
अशक्य? शक्य… छे! शक्यच नाही-हे असं अथवा ह्यासारखी नकारात्मकता अनेकांच्यात असते, हे आपण पाहात आलोय, पाहात आहोत. हे सांगायचं कारण एका ट्रेकरचा(गिर्यारोहक) अनुभव. त्या डोंगराच्या माथ्यावर आजपर्यंत कुणीही गेलेला नाही, अगदी अनेक प्रयत्न करुनही. अनेकांना अशक्य. काहीजण अगदी प्रयत्नांती ९० टक्केपर्यंत उंचावर पोहचले पण व्यर्थ. एका संघाने ठाम ठरवलं-‘डोंगरमाथा पाहायचाच. ठरलेल्या दिवशी सकाळीच तो संघ डोंगराच्या पायथ्याशी आला. एकाने कानात इअरफोन घातलेला. त्या डोंगरावर चढाईला सुरुवात झाली. परिश्रमपूर्वक, विचारपूर्वक पावलं उचलत एकेकजण वर-वर चढतोय. काहीजण तर उंचावर आले. काहीजण थकले, खाली उतरले. उर्वरित पंधराजण, खाली उतरणारांकडे न पाहता, वर-वर चढताहेत. आठजणांना चढणं अशक्य वाटु लागलं. एकजण म्हणाला,”मित्रांनो, खरंच अशक्य आहे. प्लीज चला खाली.” ते आठहीजण खाली उतरु लागले. कानात इअरफोन असणारा तो, थांबत थांबत पण चढतोच आहे. खाली उतरणारा एकजण त्याला म्हणाला,”चल खाली. अशक्य आहे माथ्यावर जाणं. लोकं म्हणतात ते चुकीचं नाहीय, ऐक माझं. चल दोघं सोबतच उतरु.” इअरफोन असणाऱ्याने ह्याच्या बोलण्याकडं लक्षच दिलं नाही, विचारपूर्वक एकेक पाऊल वर उचलत तो निघालाय. हा चिडुन म्हणाला,”मरायचंय का. आई, बापाचा विचार कर. एकुलता एक आहेस. चल, माघारी फिर.” तो शांतपणे एकेक पाऊल वर उचलतोय. “जाऊदे. मला भरपूर जगायचंय. मी चाललो खाली.” एकेक करत, इअरफोनवाला सोडला तर सगळेच पायथ्याशी आले अन् त्याच्या येण्याची वाट पाहु लागले. घामाघूम होत इअरफोनवाला डोंगरमाथ्यावर पोहोचलाच. विजयीमुद्रेने त्यानं भोवताली पाहिलं. दोन्ही हात पसरवून छातीभर श्वास घेतला. सेल्फी काढला. मनभरुन भोवताल नजरेत साठवला. निघाला परतीच्या प्रवासाला. पायथ्याशी असणारे आपापसात बोलु लागले. “त्याने आपलं ऐकलं नाही. भोग म्हणावं आता कर्माची फळं.” एकजण म्हणाला,”येतोय तो खाली.” एकसाथ सगळ्यांची मान वर. तो पायथ्याशी आला. इअरफोन काढला. प्रत्येकाला सेल्फी दाखवला. सगळ्यांचे प्रसंन्न चेहरे. न राहवून एकाने विचारलंच,”कसं शक्य झालं?” तो म्हणाला,”तुम्हांला वाटलं, मी गाणी ऐकत डोंगर चढतोय पण तसं नव्हतंच.” सगळेजण आश्चर्यचकित.तो म्हणाला,”माझ्या मनातले सकारात्मक विचार, मी, रेकॉर्ड करुन ते ऐकत होतो. म्हणूनच मी डोंगरमाथ्यावर पोहोचु शकलो.” एकजण म्हणाला,”ऐकव बरं.” त्याने मोबाईलमधे रेकॉर्ड केलेलं ऐकवलं-अशक्य असं काहीच नसतं. डोंगरमाथा हेच माझं ध्येय. अनंत अडचणी, संकटं येतील तेव्हा डोंगरमाथ्यावर मी एकटाच पोहोचलोय हे चित्र डोळ्यांसमोर आणायचं. जे कुणीच करत नाही, तेच करण्यात मजा असते, आनंद असतो. फक्त मी आणि मीच डोंगरमाथ्यावर पोहोचणार, कितीही संकटं आली तरी. मी, त्या डोंगरासारखाच कठिण, स्थिर राहणार तन, मनाने. डोंगरमाथा हाच ध्यास आणि श्वास. जीवन चलनेका नाम, चलते रहो सुबह, शाम.” प्रत्येकानं,त्याचं अभिनंदन करत गळाभेट घेतली. त्याच्यासोबत सेल्फी काढला. एकजण म्हणाला,”आपणच, आपल्यात सकारात्मकता निर्माण करु शकतो.”
तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहित सोप्या भाषेत सादर केली जाते.
-सुनील वनाजी राऊत,
सावतानगर, भिंगार-अहमदनगर.मो.९८२२७५८३८३
कॉलेज कट्टा
Leave a Reply