
गाव ते गावच| गाव गप्पा| कॉलेज कट्टा
गाव गप्पा गावकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की आम्ही नदीच्या आसपास असणाऱ्या विहीरी शोधत भटकायचो.पोहता येतं हा गैरसमज.मधेच शेतात मोटर सुरु असली की पाणी पिवून ,जरासं सावलीत बसुन परत विहीर शोधायचो.एकदा का विहीर मिळाली की संपूर्ण उन्हाळा आम्ही तिथेच जमायचो.आमचं नेहमीचा कट्टा म्हणजे ती विहीर.मग शेताचा मालक…त्याच्या शिव्या…ओल्या अंगाने कपडे हातात घेऊन ढेकळातुन पळणे असं उद्योग चालायचे.कधी कधी तर आमचे कपडे गुपचूप उचलूनही घेऊन जायचा.मग विनवनी…रडणं…पुन्हा येणार नाही असं वचन देऊन घरी गेलं की उद्याचं प्लँनिंग सुरू.आमच्यातल्याच एकाला काठावर बसुन कुणी आलं तर सागंण्याची जबाबदारी दिली जायची.हे सुरु असताना आणखी एक गंमत म्हणजे रात्री सगळे एकत्र आले की विचारपुस होत असे…तितक्यात तो शेतमालकच तक्रार घेऊन आला तर मग सोयच नव्हती.फटके पडायचे खुप.शाळा संपली की अभ्यासाचं टेंशन नसायचं.बाल्य अवस्थेतलं प्रेम काय पण हा शब्दही माहिती नव्हता.त्यामुळे शाळा लवकर सुरु होण्याची ओढही नव्हती.शाळेतल्या मुलींशी बिंधासपणे कधी बोलता आलच नाही. बोललं तर कुणी पाहिल आणि आपल्याला त्यामुलीच्या नावाने चिडवतील अशी भिती कायम मनात असायची.हाफपँन्ट आणि पांढरा कळकट शर्ट हाच युनिफार्म दिवसभर चढवून गावभर उंडारणे हा एकमेव छंद, विनाकारणं दुसऱ्या गल्लीत चकरा नाही की मुलीकडे बघुन कमेंट करणं नाही. निरागसता हा शब्द शहरात आल्यानंतर कळाला असला तरी त्यातली निरागसता बालपणात होती.रविवारी दुपारी बारा साडेबाराला शक्तीमान मालिका लागायची.ती मालिका म्हणजे जीव की प्राण.घरी टिव्ही नव्हता.शेजारी मित्राकडे होता.पण तो लई भाव खायचा.”शक्तिमान मालिका बघायला घरी येऊन देतो” असं म्हणत हुकूमशहा सारखा वागायचा…वाट्टेल ते कामं करुन घ्यायचा…आम्ही शनिवारी सगळं ऐकायचो कारण रविवारी मालिका बघता आली पाहिजे… इतर दिवशी शाळेत,नदीला खेळायला गेल्यावर म्हणजे जिथं दिसेल तिथे सगळे मिळून बदडून काढायचो…या मार खाण्याची त्यालाही सवय झाली होती आणि आम्हाला मारण्याची.रविवारी घरी गेलं की मग तो ओरडायचा “तुम्ही मला मारलं,आता शक्तिमान मालिका नाही बघू देणार” असं म्हणत दात काढून मोठ्यानं हसायचा.भयानक राग यायचा तेव्हा.आपल्या घरी टिव्ही नाही याचाही कधी कधी राग यायचा…एखाद्या रविवारी त्यानं नाहीच घेतलं घरात तर आम्ही मित्र मिळून प्लॅन करायचो आणि त्याला बाहेर बोलवायचो…किंवा तोच बाहेर आला तर त्याला सगळे मिळून पकडून ठेवायचो…घरापासून दुर घेऊन जायचो आणि मालिका संपली की सोडून द्यायचो…हे वागणं खरंतर अघोरीपणाचं वाटेल पण तेव्हा जाम मजा यायची.नंतर जेव्हा परत टिव्ही बघायचा प्रश्न असायचा तेव्हा त्याला धमकी दिली जायची”परत बाहेर सापडलास तर आम्ही तुझी चड्डी काढून घेऊ…”वैगरे…आणि तो घाबरायचा.लाडात वाढल्यामुळे त्याच्या वागण्यात माज होता…तो आम्ही रोज उतरवायचो.रविवारी तो आमचा माज उतरवायचा…या माज उतरवण्याच्या प्रक्रियेमुळे आजही आम्ही जमीनीवर आहोत हे समाधानाचं आहे….कधी आईजवळ हट्ट धरला की ती सोबत यायची आणि” आमच्या पोराला जरा येळ बघु द्या..”असं म्हटलं की अंगावर मुठभर मास चढायचं .तेव्हा वाटायचं आई आता सोबत आहे आता घाबरायचं कारणं नाही… आजही ती तशीच असते ,आपल्याला तिचं असणं जाणवून येत नाही इतकच.गाव ते गावच…आणि बालपण ते बालपणचं.आईजवळ गेलं की बालपण परत येतं,पण त्या सर्व गोष्टी नाही आणता येत…
–संतोष गायकवाड- कॉलेज कट्टा
मराठी मनोरंजन प्रेरणादायी कथा
Leave a Reply