-अलका गांधी-असेरकर.
Leave a Reply