
गावापासून दहा पंधरा मिनीटं चालत गेलं की एक गायरान लागतं. गावातली सगळी जनावरं तिथं चरायला येतात.बाजूला बारा महिने वाहणारी नदी. बोरबनातली काही जमीन मैदानासारखी सपाट झालेली…म्हणून खेळायला सगळे पोरं इथच जमतात.आमच्या गावात दोनच खेळ जास्त फेमस होते.एक म्हणजे खो-खो आणि दुसरा क्रिकेट…खो-खो शाळेत आमचे शेळके सर घ्यायचे.शाळा पाचला सुटायची आणि खो-खो खेळणारी सगळी पोरं दप्तरासकट मैदानावर जायची.मैदान गावाबाहेर होतं.शाळेची एक टिम होती.राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षिसं मिळालेली पोरं त्यात होती.ज्यांना खेळायचं होतं पण टिम मध्ये घेतलं नाही ते आम्ही सगळे क्रिकेटकडे वळालो आणि आम्ही बोरबनात खेळायला जावू लागलो.आमची टिम म्हणजे जे येईल ते …क्रिकेटचे सगळेच नियम आमच्यापैकी कुणालाच जास्त माहीत नव्हते.”त्या मोठ्या बाभळीच्या पलिकडं बाँल गेला की सिक्स…अन् अलिकडच्या लिंबाच्या झाडाकडं चौका…” आमच्यात जे जास्त क्रिकेट बघणारं पोरगं होतं ते सगळ्यांना सांगायचं…क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीनं खेळलं जायचं. म्हणजे जसं की नंबर पाडून, गडी वाटून घेऊन नाही तर रन काढी पग्गल ( जो जास्त रन काढेल त्याचा पहिला नंबर )…
जास्त पोरं असली की दोन टिम तयार करायचे.अर्थात आमच्यापेक्षा ज्याला जास्त कळतं तो हे काम करायचा.मग एक मँच लावली जायची.टाँस व्हायचा आणि जी टिम जिंकेल त्या टिमने दोन रुपये द्यायचे.पहिली मँच दोन रुपये. नंतर जर जिंकलो आणि पोरांचा काँन्फिडन्स वाढला तर दोनचे पाच आणि पाचचे दहा रुपये…हे सगळे पैसे टिम मधल्या पोरांकडून जमा केले जायचे.तेव्हा एक रुपया खिशात असणं म्हणजे मला श्रीमंत असल्यासारखं वाटायचं आणि असा श्रीमंत वाटण्याचा योग माझ्या नशीबात फार कमी वेळा येत असे.म्हणून टिममध्ये असूनही प्रत्यक्ष खेळण्याचा योग फारसा येत नसे.तरीही टिम म्हणून आम्ही ती मँच एकजीवानं खेळायचो.जीवाचं रान करायचो.खेळताना फिल्डिंग करणारी पोरं भांडायची आपसात.कारणं फार नव्हती पण बाँल काट्यात गेला तर ,” तु काढ,मागच्या टाईमाला म्यँ काढला व्हता…”मग दुसरा ,”काढा नाई तर नका काढू ,मला काय करायचं…” असे हेवेदावे सुरु व्हायचे.असं सुरू झालं की सगळे फिल्डर रिलँक्समधी झाडाच्या सावलीत बसून मजा बघायचे.तिकडं बँटींग करणारा बँट खांद्यावर घेऊन उभा…हंम्पायर खाली मान टाकून बसलेला…इकडं भांडण वाढायचा आकार दिसला की नाईलाजास्तव ज्यानं बाँल मारला तोच जावून बाँल काढून आणायचा आणि मग पुन्हा मँच सुरू व्हायची…
शाळा बाराला असल्यामुळे सकाळी नऊला आम्ही बोरबनात नाही तर नदीत मारोतीच्या मंदीरात जमायचो आणि शाळेची घंटा झाली की शाळेकडे पळायचो. शाळेत गेटवर पोहचेपर्यंत राष्ट्रगीत सुरू झालेलं असायचं म्हणून शाळेबाहेर सावधान मध्ये उभा राहण्याचा तो ५२ सेकंदाचा काळ म्हणजे प्रचंड भयानक वाटायचा.अनेक पालकांनी आपल्या पाल्याला इतकं स्थिर आणि शांत पाहिलं ते ह्याच ५२ सेकंदात.सगळेच लोकं आपल्याकडे बघतायत हे पाहून लाज वाटायची.राष्ट्रगीत संपलं की गेटमधून आत शिरायच्या आत शेळके सर ओरडायचे आणि आम्ही तिथल्या तिथे स्तब्ध उभं रहायचो. “तिथच बसायचं प्रार्थना होईपर्यंत…” हे नेहमीचं वाक्य माहीत होतं म्हणून थांबा म्हटलं की आम्ही मांड्या घालून बसून जायचो…एवढ्या पाठीमागे कुणी येत नव्हतं म्हणून आम्ही गप्पा मारत बसायचो.तिकडे स्टेजवर खो – खोच्या टिमचा सत्कार सुरू असायचा आम्ही त्यांना पाहत बसायचो नंतर आमचा सत्कार व्हायचा उलट्या हातावर छड्या मारणे किंवा कागदं वेचणे अशा शिक्षा आम्हाला व्हायच्या.
” दोन खेळ खो-खो आणि क्रिकेट…ते स्टेजवर आणि आम्ही गेटवर…” ही दरी कायम आमच्यात राहीली.पण एक होतं आमची कुणाशीच स्पर्धा नव्हती.त्यात मी तर म्हणजे लिंबू टिंबू.मला खूप खेळता येतं अशातला भाग नव्हता,बँट बाँल माझ्याकडे होतं म्हणून मला खेळात घ्यायचे असही काही नव्हतं…पण मला आवडायचं.बोरबनात खेळण्यापेक्षा खेळताना बघणं जास्त आवडायचं.बाजूला असलेल्या शेतात फेरफटका मारायला आवडायचं… आमच्याकडे शेती नाही म्हणून शेताबद्दल जास्त अप्रुप मला वाटायचं…पोरं भांडायची…पैसे जमा व्हायचे,नाही व्हायचे ते काही असो पण जे जमा होतील ते सगळे तेव्हाच खर्च करायचो…कधी चिवडा मुरमुरे आणून भेळ केली जायची…सगळ्यात वाटली जायची…खाताना सगळ्यांची एक टिम होऊन जायची.कधी पोरांचा गलका ऐकून गारीगार विकणाराही तिकडे यायचां.मग काय जी टिम जिंकेल तिने गारीगार खाऊ घालायची अशाही अटींवर मँच फिक्स व्हायची.पैसे नसतील तर गारीगारवाल्या भय्याला खेळात सामिल करुन घेतलं जायचं.तोही खेळायचा आणि खेळणं झाली की सगळ्या गारीगार वाटून टाकायचा.कारण त्यालाही आमच्यासोबत शाळेत यायचं असतं…
अशा कितीतरी गोष्टींनी,त्यांच्या आठवणींनी मला समृद्ध केलय.आज यातलं काहीच परत होणार नसलं तरीहीते मैदान आजही तसच आहे.बाभळी कमी झाल्यात.तिथं खेळताना कुणी दिसत नाही. जनावरही फारशी नसतात. विकास इतका झाला की विकास नावचं पोरहं रस्त्यावर खेळताना दिसत नाही.ज्या वयात हातात स्टंप घेऊन मैदानावर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे त्यावयात पक्षाचे झेंडे हातात आलेले दिसतात.ज्यांचा खेळासाठी सत्कार झाला ते राजकीय पुढारी झालेत.आम्ही मागे मार खाणारे मात्र आजही खेळत आहोत.आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी….इथं त्या संकटाशी हारायचंही नसतं आणि जिंकायचंही नसतं…फक्त खेळवत ठेवायचं…कारण न खेळण्यापेक्षा खेळवून खेळवून संपवणं कधीही उत्तम.मैदान मोकळं जगायला शिकवतं ,मुक्त वावरायला शिकवतं.चार भिंती कितीही महाग झाल्या तरी मैदानाची सर त्यांना नसतं.त्या कोसळू शकतात,इथं कोसाळायला काहीच नसतं ,असतो ते फक्त आपण आणि सोबतीला आपलीच आपल्याकडून नेहमी दुर्लक्षित असणारी आपलीच सावली….
हरवलेत ते फक्त गल्ली बाँय.ते आहेत तुमच्या घराच्या आत…शांतपणे हातात मोबाईल घेऊन बसलेले…काय बरं करत असतील ते…?क्रिकेट तर खेळत नाहीत ना…?
संतोष गायकवाड-कॉलेज कट्टा
Khuuup chaan sir !! Tumchya lihnyatun amhihi to kshan jagto ….thank you so much ,asech lihit raha ❤❤
Thanx samu