
सन २०१९… सरत्या वर्षा अखेर समतावादी विचारसरणी असलेल्या काहीनी एकत्रित येऊन “मनुस्मृती” पुस्तकांच्या प्रतींचे दहन केले. स्वता:ला पुरोगामी विचारसरणीचे समजणारे काही महानुभावी स्वता:ला मनुविचाराना आपला आदर्श मानुन समाज मनावर लादण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीच्या विरोधात एक अग्रेसर मोहिम डिसेंबर अखेरला महाराष्ट्रात पुढे सरसावली. समाजवादी विचारधारेतील काही जनमाणसानी ‘नमके काय नको’ हे मनुस्मृती पुस्तकांच्या प्रती दहनातुन सांगण्याचा प्रयत्न केला. २०२० या पुढील वर्षाची सुरुवातच ३ जानेवारीला सावित्रीबाई जोतीबा फुले जन्मदिनी सावित्री उत्सवाचे आयोजन करुन समतावादी विचारविश्वाच्या पुढच्या वाटचालीसाठी नेमके कोणत्या दिशेने होकारार्थी सकारात्मक कार्य पुढे गेले पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जोतीबा आणि सावित्रीबाईनी या समतावादी विचारसरणीची पायाभरणी केली, यात शंकाच नाही. सावित्रीबाईंसारख्या आद्यशिक्षकेने शेणा-दगडांचा मारा सहन करुन शिक्षणाचा वसा घेतला. हा वसा स्वता:पुरता आत्मकेंद्रित न ठेवता तो जनमाणसात रुजविला. पण या स्त्रींच हे क्रांतिकारी कृतीकार्य किती जणांना उमगले? याची मात्र शंका आहे. जैविकदृष्ट्या त्या आई बनु शकल्या नाहीत. प्लेग पीडितांसाठी आणि दुष्काळग्रस्तांसाठी काम करताना सावित्रीबाई अनेक लहान मुला मुलींच्या आई बनल्या. या क्रांतिकारी विचारसरणीच्या स्त्रीने अनेक अडलेल्या बालविधवांची बाळांतपणे करुन त्यांचे आणि त्यांच्या ताह्या बाळांचे संगोपन करुन जीव वाचविण्याचे कार्य केले. त्यांच्यापैकीच एक असलेल्या बालविधवेच्या मुलांला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. बालविधवा असलेल्या काशीबाईने हसत-हसत स्वखुशीने आपला पोटच्या मुलाला यशवंतला दत्तक दिले. सावित्रीबाईंनी ही आपलेपणाने त्याचे संगोपन करून आपले सर्व अधिकार दिले. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर केले. गरजु-गरीब पीडितांच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर मुलाला त्यांनी रुजू केले. जैविकदृष्ट्या आई बनु न शकलेल्या या समतावादी स्त्रीने आपल्या कृतीकार्यातुन अनेक लहान मुला-मुलींची आई बनण्याचा मान मिळविला. आपल्यातील मातृत्वाचा त्यांनी असा विस्तार केला की, जैविक पालकत्वा पेक्षा सामाजिक पालकत्व अधिक महत्वचे असते, हे त्यांनी आपल्या कृतीतुन सिध्द करुन समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला. आपल्यातील स्त्रीत्वाला त्यांनी अनेक नवीन पैलू देत समाजाला दृष्टीकोन दिला. जैविक मातृत्वापेक्षा सामाजिक मातुत्वाला, मातृत्वाच्या विस्तारीत व्याख्येला स्त्रीवादी चळवळीने ही खुप महत्त्व दिले. स्त्रीत्व आणि मातृत्व यांची सांगड नाकारत जैविक मातृत्व हा व्यापक स्त्रीत्वाचा केवळ एक भाग असतो. हे त्यांनी आपल्या कार्यातुन अधोरेखित केले आहे. काही सनातनी वृत्ती-प्रवृत्ती जैविक मातृत्वा सारखा केवळ शारीरिक-निसर्गाधारित बाबीला सर्वाधिक महत्त्व देत, असे शारीरिक मातृत्व ज्यांना लाभले नाही त्यांचा वांझ असा उल्लेख करत त्यांचे स्त्रीत्व नाकारात आहेत, ही बाब खरोखरच खुप खेदजनक आहे. स्त्रीत्वाची एक मागास, शरीरकेंद्रीत व्याख्या सनातनी विचारधारेचे मनुवृत्तींची माणसं त्यांच्यातील कुकृत्यांचे लाजिरवाणे दर्शन घडवत आहे. त्यांच्या मनात विचारांत आजही विकृत मनुस्मृती जीवंत आहे, ही बाब निषेधार्हय आहे. भारतीय स्त्री मुक्ती दिनाची वाटचाल जोमदारपणे व्हायची असेल तर मनुसमर्थक विचारविश्वास निसंकोचपणे विरोध केला पाहिजे. अशा प्रवृत्तीला मनापासुन नाकारले पाहिजे. सावित्रीबाई जोतीबा फुले यांचा जन्मदिवस हाच सण म्हणुन उत्साहात साजरा करत भारतीय स्त्री मुक्ती दिनांचा हा मार्ग अधिक सोपस्कर करण्यास मार्गदर्शकाची भुमिका घेतल्या शिवाय रहाणार नाही. २०२० या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक पध्दतीने आपणच पुढे घेऊन जायला हवी. या दृष्टीकोनातून होकारार्थी नवतरुणांकडुन कार्य घडले पाहिजे. सकारात्मक विचारांनीच नकारात्मक विचारांवर खऱ्या अर्थाने मात देण्याचे काम पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात पुन्हा नव्याने नवतरुणाच्या सहकार्याने होणार आहे. स्त्रीयांच्या बाबतीत होकार, स्विकार आणि नकार हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक बळकटी देण्यास निश्चित प्रेरणादायी ठरेल, म्हणूनच आपला एक होकार हवा आहे सावित्रीबाईंच्या विचारांना-कार्यकृतीला… फक्त एक सकारात्मक होकार आपल्यातल्या पुरोगामी विचारांच्या नवसावित्रींसाठी…
-रितेश साळुंके
कॉलेज कट्टा.
Leave a Reply