काही अशी विशेष नावं आहेत जी ऐकल्यावर किंवा वाचल्यावर प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो. त्यापैकीच एक नाव म्हणजे कल्पना चावला. कल्पना चावला एक अद्भुत प्रवास माहिती निबंध भाषण मराठी
कल्पना चावला एक अद्भुत प्रवास माहिती निबंध भाषण मराठी
Kalpana Chawla short Information Biography in Marathi Language
बालपणी एक स्वप्न पाहून आयुष्यभर त्या स्वप्नाला उराशी बाळगून सत्यात उतरले असे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. मला सांगा वाचकहो, आपण किती लोक लहानपणीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटतो? बालवयात पडलेली स्वप्नं, फक्त स्वप्नं असतात अशी आपली मान्यता आहे. पण कल्पना चावला यांनी या संकल्पनेला तिलांजली दिली.
जन्म व बालपण:
हरियाणा राज्यातील कर्नाल येथे १७ मार्च १९६२ रोजी कल्पना चावला यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात चौघा भावंडांत त्या सर्वात लहान होत्या. वडील श्री. बनारसीलाल चावला यांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या संस्कारातून कल्पना यांच्यात भिनली होती. लहानपापासूनच अतिशय प्रतिभावान व साहसी असलेल्या कल्पनाने डॉक्टर किंवा शिक्षिका व्हावे असे त्यांच्या वडिलांना मनापासून वाटे. परंतु कल्पनाला मात्र अवकाशात झेपावण्याचे वेध लागले होते. त्यांना अंतराळात उडण्याची स्वप्नं झोपू देत नसत.
व्यक्तित्व:
कल्पना लहानपणापासूनच एक हरहुन्नरी मुलगी होती. आळस कशाला म्हणतात तिला माहित नव्हते. एखादी गोष्ट मनाने घेतली की, ती पूर्णच करून सोडायची असा तिचा ध्यास असायचा. वडिलांच्या मते कल्पना एका योद्ध्यासारखी होती. बऱ्याच गोष्टीत तिला रस होता. लहानपणी कविता करणे, नृत्य करणे, सायकल चालवणे असे विविध छंद तिने जोपासले होते. धावण्याच्या स्पर्धेत ती हमखास प्रथम असे. कॉलेज मध्ये असताना ती मुलांसोबत बॅडमिंटन आणि डॉजबॉल खेळताना दिसे. थोडक्यात कल्पना फक्त स्वप्न पाहणारी मुलगी नव्हती, तर स्वप्नासाठी झटणारी आणि वाटेल ते करायची तयारी ठेवणारी धाडसी तरुणी होती.
कल्पना चावला एक अद्भुत प्रवास माहिती निबंध भाषण मराठी
इंजिनीअरिंग:
बालपणापासून एरोनॉटिकल इंजिनीअरिंग करण्याचे दृढ स्वप्न असलेल्या कल्पना यांचे प्राथमिक शिक्षण टागोर बाल निकेतन सिनियर सेकंडरी शाळेत पूर्ण झाले. हुशार असल्याने शाळेतील सर्वच शिक्षकांच्या त्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. लहानपणीच त्यांनी कराटे व भरतनाट्यम मध्ये महारत मिळवली होती. नंतर १९८२ मध्ये त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेज या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी.ई. ही डिग्री मिळवली.
भारतात त्यावेळी सुविधांची कमतरता असल्याने १९८२ ला त्यांनी अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळवला व १९८४ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अंतराळवीर होण्याची ओढ त्यांना थांबू देत नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा १९८६ मध्ये पुन्हा एकदा पदव्युत्तर पदवी मिळवली. आणि अखेर १९८८ मध्ये बोल्डर येथील कॉलरॅडो विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून सन्मानाची समजली जाणारी पीएच डी अर्थात डॉक्टरेट मिळवली.
विवाहबंधन:
१८८३ मध्ये कल्पना यांची जिन पियरे हॅरिसन (जे. पी.) या युवकाशी भेट झाली व सन १९८४ मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर कल्पनाच्या स्वप्नांना बळ मिळाले कारण जे पी ह्यांचा विमान प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. आणि त्यामुळे कल्पनाचे वैमानिक बनण्याचे स्वप्न हा हा म्हणता पूर्ण झाले.
या सर्व सहज सुंदर दिसणाऱ्या प्रवासात अनंत अडचणी झेलत कल्पना पुढे गेल्या. अगदी मुलीने वैमानिक होणे चांगले दिसत नाही अशा खुळचट सकल्पनांना त्यांनी फाटा दिला. या कोणत्याच विरोधाला न जुमानता त्यांनी व्यावसायिक वैमानिक असल्याचे तसेच ग्लाईडर व विमान चालकांचे प्रशिक्षक म्हणून लायसेन्स प्राप्त केले.

नासातील कारकीर्द:
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८८ मध्ये नासा येथील एम्स अनुसंधान केंद्रातील ओव्हर्सेट मेथड्स इंक मध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्या कार्यकाळात त्यांनी एसटीओएल अर्थात शॉर्ट टेकऑफ कॉन्सेप्ट मध्ये सीएफडी अर्थात कंप्यूटेशनल फ्लुईड डायनॅमिक्स वर संशोधन केले.
१९९१ मध्ये कल्पना यांनी अमेरिकी नागरिकत्व मिळवले व दरम्यान नासा मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून त्यांनी कार्यभार पहिला. अखेर १९९५ मध्ये त्यांनी अंतराळवीर होण्यासाठीच अर्ज भरला आणि तो स्वीकारला गेला.
Kalpana Chawla Essay Speech History Quotes in Marathi Language pdf
१९ नोव्हेंबर १९९७ या दिवशी त्यांनी नासाच्या स्पेस शटल एस टी एस- ८७ (कोलंबिया शटल) मधून पहिल्यांदा सफल अंतरीक्ष प्रवास केला. ५ सप्टेंबर १९९७ ला तो ३६० हून अधिक तासांचा प्रवास पूर्ण करून त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या. आणि त्याचबरोबर भारतीय वंशाच्या पहिला महिला अंतराळवीर म्हणून त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात कोरले गेले.
१९९७ नंतर अंतराळवीर कार्यालयात बऱ्याच तांत्रिक कामाशी संबंधीत हुद्द्यावर त्यांनी काम पाहिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला. पुढे सन २००० मध्ये एस टी एस १०७ या अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली. बऱ्याच अडचणींमुळे ही मोहीम सतत पुढे ढकलली जात होती. कधी बाकी मोहिमांशी जुळवून घेण्यात नियोजनात अडचण यायची तर बऱ्याचदा तांत्रिक अडचणी समोर आल्या पण शेवटी १९ जानेवारी २००३ साली सर्व अटी मान्य करून सात अंतराळवीरांसह त्यांनी अवकाशात उड्डाण करण्याचे ठरवले.
शेवटचा प्रवास:
अंतराळात १६ दिवस यशस्वी मोहीम राबवून तब्बल ८० प्रयोग कोलंबिया यानातील सात अंतराळवीरांनी केले, ज्यात कल्पनाचा अर्थातच सिंहाचा वाटा होता. जानेवारी २००३ मध्ये सुरू झालेला प्रवास कल्पना यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीवर परततच होत्या परंतु १ फेब्रुवारी २००३ हा दिवस इतिहासातील काळा दिवस ठरला. परतत असताना पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत असताना कोलंबिया यानाच्या डाव्या पंखातून वातावरणातील उष्ण वायूचा प्रवेश झाला व यानात दबाव वाढला व जमिनीपासून २००००० फुटांवर असताना यानाला आग लागली आणि केवळ एका मिनिटात यानाचे तुकडे तुकडे झाले. अंतराळवीरांना काही कळायच्या आत यानाचे तुकडे अवकाशात विखुरले गेले. हे सर्व का आणि कसे झाले यावर विशेष रिपोर्ट नंतर नासाने प्रकाशित केला ज्यात असे लक्षात आले की, कोलंबिया यानाला इंधन पुरवठ्यासाठी असणारी जी टाकी होती त्या टाकीचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी असणाऱ्या इंसुलेशनचा तुकडा वरून जोरात यानाच्या डाव्या पंखावर येऊन पडला आणि त्यामुळे पंखास इजा झाली. जराशा चुकीमुळे नजरेच्या आत असलेले यान, आगीत भस्मसात झाले. टेक्सास शहरावरून हे दृश्य पाहून सर्वांना गहिवरून आले. यानाचे अवशेष सगळीकडे विखुरले गेले आणि सफल म्हणविल्या जाणाऱ्या एस टी एस-१०७ यानाचा आणि त्यातील सात अंतराळवीरांसह भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा दुःखद अंत झाला.
या घटनेच्या तब्बल दहा वर्षानंतर कोलंबियाचे मोहिमेचे मॅनेजर वेन यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये गौप्यस्फोट केला की, कोलंबिया यान पृथ्वीवर परतूच शकणार नाही याची नासाला आधीच माहिती मिळाली होती परंतु अंतराळवीर त्यावर काहीच उपाय करू शकणार नाहीत आणि जर त्यांना हे कळले तर ते अंतराळातच घिरट्या घालीत राहतील म्हणून कुणालाही ही माहिती देण्यात आली नाही.
कल्पना चावला यांच्या अद्भुत जीवन प्रवासातून बरेच काही घेण्यासारखे आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एका अशा काळात अवकाशात फेरफटका मारून आली ज्या काळात घरातून बाहेर पडणे मुश्किल होते. त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला, दाखवलेल्या सहसाला, करारीपणाला आजच्या प्रत्येक भारतीयाने सलाम करायला हवा. कल्पना चावला म्हणायच्या की,
Quote
“मी अवकाशात जाण्यासाठीच बनलेली आहे आणि मी तिथलीच होऊन जाणार आहे!”
-नवनीता (शैलेश भोकरे)
मित्रांनो, कल्पना चावला एक अद्भुत प्रवास माहिती निबंध भाषण मराठी Kalpana Chawla short Information Biography in Marathi Language Kalpana Chawla Essay Speech History Quotes in Marathi Language pdf
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply